Grape Harvest : फळ काढणी, रिकटची तयारी

प्रत्येक वेलीवर घडांची संख्या जास्त असल्यास त्यामध्ये गोडी येण्यास (साखर उतरण्यास) उशीर होईल. ही समस्या साधारणतः बऱ्याच बागेत दिसून येते. फळ काढणीला फक्त १० दिवसांचा कालावधी उरला असून, अजूनपर्यंत मण्यात अपेक्षित गोडी आली नसल्याचे दिसून येते.
Grape Harvest
Grape Harvest Agrowon

सध्याच्या परिस्थितीचा विचार करता, प्रत्येक ठिकाणच्या द्राक्ष बागेत दिवस आणि रात्रीच्या तापमानात वाढ होत आहे. या वेळी बागेत थंडी पाहिजे तितक्या प्रमाणात दिसत नाही.

म्हणजेच द्राक्ष वेलींच्या शरिरशास्त्रीय हालचालींचा वेग जास्त प्रमाणात वाढत नसला, तरी द्राक्ष मण्यांतील गोडीमध्ये वाढ होण्याची प्रक्रिया जलद गतीने होत आहे. या वेळी द्राक्ष बागेत महत्त्वाच्या गोष्टींवर लक्ष देणे गरजेचे आहे.
---------------
१) वाढत्या तापमानाचे परिणाम ः
सध्या दिवसाच्या तापमानात वाढ होताना दिसून येते. दिवसाचे तापमान जवळपास ३५ अंश सेल्सिअस, तर रात्रीचे तापमानदेखील १६ ते १७ अंश सेल्सिअसच्या पुढे आहे. या तापमानाचा परिणाम म्हणजे पानांमधून तसेच मुळांच्या कक्षेतून बाष्पीभवनाद्वारे पाणी निघून जाईल.

सध्या बागेत मण्यात गोडी आल्यानंतरचा ते फळ काढणीचा कालावधी सुरू आहे. अशा परिस्थितील बागेत घडाच्या विकासासाठी किंवा गोडी वाढण्याकरिता वेलीची पाण्याची गरज वाढेल.

प्रत्येक वेलीवर घडांची संख्या जास्त असल्यास त्यामध्ये गोडी येण्यास (साखर उतरण्यास) उशीर होईल. ही समस्या साधारणतः बऱ्याच बागेत दिसून येते. फळ काढणीला फक्त १० दिवसांचा कालावधी उरला असून, अजूनपर्यंत मण्यात अपेक्षित गोडी आली नसल्याचे दिसून येते.

घडांची संख्या आवश्यकतेपेक्षा जास्त असल्यास या अडचणीचा सामना करावा लागेल. बागेत जमिनीची तसेच पाण्याची स्थिती खराब असल्यास, वेलीस अन्नद्रव्ये उचलणे कठीण होते. त्यामुळे देखील मण्यांमध्ये गोडी येण्यास उशीर होतो.

या परिस्थितीत वेलीला पोटॅशची उपलब्धता करण्याच्या एक दिवसआधी पोटॅशिअम सोल्यूबिलायझिंग बॅक्टेरियाचा वापर केल्यास वेलीची खत उचलून घेण्याची क्षमता वाढेल. बऱ्याचशा बागेत मुळीसुद्धा कार्य करत नसल्याचे दिसून येते.

मुळी काळी पडली असेल तर दिलेल्या खतांचा फारसा उपयोग होत नाही. बोदाच्या बाजूने कुळवून घेतल्यास पुन्हा पांढरी मुळी तयार होण्याकरिता जितका उशीर होईल, तितक्या वेळेच्या आधी फळ काढणी करून घ्यावी लागेल. त्यामुळे मुळीची परिस्थिती पाहून निर्णय घ्यावा.

Grape Harvest
Grape Crop : द्राक्षातील साखर, आम्लता मोजण्याची पद्धत

बऱ्याचदा बागायतदार फळ काढणीच्या १५ दिवस आधीपासून बागेचे पाणी बंद करतात. यामागे द्राक्ष घड लवकर काढणीस येईल असा विचार असतो.

परंतु बागेत पाण्याचा तुटवडा जास्त झाल्यास व जमीन हलकी असेल तर वेलीची पाण्याची गरज आणि उपलब्धता यामधील समतोल बिघडेल.

परिणामी मण्यांची गळ होण्याची शक्यता वाढते. त्यासाठी बागेत वाफसा स्थिती कायम राहील अशाप्रकारे सिंचनाचे नियोजन करावे.

बागेत जास्त प्रमाणात पाणी दिले गेल्यास मण्यात गोडी येण्यास देखील उशीर होऊ शकतो. तसेच कमी पाणी अवस्थेत मण्याची देठाशी असलेली पकड ढिली होते.

परिणामी मणीगळ, मण्याचा सुकवा होणे इत्यादी समस्या दिसून येतात. बागेत पाणी कमी असल्यास मल्चिंगचा वापर करणे फायद्याचे ठरेल.

