फळबागेला प्रक्रिया उत्पादनांची जोड

शेतीची आवड जोपासण्यासाठी कुटुंबाचे चांगले पाठबळ मिळाले, की महिला देखील शेतीमध्ये वेगळेपण दाखवू शकतात. याचे उदाहरण म्हणजे वळके (ता.जि. रत्नागिरी) सौ. तृप्ती तुकाराम शिवगण
फळबागेला प्रक्रिया उत्पादनांची जोड
anola processing unit

शेतीची आवड जोपासण्यासाठी कुटुंबाचे चांगले पाठबळ मिळाले, की महिला देखील शेतीमध्ये वेगळेपण दाखवू शकतात. याचे उदाहरण म्हणजे वळके (ता.जि. रत्नागिरी) सौ. तृप्ती तुकाराम शिवगण. शासकीय नोकरीचा राजीनामा दिल्यानंतर त्यांनी रोपवाटिका सुरू केली. बाजारपेठेचा अभ्यासकरून आवळा, काजू फळबाग केली. याचबरोबरीने आवळा प्रक्रिया उद्योगदेखील चांगल्या प्रकारे सुरू केला. 

लहानपणापासूनच शेतकरी कुटुंबात वाढलेल्या सौ. तृप्ती शिवगण यांना शेतीची आवड होती. शासकीय नोकरीत असलेल्या तृप्ती यांनी विवाहानंतरही शेतीची आवड जपण्याचा निर्णय घेतला. पती नोकरीत असल्यामुळे शेतीमध्ये वेगळेपण जपण्यासाठी तृप्ती यांनी  १९९९ मध्ये शासकीय कार्यालयातील नोकरीचा राजीनामा देऊन वळके येथे घराजवळील दोन एकर जागेत तपस्या ॲग्रो फार्मच्या माध्यमातून आंबा, काजू रोपवाटिका सुरू केली. त्यापूर्वी हापूस आणि केसर आंबा मातृवृक्ष बाग केली. सुरुवातीला त्यांच्याकडे पाच हजार कलमे विक्रीचा परवाना होता. आता त्या दरवर्षी २० हजार कलमे बांधतात. रोपवाटिकेचे चांगले नियोजन झाल्यावर त्यांनी २००४ मध्ये आवळा, काजू लागवडीचा निर्णय घेतला.

फळबाग, प्रक्रिया उद्योगाला सुरुवात  लांजा तालुक्यातील आसगे गावामध्ये सौ. तृप्ती शिवगण यांनी टप्प्याटप्याने १२ एकर जमीन खरेदी केली. या जागेत दोन काजू कलमांमध्ये आवळा कलमाची लागवड केली आहे. या मिश्रफळबागेत काजूच्या वेंगुर्ला आणि आवळ्याच्या कांचन, नरेंद्र ७, चकय्या आणि कृष्णा या जातींची लागवड आहे. सध्या वर्षाला सुमारे सहा टन आवळ्याचे त्यांना उत्पादन मिळते. ऑक्टोबर ते जानेवारी या कालावधीत आवळ्याचे चांगले उत्पादन मिळते. सुरुवातीला शिवगण आवळा विक्री २५ रुपये किलो दराने करायच्या. परंतु उत्पादनाला चांगला दर मिळण्यासाठी त्यांनी प्रक्रिया उद्योग उभारणीचा निर्णय घेतला.   आवळा प्रक्रिया पदार्थांना बाजारात मागणी असल्यामुळे तृप्तीताईंनी नियोजन सुरू केले. २०१५ मध्ये वेंगुर्ला येथील फळ संशोधन केंद्रात प्रक्रियाविषयक प्रशिक्षण घेतले. त्यानंतर आवळा सरबत, कॅण्डी आणि आवळा मुखवास प्रक्रिया उत्पादनांना सुरुवात केली. आवळा सरबतामध्ये साखरे शिवाय (शुगर लेस) आणि साखरेसह असे दोन प्रकार त्यांनी केले आहेत. मधुमेही रुग्णांकडून शुगर लेस सरबताला चांगली मागणी आहे.   सरबत, कॅण्डी, मुखवास निर्मिती 

