सुदृढ बालकांसाठी स्तनदा मातांना पोषक आहार अत्यावश्यक

ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये जागतिक स्तन्यपान सप्ताह साजरा केला जातो. मातृत्त्वामुळे स्त्रियांच्या आयुष्याला पूर्णत्व आल्याचे मानले जाते. मूल जन्माला आल्यानंतर आईने बाळाला पाजलेले दूध हे अमृतासमान असते.
Breastfeeding mothers need a nutritious diet for healthy babies
Breastfeeding mothers need a nutritious diet for healthy babies

ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये जागतिक स्तन्यपान सप्ताह साजरा केला जातो. मातृत्त्वामुळे स्त्रियांच्या आयुष्याला पूर्णत्व आल्याचे मानले जाते. मूल जन्माला आल्यानंतर आईने बाळाला पाजलेले दूध हे अमृतासमान असते. आईच्या पहिल्या दुधातून मिळणारे पोषण घटक मुलांच्या आयुष्यभराच्या आरोग्यासाठी फायदेशीर असल्याचे अनेक संशोधनातून पुढे आले आहे. मुलांच्या वाढ, विकास व निरोगीपणा यासाठी आवश्यक असणारे पोषण त्यातून मिळते. एखाद्या समाजाचे आर्थिक, सामाजिक मूल्यमापन करण्याचा एक मार्ग म्हणजे या समाजातील लहान मुलामुलींच्या पोषणाचे मूल्यमापन होय. अनेक देशांमध्ये संतुलित, स्वच्छ आणि पुरेशा अन्नाअभावी मुलांमध्ये कुपोषणाचे मोठे प्रमाण दिसते. योग्य अन्नाअभावी मुलांची शारीरिक व बौद्धिक वाढ खुंटते. रोगाचा मुकाबला करण्याची शक्ती कमी होते. लहानपणी कुपोषण, खुरटलेली वाढ आणि रोगटपणा ज्या मुलांच्या मागे लागतो, तो मोठेपणातही सहसा पाठ सोडत नाही. मुले मोठी झाल्यानंतरही त्यांची काम करण्याची शक्ती, रोगप्रतिकारशक्ती कमी राहते. म्हणून लहानपणापासून योग्य व समतोल आहार महत्त्वाचा आहे. बाळाच्या सुदृढ आरोग्यासाठी मातेनेही सकस आहार घेणे गरजेचे आहे. हेच पोषक घटक आईच्या दुधामार्फत बाळांना मिळतात. स्तन्यपानाच्या काळात मातेचा आहार हा सकस व पोषक असला पाहिजे. अन्यथा, आईचे आरोग्य आणि बाळांचा विकास या दोन्हींवर परिणाम होतो. स्तनदा मातेला नेहमीपेक्षा जास्त उष्मांकाची आणि प्रथिनांची आवश्यकता असते. म्हणूनच त्यांच्या आहारात पुढील घटकांचा समावेश असावा. प्रथिनयुक्त पदार्थ  धान्य - कडधान्य धान्य, डाळी, सुकामेवा, ताजी फळे, भाज्या हे प्रथिनांचे उत्तम स्रोत आहेत. स्तनदा मातांच्या आहारात या या प्रथिनयुक्त पदार्थांचा आहारात जरूर समावेश करावा. लोहयुक्त पदार्थ 

