शेतीला मिळाली बचत गटाची साथ

शेणे (ता. वाळवा, जि. सांगली) येथील सुनंदा उदयसिंह पाटील यांनी कामधेनू बचत गटाच्या माध्यमातून सेंद्रिय गूळ, काकवी, तसेच शेतीमाल विक्रीसाठी हक्काची बाजारपेठ मिळवली आहे.
women self help group members
women self help group members

शेणे (ता. वाळवा, जि. सांगली) येथील सुनंदा उदयसिंह पाटील यांनी कामधेनू बचत गटाच्या माध्यमातून सेंद्रिय गूळ, काकवी, तसेच शेतीमाल विक्रीसाठी हक्काची बाजारपेठ मिळवली आहे. ग्राहकांची मागणी लक्षात घेऊन देशी गोपालन, कुक्कुटपालनास सुरुवात केली आहे.

पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गावर कासेगावच्या पश्‍चिमेला तीन किलोमीटरवर शेणे गावशिवार आहे. या गावातील सुनंदा आणि उदयसिंह पाटील हे प्रयोगशील शेतकरी जोडपे. उदयसिंह यांचे शिक्षण पदवीपर्यंत झाले आहे. लहानपणापासून त्यांना शेतीची आवड असल्याने शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी दहा एकर शेतीच्या व्यवस्थापनाकडे लक्ष देण्यास सुरुवात केली. शेतीमधील प्रयोगांना सुनंदाताईंची चांगली साथ मिळाली.  जमीन सुपीकतेला प्राधान्य शेती आणि पीक नियोजनाबाबत विविध ठिकाणाहून माहिती घेत असताना पाटील कुटुंबीयांचा संपर्क कणेरी मठातील तज्ज्ञांशी आला. तेथील तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार त्यांनी सात वर्षांपासून सेंद्रिय पद्धतीने पीक व्यवस्थापनाला सुरुवात केली. रासायनिक खतांचा वापर पूर्णपणे बंद केला. उसाचा पाला न पेटवता आच्छादन सुरू केले. शून्य मशागत तंत्रावर भर दिला. यासोबतच जमीन सुपीकतेसाठी हिरवळीची पिके, गांडूळ खत, शेणखत, जिवामृत, वेस्ट डी कंपोजरचा वापर नियमितपणे सुरू केला. पीक व्यवस्थापनामध्ये रासायनिक कीटकनाशकांच्या ऐवजी दशपर्णी अर्क, निंबोळी अर्क वापरण्यास सुरुवात केली. सुरुवातीला पीक उत्पादनात अपेक्षित वाढ झाली नाही, परंतु पाटील दांपत्याने प्रयत्न सोडले नाहीत. टप्प्याटप्प्याने त्यांना पीक उत्पादन आणि गुणवत्तेमध्ये देखील चांगली वाढ मिळाली. त्याचा चांगला आर्थिक फायदा मिळू लागला. सध्या पाच एकर ऊस, आणि हळद २० गुंठे क्षेत्रावर आहे. उसाचे एकरी साठ टन उत्पादन मिळते.याचबरोबरीने मूग, उडीद, चवळीचे आंतरपीक घेतले जाते. शेती व्यवस्थापनात अवधूत आणि अनिकेत या मुलांची देखील चांगली साथ मिळते. कामधेनू बचत गटाची स्थापना  शेतीच्या बरोबरीने सुनंदा पाटील यांनी गावातील अकरा महिलांना एकत्र करून पूरक उद्योगाला चालना देण्यासाठी दोन वर्षांपूर्वी राष्ट्रीय जीवन उन्नती अभियानाच्या माध्यमातून कामधेनू महिला बचत गटाची स्थापना केली. गटाच्या माध्यमातून जमीन सुपीकता, सेंद्रिय पद्धतीने शेती, गूळ प्रक्रिया, कुक्कुटपालन आणि देशी गोपालनाला चालना दिली आहे. सध्या प्रत्येक सदस्याकडे एक देशी गाय आहे. दोन महिलांनी कुक्कुटपालन सुरू केले आहे. गूळ आणि काकवी उत्पादन  कामधेनू बचत गटाची स्थापना झाल्यावर शेती पूरक उद्योगांना गटाने चालना दिली. पाटील दांपत्याने दोन वर्षांपासून गूळ आणि काकवी उत्पादनाला सुरुवात केली. सेंद्रिय पद्धतीने उत्पादित ऊस तांबवे येथील ओळखीच्या गुऱ्हाळ घरात नेऊन त्यापासून गूळ आणि काकवी निर्मिती केली जाते. गेल्या वर्षी दीड टन आणि यंदाच्या वर्षी साडेतीन टन गूळ, शंभर लिटर काकवी आणि १०० किलो गूळ क्यूबची विक्री झाली. साधारणपणे ७० रुपये किलो गूळ, क्यूब १०० रुपये किलो आणि १०० रुपये लिटर दराने काकवी विक्री होते. यंदाच्या वर्षी गूळ, काकवी विक्रीतून एक लाख रुपये आणि कडधान्य विक्रीतून २० हजारांची उलाढाल झाली. विक्रीच्या दृष्टीने त्यांनी उत्पादनांचे प्रमाणपत्र घेतले आहे.  गूळ, काकवी पॅकिंगसाठी बचत गटातील महिलांची चांगली मदत होते. त्यांना योग्य मोबदला दिला जातो. गटातील सदस्यांनी देखील सेंद्रिय पद्धतीने ऊस व्यवस्थापन आणि गूळनिर्मितीचे नियोजन केले आहे. गटाच्या माध्यमातून पाटील यांनी परिसरातील गावे, तसेच पुणे, मुंबई येथील ग्राहकांना गूळ, काकवीची चांगल्या प्रकारे विक्री सुरू केली आहे. बऱ्यापैकी ग्राहकांकडून प्रसिद्धी आणि गूळ, काकवीचा दर्जा यामुळे चांगली विक्री होते. गटाच्या उपक्रमांना वाळवा पंचायत समितीच्या सभापती शुभांगी पाटील, गटविकास अधिकारी शशिकांत शिंदे, आशुतोष यमगर, विजय पाटील यांचे चांगले सहकार्य मिळत असल्याचे सुनंदा पाटील यांनी सांगितले.  

