सविताताईंनी जिद्दीने ठरविले की लढायचे

संकटाच्या चक्रव्यूहात सापडलेल्या आडगाव (जि. नाशिक) येथील सविता आत्माराम लभडे यांनी मोठ्या हिकमतीने शेती सावरलीच, त्याचबरोबरीने पूरक उद्योगातून आर्थिक सक्षमताही मिळविली.
सविताताईंनी जिद्दीने ठरविले की लढायचे
सविताताईंनी जिद्दीने ठरविले की लढायचे

पतीचे हृदविकाराने झालेले निधन, डोक्यावर सात लाखांचे कर्ज, दोन मुलांचे शिक्षण, उजाड झालेली शेती आणि कर्जवसुलीसाठी वित्तसंस्थेकडून जमीन विक्रीची नोटीस अशा संकटाच्या चक्रव्यूहात सापडलेल्या आडगाव (जि. नाशिक) येथील सविता आत्माराम लभडे यांनी मोठ्या हिकमतीने शेती सावरलीच, त्याचबरोबरीने पूरक उद्योगातून आर्थिक सक्षमताही मिळविली.

नाशिक जिल्ह्यातील आडगाव शिवारात आत्माराम लभडे यांच्यासोबत देवळाली जवळील संसरी गावच्या शेतकरी कुटुंबातील सविताताईंचा विवाह झाला. पतीसोबत शेतीत पहिल्या दिवसापासून त्या मदतीला होत्या. पण काही कारणास्तव शेती तोट्यात गेली आणि अडचणी सुरू झाल्या. ‘‘आमची शेती अडीच एकर. कर्ज खूप झालेले. २००८ मध्ये पतीचे हृदविकाराने निधन झाल्याने आमच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला. मुलगा धीरज चौथीमध्ये आणि मुलगी साधना दुसरीमध्ये होती. शेती आणि संसारासाठी घेतलेले पतसंस्था, सोसायटी कर्ज सात लाखांचे होते. पण मी जिद्दीने ठरविले की लढायचे. माघार घ्यायची नाही. रडत बसायचे नाही.’’ सविताताई आपली संघर्ष कहाणी सांगत होत्या. पतीच्या निधनानंतर सविताताईंना पहिली एक एकरावरील द्राक्ष बाग तोडावी लागली, कारण बाग उभारणीसाठी भांडवलच नव्हते. त्यांनी भाजीपाला पिकाकडे मोर्चा वळवला. पहिले पीक दोडक्याचे घेतले. विकण्यासाठी त्या स्वतः बाजार समितीत गेल्या. मुलीच्या शेती संघर्षाला हातभार लावण्यासाठी त्यांची आई श्रीमती द्रौपदाबाई आपले गाव सोडून मुलीकडेच राहायला आल्या. मुलीबरोबर शेतीत कामे करू लागल्या. मुलांच्या संगोपनाचीही जबाबदारी त्यांनी घेतली.

कांडपयंत्राचा जोडधंदा मिरची कांडप व्यवसायाबाबत सविताताई म्हणाल्या, की माझे शिक्षण आठवी झालेले. पण घरधन्याचे छत्र हरपल्याने मला लवकर व्यवहार कळू लागला. मी सर्व प्रकारचा भाजीपाला पिकवून स्वतः मार्केटला नेत होते. दर आठवड्याला दीड हजार रुपये बाजूला काढत होते. पण जगण्यासाठी हे पुरेसे नव्हते. मी मिरची कांडपयंत्राचा जोडधंदा सुरू करण्याचा निर्णय घेतला. नवे यंत्र ६५ हजार रुपयांचे होते. तितके पैसे नव्हते. मी दहा हजार रुपये साठवले होते. शेवटी सोन्याची पोत विकली आणि जमलेल्या ३५ हजारांत एक जुने कांडपयंत्र मी विकत घेतले. मिरची कांडपाबाबत त्यांनी काहीही प्रशिक्षण घेतले नव्हते. पहिल्या दिवशी यंत्रात मिरची कुटायला टाकली आणि हातपाय, डोळ्यांची आग सुरू झाली. ‘‘मिरचीमुळे होणाऱ्या शारीरिक त्रासाला मी खूप वैतागले होते. यंत्र विकून पुन्हा शेती करावी, असा विचार येत होता. पण डोळ्यासमोर पुन्हा कर्ज, शेतजमिनीचा लिलाव, दोन मुलांचे शिक्षण असे चित्र दिसले. मी निर्धाराने पुन्हा कांडपयंत्राचे काम सुरू केले. अविरत कष्टातून पहिले दीड लाखाचे कर्ज २०१३ मध्ये फेडले. दुसऱ्याच वर्षी विविध कार्यकारी सोसायट्यांचेही कर्ज फेडले.’’ असे सविताताई सांगतात.

शेतीला पशुपालनाची जोड सध्या अडीच एकरामध्ये सविताताईंनी ऊस लागवड केली आहे. शेतीला जोडधंदा म्हणून त्यांनी  पाच होल्स्टिन फ्रिजियन गाई घेतल्या आहेत. सध्या डेअरीला २० लिटर दूध दिले जाते. यंदा जवळपास सगळे कर्ज त्यांनी फेडले आहे. सविताताईंनी घराशेजारी एक जनरल स्टोअरदेखील सुरू केले आहे.     सविताताई म्हणतात, ‘‘मी स्वतःहून पायांवर उभी राहिले तसे इतर शेतकरी महिलांनी देखील उभे राहावे. कर्जवसुलीचे पथक दारात आल्यावर मला कोणीच मदत केली नाही. तो दिवस माझ्यासाठी सर्वांत वाईट होता. पण मी झुंज दिली.  कर्जाची रक्कम जेव्हा चुकती केली, तो दिवस सर्वांत आनंदाचा होता.’’  - श्रीमती सविता लभडे, ९६८९३६६१९७

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com