फळबागेत पाणी साठवण कुंड

फळबागेत पाणी साठवण कुंड
कोकण जलकुंड

कोकणातील जांभ्या जमिनीमध्ये पाण्याच्या निचऱ्याचे प्रमाण जास्त असते. या फळबागांना उन्हाळ्यात पाणी व्यवस्थापन करणे अवघड जाते. कोरडवाहू फळपिकांना प्रारंभिक तीन वर्षांच्या काळात सिंचनाची गरज असते, त्यामुळे फळबागांच्या सिंचनासाठी आता अस्तरित शेततळ्याचा वापर फायदेशीर दिसून आला आहे. डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने डोंगरउतारावरील आंबा आणि काजू फळबागांच्या पाणी व्यवस्थापनासाठी कोकण जलकुंड तंत्रज्ञान विकसित केले आहे.

 • या जलकुंडासाठी प्लॅस्टिकचे अस्तरीकरण केलेले असते. अशा खड्ड्यांमध्ये निव्वळ पावसाचे पाणी साठवून त्याचा कार्यक्षम वापर पावसाळ्यानंतर फळपिकांना करण्यात येतो.
 • नवीन आंबा किंवा काजू लागवडीत दर दहा झाडांमध्ये जमीन जर डोंगरउताराची व खडकाळ असल्यास ४ x १  x १ मी. किंवा २  x १  x २ मी. या मापाचा खड्डा खोदावा. अशा खड्ड्यांना व्यवस्थित चौकोनी आकार द्यावा. जांभ्या जमिनीच्या खड्ड्यातील बारीक दगडांची अणकुचीदार टोके काढून टाकावीत आणि खड्ड्याचा तळ व चारही भिंतींवर अस्तराच्या स्वरूपात भातपेंढ्याचा सुमारे १५ सें.मी. जाडीचा थर पसरावा. पेंढा पसरण्यापूर्वी शिफारशीत कीटकनाशक पावडर खड्ड्यात पसरून द्यावी. त्यानंतर खड्ड्याच्या आकारमानानुसार शिफारशीत जाडीचे प्लॅस्टिक अस्तरीत करावे. अस्तरीकरण करताना प्लॅस्टिक व्यवस्थित पसरावे, जेणेकरून त्यास घड्या पडणार नाहीत.
 • खड्ड्याच्या काठापासून २० सें.मी. अंतरावर    ३० x३० सें.मी. आकाराचा सभोवताली चर खोदून त्यात प्लॅस्टिकची खड्ड्याबाहेरील वाढीव बाजू गाडून मातीने व्यवस्थित झाकून, माती पायाने व्यवस्थित घट्ट दाबावी व खड्ड्याच्या सभोवताली मातीचा उंचवटा तयार करावा, यामुळे खड्ड्याच्या आजूबाजूने वाहणारे पावसाचे मातीमिश्रित गढूळ पाणी खड्ड्यात न येता खड्डा पावसाच्या स्वच्छ पाण्याने भरून राहील.  
 • खड्ड्यामध्ये साठविलेले पाणी पावसाळ्यानंतर उर्वरित काळासाठी (१५ नोव्हेंबर ते १५ जून) दहा आंबा किंवा काजू कलमांना प्रतिआठवड्यास प्रतिझाडास दहा लिटर या प्रमाणात पुरेसे होते. प्लॅस्टिक अस्तरीत खड्ड्यातील पाण्याचा बाष्पीभवनाद्वारा होणारा ऱ्हास कमी करण्यासाठी बांबूच्या पट्ट्या आणि गवत वापरून तयार केलेल्या सलद्याने खड्डा झाकून ठेवावा, यामुळे मोकाट जनावरे किंवा वन्य प्राणीदेखील तळ्यातील पाणी पिणार नाहीत.
 • प्रत्येक वेळी कलमांना देण्यासाठी खड्ड्यातील पाणी काढल्यानंतर पाण्याच्या पृष्ठभागावर १०० मि.लि. नीम / उंडी तेल ओतावे. अशा तेलाच्या तवंगामुळे बाष्पीभवनाद्वारा होणारा पाण्याचा ऱ्हास मर्यादित राहतो आणि तेलाच्या उग्र वासामुळे मोकाट जनावरे पाणी पीत नाहीत आणि उंदीर, सरडा, विंचू इत्यादी पाण्याजवळ जात नाहीत.
 •  - ०२३५८ - २८०५५८ कृषी तंत्रज्ञान माहिती केंद्र, डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली, जि. रत्नागिरी.

  Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

  ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

  Related Stories

  No stories found.
  Agrowon
  www.agrowon.com