खरीप पीक व्यवस्थापनासाठी महत्वाच्या बाबी

खरीप पिकाची पेरणी करून दहा ते पंधरा दिवस झालेल्या पिकामध्ये मशागती योग्य परिस्थिती असल्यास लोखंडी कोळप्याने कोळपणी किंवा खुरपणी करावी
Kharif Crop Advisory
Kharif Crop AdvisoryAgrowon

हवामान विभागाच्या अंदाजानूसार मध्य महाराष्ट्र विभागात १० ते १६ ऑगस्ट दरम्यान पावसाचे प्रमाण सरासरी पेक्षा जास्त राहण्याची शक्यता आहे. कमाल तापमान सरासरी पेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे. तर किमान तापमान सरासरी इतके राहण्याची शक्यता आहे. महात्मा फुले कृषी विद्यापीठाने दिलेल्या सल्ल्यानूसार भात, सोयाबीन, मका, तूर, मूग, भेंडी, टोमॅटो, ऊस आणि केळी (Banana) पिकांमध्ये पुढील व्यवस्थापन करावे.

Kharif Crop Advisory
Crop Advisory : असे करा खरीप पिकांचे व्यवस्थापन

खरीप पिकाची पेरणी करून दहा ते पंधरा दिवस झालेल्या पिकामध्ये मशागती योग्य परिस्थिती असल्यास लोखंडी कोळप्याने कोळपणी किंवा खुरपणी करावी. त्यामुळे तण नियंत्रण व ओलावा टिकून राहण्यास मदत होईल.

भात पिकामध्ये नवीन लागवड केलेल्या भात खाचरात रोपे स्थिर होईपर्यंत पाण्याची पातळी एक ते दोन सेंमी ठेवावी. ज्या ठिकाणी लागवड केलेली रोपे प्राथमिक अवस्थेत आहेत तेथे दोन ते तीन सेमी पाण्याची पातळी ठेवावी. भात रोपांची पुनर्लागवड झालेल्या ठिकाणी तण नियंत्रणासाठी ब्युटाक्लोर (५० इसी) १.५ किलो पाचशे लिटर पाण्यात मिसळून लावणी नंतर एक आठवड्याच्या आत फवारावे. तणनाशक फवारणी पूर्वी खाचरातील संपूर्ण पाणी काढून टाकावे व दुसऱ्या दिवशी पुन्हा पाणी भरावे.

Kharif Crop Advisory
Paddy : चारसूत्री भात लागवड तंत्रज्ञान

सोयाबीन पीक सध्या वाढीच्या अवस्थेत आहे. सध्याच्या ढगाळ वातावरणामुळे पिकावर खोडमाशीचा प्रादुर्भाव आढळून आल्यास त्याच्या नियंत्रणासाठी क्लोरअॅन्ट्रानिलीप्रोल (१८.५ एस सी) २.५ मिली प्रति १० लिटर पाण्यातून पावसाची उघडीत पाहून फवारणी करावी. पाने खाणाऱ्या अळीच्या नियंत्रणासाठी पिकामध्ये हेक्टरी पाच याप्रमाणे स्पोडोल्यूर चा वापर करून फेरोमन सापळे लावावेत. शक्य असल्यास प्रकाश सापळ्यांचा वापर करावा.

मका पीक सध्या वाढीच्या अवस्थेत असून ढगाळ हवामानामुळे मका पिकात खोड किडीचा प्रादुर्भाव होत आहे. नियंत्रणासाठी फोरेट १० टक्के दाणेदार कीटकनाशक हेक्टरी १० किलो प्रमाणे मातीत मिसळावे. पेरणीनंतर ४० ते ४५ दिवसांनी नत्र ४० किलो प्रती हेक्टरी या प्रमाणात द्यावे.

तूर पिकात पेरणीनंतर उगवण न झाल्याने रिकाम्या जागी नांग्या भराव्यात. पेरणी झालेल्या क्षेत्रात योग्य रोपांची संख्या राखण्यासाठी पिकाची विरळणी करावी. जेणेकरून जमिनीतील ओलावा आणि अन्नद्रव्यांसाठी पिकांची स्पर्धा होणार नाही.

मूग पिकावर दमट हवामानामुळे रस शोषक किडींचा प्रादुर्भाव होत आहे. नियंत्रणासाठी दोन मिली इमिडाक्लोप्रीड (१७.८ टक्के ईसी) प्रति दहा लिटर पाण्यात मिसळून फवारावे. पेरणीनंतर वीस ते पंचवीस दिवसांनी पहिली आणि ३० ते ३५ दिवसांनी दुसरी कोळपणी करावी. कोळपणीनंतर दोन रोपातील तण काढण्यासाठी गरजेनुसार खुरपणी करावी.

भेंडी व टोमॅटोवरील फळ पोखरणाऱ्या अळीच्या व्यवस्थापनासाठी किडलेली फळे मातीत पुरून टाकावीत. डेल्टामेथ्रीन (२.८ टक्के इसी) ८ मिली किंवा क्वीनॉलफॉस (२५ टक्के ईसी) २० मिली किंवा लॅम्ब्डासायहॅलोथ्रीन (५ टक्के ईसी) ६ मिलि प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

Kharif Crop Advisory
Soybean : देशात सोयाबीन पेरणी घटली?

आडसाली ऊस लागवड करताना बुरशीजन्य रोग व खवले कीडीच्या प्रतिबंधासाठी उस बेणे लागवडीपूर्वी १० लिटर पाण्यात डायमिथोएट ३० टक्के प्रवाही २६५ मिली मिसळून दहा मिनिटांसाठी बुडवून ठेवावेत. असेटोबॅक्टर आणि स्फुरद विरघळविणारे जिवाणू संवर्धक अनुक्रमे १० किलो आणि १.२५ किलो प्रति १०० लिटर पाण्यात मिसळून तयार केलेल्या द्रावणात उसाच्या टिपऱ्या तीस मिनिट बुडून नंतर लागवड करावी. त्यामुळे नत्र खतांमध्ये ५० टक्क्यांची तर स्फुरद खतांमध्ये २५ टक्क्यांची बचत होते.

केळी बागेतील जमीन स्वच्छ व भुसभुशीत ठेवावी. त्याकरिता आडवी कुळवणी करावी. दर तीन महिने अंतराने टिचणी बांधणी करावी. झाडांना मातीची भर द्यावी. केळीच्या बुंध्यालगत अनेक पिले लागतात ती वेळच्यावेळी धारदार कोयत्याने कापून बागेबाहेर काढून टाकावीत. केळीची रोगग्रस्त पाने कापून बागेबाहेर नेऊन नष्ट करावीत. हिरवी पाने कापू नयेत. आवश्यकता भासल्यास झाडांना आधार द्यावा.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com