शेतीला मिळाली पूरक उद्योगांची जोड

भोके (ता. जि.रत्नागिरी) या दुर्गम गावातील देवयानी स्वयंसाह्यता समूहातील महिलांनी शेतीच्या बरोबरीने पूरक उद्योगांनादेखील सुरुवात केली आहे. परसबागेत भाजीपाला लागवड, कुक्कुटपालन, शिवण काम, किराणा मालाचे दुकान असे विविध उपक्रम राबवून आर्थिक उत्पन्न वाढविण्याचा चांगला प्रयत्न केला आहे.
शेतीला मिळाली पूरक उद्योगांची जोड
women self help group members

भोके (ता. जि.रत्नागिरी) या दुर्गम गावातील देवयानी स्वयंसाह्यता समूहातील महिलांनी शेतीच्या बरोबरीने पूरक उद्योगांनादेखील सुरुवात केली आहे. परसबागेत भाजीपाला लागवड, कुक्कुटपालन, शिवण काम, किराणा मालाचे दुकान असे विविध उपक्रम राबवून आर्थिक उत्पन्न वाढविण्याचा चांगला प्रयत्न केला आहे.

महिलांना आर्थिक बचतीची सवय लागावी हा उद्देश सफल झाल्यानंतर भोके (ता. जि. रत्नागिरी) या दुर्गम भागात देवयानी  स्वयंसाह्यता समूहातील महिलांनी सुधारित पद्धतीने भात, नाचणी लागवडीला सुरुवात केली. यासोबत शेतीला कुक्कुटपालन, परसबागेची जोड देत पंचक्रोशीत वेगळी ओळख तयार केली आहे.   शासनाच्या ‘उमेद’ अभियानांतर्गत भोके-टेंबरीवाडी येथील महिलांची बैठक आयोजित करण्यात आली होती. यामध्ये काही महिलांनी बचत गट स्थापन करण्यास सकारात्मक प्रतिसाद मिळाला. २८ डिसेंबर, २०१२ रोजी सानिका सतीश आंबेकर, श्रुती सुनील आंबेकर, संजीवनी संतोष आंबेकर, दिशा दिलीप आंबेकर, सुनंदा मानका आंबेकर, वासंती वासुदेव आंबेकर, निर्मला गणपत आंबेकर, भागीरथी शंकर आंबेकर, सरस्वती गणपत आंबेकर, संध्या संजय आंबेकर या महिलांनी एकत्र येत देवयानी स्वयंसाह्यता समूहाची सुरुवात केली. 

     सुरुवातीला गटातील महिलांनी बचतीवर भर दिला होता. त्यानंतर मासिक बैठकांमधून प्रेरणा घेत गटातील पहिल्यांदा सदस्यांनी परसबाग विकासासाठी पावले उचलली. गावशिवारात पाण्याचा प्रश्‍न असल्यामुळे घराजवळीलच एक-दोन गुंठे जमिनीवर महिलांनी परसबाग विकसित केली. यामध्ये प्रामुख्याने पालेभाजी, मुळा, चवळी, दोडका, पडवळ लागवडीस सुरुवात केली. सेंद्रिय पद्धतीने या भाजीपाल्याचे व्यवस्थापन ठेवले. कुटुंबाला पुरेसा भाजीपाला ठेऊन उरलेल्या भाजीपाल्याची विक्री गावामध्ये करण्यास सुरुवात झाली. यातून  हंगामात हजार-दोन हजार रुपयांचे उत्पन्न प्रत्येक सदस्याला मिळू लागले आहे.

