पूरक उद्योगातून महिला गट झाला सक्षम

ग्रामीण भागातील महिलांना योग्य प्रशिक्षण, मार्गदर्शन मिळाले तर त्या आर्थिकदृष्ट्या सक्षम होऊ शकतात, त्यांच्या कुटुंबाला उदरनिर्वाहाचे साधन मिळते हे चिपळूण (जि. रत्नागिरी) तालुक्यातील कोळकेवाडी-जोशीवाडीतील महालक्ष्मी स्वयंसाह्यता महिला समूहाने दाखवून दिले आहे.
पूरक उद्योगातून महिला गट झाला सक्षम
vegetable cultivation

ग्रामीण भागातील महिलांना योग्य प्रशिक्षण, मार्गदर्शन मिळाले तर त्या आर्थिकदृष्ट्या सक्षम होऊ शकतात, त्यांच्या कुटुंबाला उदरनिर्वाहाचे साधन मिळते हे चिपळूण (जि. रत्नागिरी) तालुक्यातील कोळकेवाडी-जोशीवाडीतील महालक्ष्मी स्वयंसाह्यता महिला समूहाने दाखवून दिले आहे. समूहाच्या माध्यमातून एकत्र आलेल्या या महिलांनी भाजीपाला लागवड, कुक्कुटपालन, दुग्धोत्पादनासह टेलरिंगच्या माध्यमातून उत्पन्नाचे कायमस्वरूपी साधन मिळवले आहे.

रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यामधील   कोळकेवाडी-जोशीवाडी येथील महिलांनी एकत्र येऊन महालक्ष्मी स्वयंसाह्यता महिला समूह स्थापन केला. यापूर्वी २०१७ मध्ये उमेदच्या वर्धिनींनी कोळकेवाडीत सर्वेक्षण केले होते. त्या वेळी झालेल्या प्रशिक्षणावेळी स्वयंसाह्यता महिला समूह संकल्पना पुढे आली. सुरुवातीला याबाबत संभ्रमाचे वातावरण होते. वाडीतील सई समीर राणे यांनी पुढाकार घेत महिलांना एकत्रित केले. त्यानंतर जून २०१७ मध्ये महालक्ष्मी स्वयंसाह्यता महिला समूहाची स्थापना करण्यात आली.यामध्ये अकरा महिला एकत्रित आल्या आहेत. बँक खात्यासह विविध माहिती महिलांना मिळाल्यानंतर बचतीसाठी आठवड्याला २५ रुपये जमा करण्याचा निर्णय झाला. सध्या महालक्ष्मी स्वयंसाह्यता महिला समूहामध्ये सई समीर राणे (अध्यक्ष), सायली करुमेश राणे (उपाध्यक्ष), रूपाली संचित राणे (सचिव), पूर्वा अमोल पंडव, सावित्री सहदेव राणे, सुजाता सुभाष राणे, गार्गी गणेश खेराडे, अंकिता अशोक कदम, अक्षता महेंद्र कदम, ज्योत्स्ना जर्नादन कदम, श्रीमती सुवर्णा चंद्रकांत राणे या महिला कार्यरत आहेत. व्यावसायिक सुरुवात  समूहातील महिलांनी एकत्र येऊन पहिल्या वर्षी दिवाळी फराळ तयार करून विकला. गटातील दहा सदस्यांनी भाजीपाला लागवडीला सुरुवात केली. काही सदस्यांनी पापड तयार करून चिपळूण येथे झालेल्या महोत्सवात विक्री केली.  समूहाने बॅंकेतून पहिल्या वर्षी एक लाख रुपयांचे कर्ज घेतले होते. त्यामधून महिलांनी भाजीपाला बियाणे, शिलाई यंत्र, म्हशींची खरेदी, कुक्कुटपालनाला सुरुवात केली. यंदा समूहाने व्यवसाय वृद्धीसाठी सहा लाखांचा कर्ज प्रस्ताव केला होतो, तो मंजूरदेखील झाला. या कर्जातून गटातील महिलांनी फळबाग लावगडीसह शेतीसाठी यांत्रिकीकरणाला चालना दिली आहे. म्हैसपालन, कुक्कुटपालनाला चालना समूहातील प्रत्येक महिलेच्या हाताला रोजगार मिळावा यादृष्टीने नियोजन करण्यात आले आहे.दोन सदस्यांनी प्रत्येकी दोन म्हशी घेऊन दुग्धोत्पादन व्यवसायाला सुरुवात केली. सध्या दिवसाला सरासरी १० ते १२ लिटर दुधाचे संकलन होते. गावामध्ये प्रति लिटर ४० ते ५० रुपये दराने दुधाची विक्री होते.  सुजाता राणे, सायली राणे यांना पंचायत समितीच्या योजनेतून प्रत्येकी १०० सुधारित गावरान जातीच्या कोंबडीची पिले अनुदानावर घेतली. त्यामध्ये गटातील अन्य सदस्यांनीही सहकार्य केले. गावामध्ये सरासरी तीनशे ते साडेतीनशे रुपये दराने एका कोंबडीची विक्री होते. याच महिला कोंबड्यांना लसीकरण आणि खाद्य नियोजन करतात. कोंबडी खाद्यासाठी गहू आणि भरड्याचा वापर केला जातो. तीन महिन्यांनी दहा ते पंधरा हजार रुपयांचा फायदा कोंबडीपालनातून मिळत आहे. गांडूळ खतनिर्मिती 

