कापूस पिकासाठी पाणी, अन्नद्रव्य व्यवस्थापन

कापूस पिकासाठी सर्व ठिकाणी समप्रमाणात पाणी देणाऱ्या दाब नियंत्रित ड्रीपरचा वापर करावा. शेतात सर्व ठिकाणी सारख्या प्रमाणात पाणी व खते मिळण्यासाठी जमिनीच्या प्रकारानुसार ठिबक नळीतील अंतर, ड्रीपरमधील अंतर व ड्रीपरचा ताशी प्रवाह योग्य असावा.
cotton
cottonagrowon

यशदीप गिरासे, अरुण देशमुख

कापसाच्या उत्तम वाढीसाठी चांगला निचरा होणारी मध्यम ते भारी जमीन निवडावी. ६ ते ७.५ दरम्यान सामू असणारी, उत्तम सेंद्रिय पदार्थ असलेली जमीन कापसाच्या (cotton)वाढीसाठी उपयुक्त असते.
ठिबक सिंचनामुळे पाण्याची उपलब्धता असेल तर पूर्वहंगामी लागवड शक्य होते. कमी पाण्यात मुळांशी योग्य ओलावा राखल्याने लवकर व एकसमान उगवण होऊन वाढ जोमदारपणे होते. फूल व पातींची संख्या भरपूर मिळते. बोंडाची वाढ उत्तम होते. पाणी, अन्नद्रव्ये कार्यक्षम मुळांच्या कक्षेत दिली गेल्याने त्यांचा पुरेपूर वापर होतो. पाण्यामध्ये ५० टक्के, खतामध्ये ३० टक्के आणि विजेमध्ये ४० टक्क्यांपर्यंत बचत होते. मजुरीमध्येही मोठ्या प्रमाणावर बचत होते. जमिनीतील पाणी व हवा यांचा समतोल राखला जातो. उत्पादनात ३० ते ४० टक्के वाढ होते.कापसासाठी इनलाइन ड्रीप (Inline drip)पद्धती वापरावी. ठिबक नळीपेक्षा ड्रीपरची निवड महत्त्वाची असते. सर्व ठिकाणी सम प्रमाणात पाणी देणाऱ्या दाब नियंत्रित ड्रीपरचा वापर करावा. शेतात सर्व ठिकाणी सारख्या प्रमाणात पाणी व खते मिळण्यासाठी जमिनीच्या प्रकारानुसार ठिबक नळीतील अंतर, ड्रीपरमधील अंतर व ड्रीपरचा ताशी प्रवाह योग्य असावा.

जमिनीच्या प्रकारानुसार ठिबक निवड
जमिनीचा प्रकार---हलकी – कमी खोल---मध्यम खोलीची ते जास्त खोलीची भारी जमीन---जास्त खोलीची भारी जमीन---ठिबक नळीतील अंतर---४ फूट ---४.५ फूट---५ फूट
ड्रीपरमधील अंतर---३० सेंमी---४० सेंमी---५० सेंमी
ड्रीपरचा ताशी प्रवाह---१ लिटर /तास---२ लिटर /तास---२ ते ३ लिटर /तास

शेताची लांबी १५० फुटांपर्यंत असेल तर १२ मिमी व्यासाची इनलाइन ठिबक सिंचन नळी वापरावी. शेताची लांबी १५० फूट ते २५० फुटांपर्यंत असेल तर १६ मिमी. व्यासाची नळी वापरावी. २५० फुटांपासून ते ३५० फुटांपर्यंत २० मिमी. व्यासाची नळी वापरावी.