 • आसगे येथील बागेतून आवळे काढून आणल्यानंतर ते स्वच्छ केले जातात. फळ काढणीसाठी बागेत दहा कामगार आहेत. यंत्रणेच्या माध्यमातून आवळा बारीक केला जातो. रस काढण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा वापरली जाते. पाच टन आवळ्यातून साधारणपणे २ हजार लिटर रस तयार होतो. शुगर लेस आवळा सरबत करण्यासाठी यामध्ये लिंबू, आल्याचा रस, मीठ मिसळून तो उकळवला जातो. सरबताच्या टिकाऊपणासाठी प्रिझर्व्हेटिव्ह वापरले जाते. त्यानंतर सरबत बाटलीमध्ये भरले जाते. दरवर्षी सरबताच्या पाच हजार बाटल्या तयार होतात.  
 •  कॅण्डी बनवण्यासाठी आवळे शिजवले जातात. त्याचे छोटे तुकडे केले जातात. हे तुकडे साखरेच्या पाकात ठेवले जातात. पाणी सुटले की उन्हात सुकवून त्याचे पॅकिंग केले जाते. दरवर्षी एक टन कॅण्डीनिर्मिती केली जाते. 
 •  सरबत बनवताना आवळ्याचा चोथा शिल्लक राहतो. या चोथ्यामध्ये लिंबू रस, साखर आणि मीठ मिसळले जाते. हा चोथा वाळवून पॅकिंग केले जाते. दरवर्षी दीड टन आवळा मुखवास उत्पादन केले जाते.
 • शहरी बाजारपेठेत चांगली मागणी  आवळ्याला आयुर्वेदात चांगले महत्त्व आहे. यामध्ये जीवनसत्त्व ‘क’ असल्याने रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी आवळा उत्पादनांना बाजारपेठेत चांगली मागणी आहे. साखर विरहित आवळा सरबताची ७०० मिलि बाटली २०० रुपये, साखर असलेली सरबत बाटली १३० रुपये दराने विकली जाते. दरवर्षी एक टन आवळा कॅण्डीचे उत्पादन होते. याची होलसेल विक्री ३०० रुपये किलो दराने होते. दरवर्षी दीड टन आवळा मुखवासचे उत्पादन घेतले जाते. याची होलसेल मार्केटमध्ये २५० रुपये किलो दराने विक्री होते. स्थानिक बाजारपेठेस रत्नागिरी, पुण्यामध्ये आवळा उत्पादनांना चांगली मागणी आहे. उत्पादनांच्या विक्रीसाठी तृप्तीताईंना पती तुकाराम शिवगण यांची चांगली मदत मिळते.

  सुधारित तंत्रज्ञानावर भर तुप्तीताईंनी फळबागेमध्ये सुधारित व्यवस्थापनावर भर दिला आहे. २००४ मध्ये त्यांनी बारा एकरातील फळबागेत ठिबक सिंचन केले आहे. याचबरोबरीने पॉवर टिलर, फवारणी पंप, ग्रास कटर या अवजारांचा बागेत वापर केला जातो. आवळा उद्योग वाढविण्यासाठी त्यांनी शासनाच्या योजनेतून पॅक हाउससाठी दोन लाखांचे अनुदान मिळाले आहे. पॅकिंग, ग्रेडिंगसह प्रक्रिया करण्यासाठी पॅकहाउसचा वापर केला जाणार आहे.

  गांडूळ खतनिर्मिती  तृप्तीताई आवळा, काजू कलमांना सेंद्रिय खतांचा वापर करतात. १९९९ मध्ये शासनाच्या योजनेतून त्यांनी गांडूळ खत प्रकल्प सुरू केला. खतनिर्मितीसाठी चार टाक्या तयार केल्या. दरवर्षी सुमारे २० टन गांडूळ खत मिळते. रोपवाटिकेमधील कलमांसह आवळा, काजू बागेसाठी गांडूळ खताचा वापर केला जातो. रोपवाटिकेमध्ये हापूस, केसर आंबा कलमे आणि काजूच्या वेंगुर्ला जातीची कलमे तयार केली जातात. कलमे बांधण्यासाठी आठ कामगार कार्यरत आहेत. 

  दृष्टिक्षेपात प्रकल्प

 •  १२ एकरांवर आवळा, काजू मिश्र फळबाग.  दरवर्षी सहा टन आवळा उत्पादन.
 •  वर्षभरात सुमारे ४ लाखांची उलाढाल.  मजुरी, प्रक्रियेतील खर्च वजा जाता ३० टक्के नफा.  रत्नागिरीसह मुंबई, पुण्यातील बाजारपेठेत उत्पादनांची विक्री.
 • - सौ.तृप्ती तुकाराम शिवगण,  ०२३५२-२४९३८६

  Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

  ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

  Related Stories

  No stories found.