 •   भाजीपाला पिकांसाठी सेंद्रिय खतांचा जास्तीत वापर केला जातो. सदस्यांना पंचायत समिती आणि आयसीआयसीआय बँक फाउंडेशन यांच्या माध्यमातून सेंद्रिय खते बनविण्याचे प्रशिक्षण मिळाले.  
 •   प्रत्येक महिलेच्या घरी खड्डा पद्धतीने गांडूळ खत बनविले जाते. या महिला गाईचे शेण, गोमूत्र, गूळ, बेसन एकत्र करून जिवामृत बनवतात. 
 •   लागवड केल्यानंतर १५ दिवसांच्या अंतराने शेणखत, गांडूळ खत आणि जिवामृताची मात्रा दिली जाते. पालेभाज्यांसाठी शेणखताची मात्रा दिली जाते.
 • भाजीपाला उत्पादनातून उदरनिर्वाह प्रत्येक महिलेकडे भातशेती आहे. भातशेती संपल्यानंतर सदस्या जानेवारी महिन्यात भाजीपाला लागवडीस सुरुवात करतात.  पुढील तीन महिने भाजीपाल्याचे उत्पादन घेतले जाते. सध्या सई राणे, अक्षता कदम, सुजाता राणे यांनी भाजीपाला लागवडीवर भर दिला आहे. घराच्या परिसरातील मोकळ्या जागेवर गेली तीन वर्षे हंगामानुसार लाल माठ, मेथी, कोथिंबीर, मुळा, भेंडी, गावार, टोमॅटो, वांगी, काकडी, दोडकी, दुधी, कारली, घेवडा यांसारख्या भाज्यांची लागवड केली जाते. भाजीपाल्याची गावशिवारामध्येच विक्री होते.

  शिवणकामातून रोजगारनिर्मिती  एकाच व्यवसायावर अवलंबून न राहता गटातील पाच महिलांनी शिवणकामाचे प्रशिक्षण घेतले. त्यामधून उत्पन्नाचे नवीन साधन तयार झाले. कोरोना प्रादुर्भावाच्या काळात महिलांनी दीड ते दोन हजार मास्क तयार केले. एक मास्क १५ रुपयांना विकला. मास्कनिर्मितीमध्ये गटातील अन्य महिलांनाही सहभागी करून घेतले. त्यातून लॉकडाउनच्या काळात उत्पन्नाचे साधनही मिळाले. जानेवारी महिन्यात संक्रांतीला हळदी-कुंकू आयोजित केले. या वेळी महिलांना भेटी दिल्या जातात. त्यासाठी महिलांनी ५० डझन पर्स तयार करून विक्री केली. यातूनही चांगला नफा महिलांना मिळाला.

  ‘उमेद’ची मिळाली साथ ‘उमेद’अंतर्गत महिला सक्षमीकरणाचे पाऊल उचलले गेले. चिपळूणचे विस्तार अधिकारी भास्कर कांबळी, उमेदचे अधिकारी अमोल काटकर, विलास वाघ यांचे मोलाचे मार्गदर्शन महिलांना मिळाले आहे. विविध उपक्रमांतून सदस्यांना पहिल्या वर्षी सर्वसाधारण २० हजार रुपये उत्पन्न मिळाले होते. गेल्या तीन वर्षांत त्यात वाढ झाली असून, हे उत्पन्न चाळीस ते पन्नास हजारांपर्यंत पोहोचले आहे, अशी माहिती सई राणे यांनी दिली. 

  समूह गटातून गावातील  महिला सक्षम होऊ लागल्या आहेत. बँकेचे व्यवहार त्या स्वतःच करतात. घरकामात गुंतणाऱ्या  महिला आता पूरक उद्योगात रमल्या आहेत. ग्रामपंचायतीमध्ये जाऊन स्वतःचे मत मांडत आहे. महालक्ष्मी स्वयंसाह्यता महिला समूहातून  शेती आणि पूरक उद्योगाला गती दिली आहे. - सई समीर राणे, ७२१८८५११४३

  Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

  ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

  Related Stories

  No stories found.