ठिबक सिंचनाने पाणी व्यवस्थापन
१) कापूस पिकामध्ये मुळांशी योग्य तितकाच ओलावा असणे फारच महत्त्वाचे असते.
ठिबक सिंचनाखाली कापसाची पाण्याची गरज खालील सूत्राने काढली जाते.
पाण्याची गरज (मिमी.) = बाष्पीभवन (मिमी./दिन) × पीक गुणांक × बाष्पपात्र गुणांक
दर एकरी पाण्याची गरज = एकराचे क्षेत्रफळ (चौरस मीटर) × प्रति दिन पाण्याची गरज (मिमी.)
उदा. बाष्पीभवन (मिमी./दिन) जर ६ मिमी. असेल आणि पीक गुणांक ०.५ व बाष्पपात्र गुणांक जर ०.८ धरला तर एकरी पाण्याची गरज (लिटर/दिन) = ६ × ०.५ × ०.८ × ४००० = ९६०० लिटर.


कापूस पिकासाठी ठिबक सिंचनाखाली पाण्याची गरज

पीकवाढीची अवस्था---दिवस ---महिना ---पाण्याची गरज (मिमी.)---पाण्याची गरज (लिटर / दिन/ एकर)
उगवण---१ ते १५---जून---२---८,०००
शाकीय वाढ---१६ ते ३० ---जून -जुलै ---३.५---१४,०००
पाते लागणे---३१ ते ६० ---जुलै -ऑगस्ट ---५---२०,०००
फुलोरा येणे, बोंड तयार होणे--- ---६१ ते १०० ---ऑगस्ट – सप्टेंबर ---५.५ ---२२,०००
---९१ ते ११० ---सप्टेंबर ---५.५---२२,२००
बोंड वाढणे---१११ ते १६०---सप्टेंबर- नोव्हेंबर ---४ ---
२०,०००
बोंड फुटणे- पक्वता ---१७१ ते २१०---डिसेंबर- जानेवारी ---३.५---१४,०००
टीप ः
१) आपल्या विभागातील तापमान आणि बाष्पीभवनानुसार पाण्याची गरज बदलते.
२) कापसाची ८० टक्के मुळे ५० सेंमी खोलीपर्यंत असतात. त्यामुळे जास्त खोलीवर पाणी आणि अन्नद्रव्ये देऊ नयेत.


खत व्यवस्थापन ः

१) ठिबकद्वारे मुळांच्या कक्षेतच खते पोहोचवली जातात. खताचा निचरा होऊन खते वाया जात नाहीत.
२) जमिनीमध्ये हवा, अन्न आणि पाणी यांचा योग्य समतोल राखला जातो. जमीन कायमस्वरूपी वाफसा अवस्थेत राहते. खते ग्रहण करण्याच्या क्षमतेत वाढ होते. योग्य खते योग्य वेळी दिली जातात.
३) कमी पीपीएम पातळीची खते जास्त परिणामकारक असतात. त्याचे जास्त प्रमाणात ग्रहण केले जाते
दररोज आणि वारंवार खते दिल्याने पीक उत्पादनात वाढ होते.
४) कापूस पिकाच्या योग्य वाढीसाठी १८ अन्नद्रव्यांची गरज असते. त्यामुळे पिकाचे योग्य खत व्यवस्थापन करायचे असेल तर पीक वाढीच्या अवस्थेनुसार कमी जास्त प्रमाणात प्रत्येक अन्नद्रव्य योग्य वेळी देणे फारच गरजेचे आहे.
मुख्य अन्नद्रव्य - नत्र, स्फुरद, पालाश.
दुय्यम अन्नद्रव्य - कॅल्शिअम, मॅग्नेशिअम, सल्फर.
सूक्ष्म अन्नद्रव्य - झिंक, बोरॉन, कॉपर, फेरस, मॅंगेनीज, मॉलिब्डेनम, क्लोरिन, सिलिकॉन, निकेल.
नैसर्गिक अन्नद्रव्य -कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन
५) खत व्यवस्थापन करण्यापूर्वी माती परिक्षण आणि सामू तपासावा. त्यानुसार खताचे नियोजन करता येते.

संपर्क ः अरुण देशमुख, ९५४५४५६९०२
(प्रमुख, कृषी विद्या विभाग, नेटाफिम इरिगेशन इंडिया प्रा.लि., पुणे)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com