बोदावर काडीकचरा, उसाचे पाचट, बगॅस इत्यादींचा वापर मल्चिंगसाठी करता येईल. यामुळे बोदावर मोकळे वातावरण राहून मुळींची वाढ व्यवस्थित होईल.

२) फळ काढणीची तयारी ः
वाढत्या तापमानात फळ काढणी करणे म्हणजे मण्याची प्रत बिघडविणे होय. काढणीनंतर द्राक्षाची निर्यात किंवा स्थानिक बाजारपेठेत विक्रीसाठी पाठविण्याचे नियोजन करताना द्राक्ष मण्यांची प्रत टिकून राहणे अत्यंत आवश्यक असते.

द्राक्ष मण्यातील तापमान २० अंश सेल्सिअसपेक्षा कमी असलेली अवस्था म्हणजेच ‘फळकाढणीचा कालावधी’ होय. ही परिस्थिती साधारणतः सकाळी ११ ते ११.३० काढलेल्या द्राक्ष फळांमध्ये दिसून येईल. या वेळी मण्यातून पाणी निघून जाण्याची शक्यता कमी असते.

द्राक्ष फळांची प्रत टिकवून ठेवण्याच्या दृष्टीने द्राक्ष घडाची हाताळणी सुद्धा तितकीच महत्त्वाची आहे.

फळ काढणी करताना हातमोजांचा वापर, द्राक्ष घड क्रेटमध्ये एकामेकांवर पडणार नाहीत अशा प्रकारे ठेवणे म्हणजेच फळांची हाताळणी होय.

घडाच्या मण्यावर कोणतीही इजा होऊ नये याकरिता क्रेटच्या तळामध्ये कुशनिंग करणे गरजेचे आहे. कुशनिंगकरिता बबलशीटचा वापर करावा.

फळकाढणी झाल्यानंतर त्वरित द्राक्ष घड सावलीत ठेवणे अत्यंत गरजेचे आहे.


बऱ्याचशा बागेत सुकवा जास्त प्रमाणात दिसून येतो. सुकवा ही परिस्थिती वेलीवर घडांची संख्या जास्त असल्यामुळे दिसून येते.

फळ काढणीच्या १ ते २ दिवस आधी घडातील सुकलेले मणी, तडे गेलेले मणी, करप्याचे डाग असलेले मणी काढून घ्यावेत. जेणेकरून फळ काढणीच्या वेळी चांगल्या प्रतिचे द्राक्ष उपलब्ध होतील.

३) रिकटची तयारी ः
- द्राक्ष बागेत तापमान वाढत असल्याने वेलीच्या शरीरशास्त्रीय हालचालींचा वेग झपाट्याने वाढतो आहे. या परिस्थितीचा फायदा घेऊन बागेत रिकट घेणे गरजेचे असते. रिकट घेण्यापूर्वी पूर्वतयारी करणे गरजेचे आहे.

रिकट घेण्यापूर्वी बागेत वेलीला ८ ते १० दिवस पाण्याचा ताण देणे गरजेचे असेल. दोन वेलींमध्ये उपलब्ध अंतरावर ३ ते ४ इंच खोल चारी काढून घ्यावी. या चारीमध्ये शेणखत व शिफारशीनुसार अन्नद्रव्यांच्या मात्रा द्याव्यात.


- पहिल्या वर्षाच्या बागेत नवीन निघालेल्या फुटींवर फेरसची कमतरता जास्त प्रमाणात दिसून येते. यासाठी फेरस सल्फेट साधारण १० ते १२ किलो प्रति एकर याप्रमाणात चारीत मिसळून घ्यावे.

बऱ्याचशा द्राक्ष लागवडीखालील जमिनीत चुनखडीचे प्रमाण कमी अधिक दिसून येते. त्याकरिता सल्फर ४० ते ६० किलो प्रति एकर याप्रमाणे शेणखतात मिसळून बोदामध्ये टाकावे.

- रिकट घेतल्यानंतर एकसारखी फूट निघण्याकरिता पानगळ ही तितकीच महत्त्वाची असेल. वेलीला पाण्याचा ताण बसल्यास पानगळ लवकर होऊन डोळे फुटतील किंवा कलम जोडाच्या वर ज्या ठिकाणी रिकट घेणार आहोत, तेथील पाने हाताने गाळून घ्यावीत.

किंवा इथेफॉन ३ मिलि अधिक ०ः५२ः३४ हे ५ ग्रॅम प्रतिलिटर पाणी याप्रमाणे फवारणी करून घ्यावी. या कार्यवाहीमुळे पानगळ सहजरीत्या होईल. तसेच रिकट घेतल्यानंतर एकसारखी व लवकर फूट निघण्यास मदत होईल.

- डोळे एकाचवेळी फुटण्याकरिता हायड्रोजन सायनामाइड ३० ते ४० मिलि या प्रमाणे प्रतिलिटर पाण्यात मिसळून पेस्टिंग करावे. काडी जास्त जाड असल्यास तितक्याच मात्रेत दोन वेळा पेस्टिंग करावे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com