Flower farming : खेड तालुक्यातील महादेव मुंगसे यांनी केलीय चांगल्या प्रकारे फुलशेती

Polyhouse Flower Farming : पुणे जिल्ह्यांतील केळगाव (ता.खेड) येथील महादेव मुंगसे यांची दोन एकर शेती आहे. त्यापैकी १५ गुंठे क्षेत्रावर पॉलिहाऊस उभारणी करत फुलशेती करण्यास सुरवात केली.
Flower farming
Flower farmingAgrowon

शेतकरी : महादेव विठोबा मुंगसे

गाव : केळगाव, ता. खेड, जि. पुणे

एकूण शेती : दोन एकर

फुलशेती : १५ गुंठे (पॉलिहाऊस)

पुणे जिल्ह्यांतील केळगाव (ता.खेड) येथील महादेव मुंगसे यांची दोन एकर शेती आहे. त्यापैकी १५ गुंठे क्षेत्रावर पॉलिहाऊस उभारणी करत फुलशेती करण्यास सुरवात केली. सुरवातीला पॉलिहाऊसमध्ये शेवंती फुलांचे उत्पादन घेत होते.

मात्र, कालांतराने बाजारपेठेतील मागणी लक्षात घेऊन शेवंती फुलांचे लागवड कमी करून जिप्सी फिलिया या फुलांचे उत्पादन घेण्यास सुरवात केली. लागवडीनंतर साधारण १०० दिवसांनी म्हणजेच तीन महिन्यांत पांढरी, छोटी व आकर्षक फुले येतात. बाजारात या फुलांना दरही चांगले मिळतात.

लागवड क्षेत्रात वाढ

जिप्सी फिलिया या फुलांचा वापर मुख्यत्वे बुके तयार करण्यासाठी, वाढदिवस आणि लग्न समारंभात सजावटीसाठी केला जातो. अलीकडील काळात जिप्सी फिलिया फुलांना बाजारपेठेत चांगली मागणी असून दरही चांगले मिळत आहेत. मागणी आणि दराचा अभ्यास करून जिप्सी फिलीया लागवड क्षेत्रात वाढ करण्याचा निर्णय घेतला.

त्यानुसार जुलै, २०२१ मध्ये संपूर्ण पॉलिहाऊसमध्ये या फुलांची लागवड केली. त्यासाठी बंगलोर आणि तळेगाव आंबी येथील रोपवाटिकेतून रोपांची मागणी केली. एक रोप साधारण २५ रुपये दराने मिळाले. साधारणपणे १५ गुंठे क्षेत्रात साडेसात हजार रोपांची लागवड केली.

लागवडीनंतर तीन महिन्यांत फुले काढणीस येतात. कुटुंबातील सदस्यांच्या मदतीने एकाच वेळी काढणी, प्रतवारी आणि पॅकिंग ही कामे केली जातात. सुमारे एक महिने काढणीचा हंगाम चालतो. ही फुले रंगाला पांढरीशुभ्र आणि आकर्षक दिसतात. त्यामुळे विविध कार्यक्रमांमध्ये सजावटीसाठी यांचा वापर केला जातो.

Flower farming
Horticulture Scheme : ‘फळबाग-फुलशेती योजनेचा लाभ घ्या’

सेंद्रिय खतांवर भर

मागील काही महिन्यांपासून रासायनिक खतांचे भाव मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. त्यामुळे उत्पादन खर्च आणि बाजारभाव यांचे गणित बिघडले आहे. त्यामुळे शेती करणे जिकिरीचे होऊन बसले आहे. यावर पर्याय म्हणून सेंद्रिय आणि जैविक निविष्ठांच्या वापरावर भर दिला आहे. यामुळे रासायनिक खतांचा वापर कमी होण्यास मदत झाली आहे.

सिंचन व्यवस्थापन

सिंचनासाठी १ विहीर आणि १ बोअरवेल आहे. त्यातील उपलब्ध पाण्याचा वापर केला जातो. पिकाला दिवसाआड ठिबक सिंचन पद्धतीने पाणी दिले जाते. ठिबकद्वारेच खत व्यवस्थापन केले जाते.

कीड-रोग व्यवस्थापन

या फुलपिकावर प्रामुख्याने नागअळी आणि लाल कोळी या किडींचा प्रादुर्भाव दिसून येतो. त्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून शिफारशीत कीटकनाशकांची दर ५ दिवसांनी फवारणी केली जाते.

काढणी, उत्पादन

- जिप्सी फिलियाच्या दहा दांड्याची एक गड्डी बांधली जाते. फुलांची एक गड्डी साधारण २५० ते ३०० रुपयांना विकली जाते. सरासरी १५० रुपये दर मिळतो.

- दिवाळीनंतर लग्नसमारंभाच्या काळात फुलांना मोठी मागणी असते.

- फुलांची विक्री पुणे येथील गुलटेकडी मार्केट आणि पिंपरी चिंचवड फूल मार्केट या ठिकाणी केली जाते.

- एक हंगामात साधारणपणे २ ते अडीच हजार गड्डी फुलांच्या उत्पादन मिळते. असे वर्षभरात साधारण ३ हंगाम होतात. तिन्ही हंगाम मिळून ७ ते साडेसात हजार गड्डी फुलांचे उत्पादन होते. त्यातून वार्षिक ११ लाख २५ रुपयांचे उत्पन्न मिळते.

Flower farming
Flower Farming : शेतकरी नियोजन - फुलशेती

मागील महिनाभरातील कामकाज

- पिकामध्ये अतिरिक्त फांद्या आणि कीड-रोगग्रस्त फुटींची छाटणी केली. नवीन फुटवे फुटण्यासाठी पाण्याचा ताण दिला.

- पाण्याचा दिल्यानंतर गांडूळखत, ह्युमिक ॲसिड आणि सेंद्रिय खतांच्या मात्रा दिल्या.

- मागील काही दिवसांत तापमानात वाढ झाली होती. त्यासाठी लागवडीत दैनंदिन ठिबक सिंचन सुरुच होते. याशिवाय दिवसाआड स्प्रिंकलरचा वापर करण्यात आला.

- फुलशेतीत वाढलेले तण काढून स्वच्छता केली.

- वेळापत्रकानुसार खतांच्या मात्रा देणे सुरुच ठेवले.

आगामी नियोजन

- पुढील महिन्यात पाऊस सुरु होईल. यापूर्वी पॉलिहाऊसची डागडुजीची कामे केली जातील. पॉलिहाऊसच्या पेपरची दुरुस्ती केली जाईल.

- पावसाचे पाणी पॉलिहाऊसमध्ये येऊ नये, यासाठी योग्य ती खबरदारी घेतली जाईल.

- कीड-रोगांच्या प्रादुर्भावासाठी पिकाचे सातत्याने निरिक्षण केले जाईल. प्रादुर्भाव टाळण्यासाठी प्रतिबंधात्मक फवारण्या घेतल्या जातील.

- वेळापत्रकानुसार ठिबकद्वारे खतांच्या मात्रा दिल्या जातील.

- दर्जेदार फुलधारणा होण्यासाठी रोपांची योग्य काळजी घेतली जाईल. जेणेकरून बाजारभाव चांगला मिळेल.

संपर्क - महादेव विठोबा मुंगसे, ९७६७९१७६४२

(शब्दांकन : संदीप नवले)

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com