 • लोह सर्व शरीराला प्राणवायूचा पुरवठा करते. पेशींमधील महत्त्वाच्या कार्यांना चालना देते. प्रसूतीनंतर महिलांच्या आहारात लोहयुक्त पदार्थांचा समावेश असावा. लोह हिरव्या पालेभाज्या, पूर्ण धान्य, सुकामेवा, कलिंगड, अंड्यातील पिवळा बलक, बीट अशा पदार्थांतून मिळते. त्यांच्या आहारातील समावेशामुळे प्रसूती काळात निर्माण झालेली रक्ताची कमतरता भरून निघते.
 • अन्नातील लोह शरीरामध्ये उत्तम प्रकारे शोषले जाण्यासाठी क जीवनसत्त्वयुक्त पदार्थ उपयुक्त ठरतात. त्यांचाही समावेश रोजच्या आहारात नक्की करावा. उदा. संत्रे, मोसंबी, लिंबू, आवळा इ. या पदार्थांमुळे जेवणाला चवही येते.
 • ‘ड’ जीवनसत्त्व  ‘ड’ जीवनसत्त्व हे संपूर्ण आरोग्य आणि हाडांच्या विकासासाठी महत्त्वाचे असते. कॅल्शिअम शरीरात शोषले जाण्यासाठी ‘ड’ जीवनसत्त्वाची गरज असते. सकाळच्या कोवळ्या उन्हात बसल्यास आपल्या त्वचेखाली ड जीवनसत्त्व तयार होते. सकाळच्या कोवळ्या उन्हामध्ये स्तनदा माता व लहान मुलांना थोडावेळ तरी जरूर बसावे. आरोग्यासह कोणत्याही कारणामुळे उन्हात जाणे शक्य नसल्यास व नियमितपणे त्यांनी ‘ड’ जीवनसत्त्व देणाऱ्या पदार्थांचा आहारात वापर करावा. उदा. मासे आणि अंडी, अळिंबी इ.. झिंक  जस्त (झिंक) शरीराच्या उत्तम वाढीसाठी, मेंदू आणि चेतासंस्था निर्मितीस सहायक आहे. त्यामुळे अनेक आजार लवकर बरे होण्यास मदत होते. त्याची पूर्तता केळी, पूर्ण धान्ये, काजू, बदाम, मोड आलेली धान्ये, दुग्धजन्य पदार्थ यातून होऊ शकते. बीटा कॅरोटीनयुक्त पदार्थ  पिवळा, लाल आणि नारंगी रंगाच्या पदार्थांमध्ये बीटा कॅरोटीन असते. स्तनदा मातांच्या आहारामध्ये त्यांचा समावेश करावा. उदा. गाजर हे बीटा कॅरोटीनचा उत्तम स्रोत आहे. पौष्टिक आहार  स्तनदा मातांच्या दिवसातील पहिला आहार किंवा सकाळची न्याहरी ही पौष्टिक पदार्थांनी परिपूर्ण असावी. त्याच प्रमाणे जेवणांच्या मध्येही आठवणीने पौष्टिक पदार्थ थोडे थोडे खावेत. उदा. राजगिरा खीर, नागली शिरा, कडधान्याची उसळ, डिंकाचे लाडू, आळीव-खोबरे लाडू, आळीव खीर, खसखस वड्या, खीर अशा पदार्थामुळे दुधाचे प्रमाण वाढण्यास मदत होते. तोंडाला चव यावी म्हणून आणि पौष्टिक म्हणून तीळ जवस आणि कारळ्याच्या (खुरासणीची) चटणी तोंडी लावण्यास द्यावी. पाण्याचे योग्य प्रमाण  मानवी शरीरासाठी दर काही वेळाने पाणी नक्की प्यावे. त्याच प्रमाणे विविध फळांचे रस, सरबते यांचे सेवन करावे. कारण बाळासाठी दूधनिर्मितीच्या प्रक्रियेमध्ये पाणी वापरले जात असते. त्याची पूर्तता करणे आवश्यक आहे. स्तन्यपानाचे मातेला होणारे फायदे 

 • स्तन्यपानामुळे स्तनाच्या कर्करोगाचे प्रमाण कमी होते.
 • स्तन्यपानाने आईच्या आरोग्यावर सकारात्मक परिणाम होतात.
 • आईचे आणि बाळाचे नाते दृढ होण्यास अधिक मदत होते.
 • स्तन्यपानामुळे बाळाला होणारे फायदे  आईचे दूध हे अर्भकांसाठी सर्वोत्तम पेय आहे. त्यातून जीवनसत्त्वे, प्रथिने आणि बाळाच्या वाढीसाठी आवश्यक असणारी चरबी या सर्व घटक योग्य व संतुलित प्रमाणात मिळतात. त्यात बरीच प्रतिबंधात्मक द्रव्ये (antibodies) असून, त्यामुळे बाळाची प्रतिकारक्षमता वाढते. बाह्य जंतुसंसर्ग, ॲलर्जी व रोगांना प्रतिकार करणे शक्य होते. या दुधामुळे अस्थमा व दमा होण्याची शक्यता कमी होते. मुलांच्या मेंदूचा व शरीराचा विकास चांगल्या प्रकारे होण्यास मदत होते. - शुभांगी वाटाणे, ९४०४०७५३९७ (कार्यक्रम सहायक गृहविज्ञान, कृषी विज्ञान केंद्र, वाशीम)

  Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

  ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

  Related Stories

  No stories found.
  Agrowon
  www.agrowon.com