
गेल्या आठवड्यापासून सतत पाऊस पडत आहे. अशा परिस्थीतीत कपाशी पिकामधील अतिरिक्त पाण्याचा निचरा करावा. पाणी साचून राहिल्यामुळे मर किंवा मूळकूज (Rootrot) रोगाचा प्रादुर्भाव Disease Attack होण्याची शक्यता असते. सध्या बहुतांश भागात कपाशीचे पीक १० ते १५ दिवसांचे आहे. या अवस्थेत कपाशी पिकामध्ये तणांचा आणि रसशोषक किडीचा (Sucking Pest) प्रादुर्भाव दिसून येत आहे. त्याअनुशंगाने नागपूर येथील केंद्रिय कापूस संशोधन संस्थेने कपाशी पिकाच्या व्यवस्थापनामिषयी पुढील उपाययोजना सुचविलेल्या आहेत त्याचा अवलंब करावा.
काही ठिकाणी मॉन्सूनचे उशीरा आगमन झाल्यामुळे पेरणीला उशीर झाला आहे. ज्या ठिकाणी पेरणीयोग्य पाऊस झाला आहे आणि सिंचनाची सुविधा उपलब्ध झाली आहे त्याठिकाणी कपाशीची पेरणी सुरू आहे. तर बहुतांश भागात कपाशीचे पीक १० ते १५ दिवसांचे आहे.
बागायती संकरित कपाशीला नत्राचा पहिला हप्ता एकरी ४० किलो या प्रमाणे द्यावा. तर कोरडवाहू कपाशीला हेक्टरी ३० किलो याप्रमाणे नत्राचा पहिला हप्ता द्यावा. पाण्याचा निचरा झाल्यानंतर आणि पाऊस नसतानाच खताचा डोस द्यावा. त्यामुळे खताचा अपव्यय होणार नाही.
अतिरिक्त रोपांची विरळणी करुन ज्या ठिकाणी कपाशी रोपांची उगवण झाली नाही त्याठिकाणी नांगे भरुन घ्यावेत. कोळपणी आणि खुरपणी वेळेवर करावी जेणेकरुन तण आणि पिके यामध्ये स्पर्धा होणार नाही. शेत तणमुक्त ठेवण्याचा प्रयत्न करावा.
उगवणीपश्चात तण नियंत्रण कसे करावे ?
-रुंद पानाच्या तणाच्या नियंत्रणाकरिता पायरीथीयोबॅक सोडीअम (१० टक्के इसी) १२.५ ते १५ मिली किंवा पायरीथीयोबॅक सोडीअम (६ टक्के इसी) अधिक क्वीझालोफॉप इथाइल (१४ टक्के इसी) १५ मिली प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
-गवताळ तणाच्या नियंत्रणासाठी क्विझालोफॉप इथाइल (५ टक्के इसी) १५ मिली प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
रस शोषक किंडीचे नियंत्रण कसे करावे ?
-पांढरी माशी आणि तुडतुड्यांच्या नियंत्रणासाठी एकरी ८ ते १० चीकट सापळे लावावेत. फुलकिड्यांच्या नियंत्रणासाठी एकरी ८ ते १० निळे चीकट सापळे लावावेत.
-रस शोषक किडीचा प्रादुर्भाव आर्थिक नुकसान पातळीच्या वर गेला असल्यास ५ टक्के निंबोळी अर्क किंवा अझाडिरेक्टीन १५०० पीपीएम (०.१५ टक्के इसी) ५० मिली प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
-व्हर्टीसिलियम लेकॅनी या जैविक कि़डनाशकाची ४० ग्रॅम प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
-पूर्वहंगामी कपाशीमध्ये रसशोषक किडीच्या नियंत्रणासाठी ५ टक्के निंबोळी अर्काची फवारणी करावी.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.