शहरांमध्ये विक्रीचे नियोजन गूळ, काकवी उत्पादनाबरोबर स्वतःच्या शेतात पिकणारा भाजीपाला त्याचबरोबर उडीद, मूग, चवळी, भुईमूग यांची विक्री गटामार्फत केली जाते. दर्जेदार शेतीमाल असल्याने परिसरातील ग्राहकांकडून चांगली मागणी आहे. यामुळे बचत गटातील महिलांच्या उत्पन्नात वाढ होऊ लागली आहे. कामधेनू गटाच्या शेतीमालाची माहिती आणि गुणवत्तेबाबत खात्री पटल्यामुळे सांगली,पुणे, मुंबई येथील ग्राहक गूळ, काकवी, मूग, चवळी, उडदाची मागणी करतात. फोनवर ग्राहकांची मागणी नोंदवून घेतली जाते. ग्राहकांच्या मागणीनुसार एका बॉक्समध्ये पॅकिंग केले जाते. कासेगाव येथून पुणे, मुंबईकडे जाणाऱ्या ट्रॅव्हल्समधून बॉक्स ग्राहकांना पाठवले जातात. वाहतुकीचे पैसे स्वतः ग्राहक देतो. शेतीमालाचे पैसे गटाच्या खात्यावर ऑनलाइन पद्धतीने ग्राहक जमा करतात. अगदी विश्‍वासाने हा व्यवहार चालतो, यात कोणत्याही प्रकारचा धोका आजअखेर झाला नसल्याचे सुनंदाताई सांगतात.

देशी गोपालन, कुक्कुटपालनाची जोड   सुनंदा पाटील यांच्याकडे सध्या चार गीर गाई आहेत. यातील दोन गाभण आहेत. सध्या दररोज आठ लिटर दुग्धोत्पादन होते. कासेगावमधील तीन कुटुंबांना सत्तर रुपये लिटर दराने दुधाचे रतीब घातले जाते. दर महिन्याला एक किलो तुपाची निर्मिती केली जाते.तूप तीन हजार रुपये किलो दराने विकले जाते. गाईचे शेण, मूत्रापासून जिवामृत, गांडूळ खत तयार केले जाते. त्याचा वापर स्वतःच्या शेतीसाठी करतात. शेतातील उत्पादित शेतीमालाची बचत गटाच्या माध्यमातून विक्रीची व्यवस्था उभी राहत आहे. या जोडीला गटातील महिलांनी कुक्कुटपालनाला सुरुवात केली. याबाबत सुनंदाताई म्हणाल्या, की माझ्याकडे १०० डीपी क्रॉस कोंबड्या आहे. दोन सदस्यांकडे ब्रॉयलर कोंबड्या आहेत. व्यापारी जागेवर येऊन कोंबड्यांची खरेदी करतात. माझ्याकडील डीपी क्रॉस जातीची कोंबडी ३५० रुपये आणि कोंबडा ५०० रुपये आणि अंडे ८ रुपये दराने विकले जाते. दरमहा ३० कोंबड्यांची विक्री होते.  गटातील सदस्या दीपाली गणेश पाटील, शुभांगी मिलिंद पाटील यांनी पोल्ट्री व्यवसायाला सुरुवात केली आहे. मनीषा दीपक पाटील यांनी यंदा हळद लागवड केली आहे. टप्प्याटप्प्याने इतर सदस्यादेखील पूरक उद्योगाकडे वळत आहे. गटामुळे अर्थकारणाला चांगली चालना मिळाली आहे.

- सुनंदा पाटील  ८३२९९१८५१५

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com