कुक्कुटपालनाची दिली जोड ‘उमेद'चे अधिकारी श्री. जेजुरकर यांनी गटातील महिलांना कुक्कुटपालनासाठी मार्गदर्शन केले. त्यासाठी दहा दिवसांचे प्रशिक्षणही आयोजित केले होते. यामधून चांगले उत्पन्न मिळू शकते हे लक्षात आल्यानंतर गटाच्या तत्कालीन अध्यक्षा संजीवनी संतोष आंबेकर यांनी २०१८ मध्ये कुक्कुटपालन करण्याचे ठरविले. बाजारपेठेची मागणी लक्षात घेऊन गिरिराजा, कावेरी, वनराजा या सुधारित गावरान कोंबड्यांचे संगोपन त्यांनी सुरू केले. पाली येथील विक्रेत्याकडून १०० पिलांची एक बॅच त्यांनी विकत आणली. एक पिलू २६ रुपयांना विकत घेतले. तीन महिने चांगले व्यवस्थापन केल्यानंतर गाव परिसरामध्येच कोंबड्यांची विक्री सुरू केली. गावामध्येच कोंबड्यांना ग्राहक मिळू लागले. दोन ते अडीच किलो वजनाच्या कोंबडीला ४०० ते ५०० रुपये दर मिळाल्याने आर्थिक नफ्यात वाढ झाली.   कोकणात शिमगा, राखण आणि गौरीपूजनानंतर मोठ्या प्रमाणात कोंबड्यांना मागणी असते. हे लक्षात घेऊन संजीवनी आंबेकर यांनी नियोजन केले. शिमगोत्सव साधारणतः मार्च महिन्यात येतो. त्यामुळे जानेवारीमध्ये पिले आणून त्याचे पुढे तीन महिने योग्य पद्धतीने संगोपन केले जाते. जून महिन्यात राखण असल्याने मार्च महिन्यात पिले आणली जातात. गौरीपूजनाच्या आधी तीन महिने पिले आणली जातात. आंबेकर यांनी कुक्कुटपालनाला सुरुवात करून तीन वर्षे झाली आहेत.   कोंबड्यांच्या व्यवस्थापनाबाबत संजीवनी आंबेकर म्हणाल्या, की पिलांचे संगोपन करताना वेळच्या वेळी लसीकरण आणि योग्य पद्धतीने खाद्य व्यवस्थापन करणे आवश्यक असते. पहिल्यावेळी पशुतज्ज्ञांकडून लसीकरण करण्यात आले. त्यानंतर मी स्वतः लसीकरणाचे प्रशिक्षण घेतले आणि त्यानंतर आता पिलांना मी लस  देते. कोंबड्यांना मक्यापासून केलेले खाद्य दिले जाते. शंभर पिलांचा तीन महिन्यांचा संगोपन खर्च सुमारे पाच हजारांपर्यंत येतो. आतापर्यंत सुमारे दहा बॅच झाल्या असून वर्षाला तीस हजार रुपयांचा नफा  मिळतो.

गटाचा मिळाला आर्थिक आधार भातशेती, किराणा मालाच्या विक्रीमधून मिळालेला नफा गटाच्या बँक खात्यात जमा केला जातो. वर्षाच्या शेवटी नफ्यामधून गटातील सदस्यांना लाभ दिला जातो. त्याचबरोबर केलेल्या बचतीमधून गरज असलेल्या सदस्यांना आर्थिक मदतही केली जाते. वैद्यकीय मदत, नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी आर्थिक साह्य यासह अडचणीच्या वेळी गटातील जमा झालेली रक्कम महिलांसाठी आधार बनली आहे.

‘एसआरटी‘पद्धतीने भात लागवड गटाच्या महिला सदस्यांची स्वतःची भातशेती आहे. या भागात आजही पारंपरिक पद्धतीने भात लागवड केली जाते. परंतु गटाने नावीन्यपूर्ण प्रयोग करण्याच्या हेतूने १६ गुंठे क्षेत्रावर एसआरटी तंत्राचा उपयोग करून भात लागवडीचा निर्णय घेतला. गटाला उद्योग केंद्रातून सुधारित जातीचे भात बियाणे मिळाले. तज्ज्ञांच्या सल्ल्याने पिकाचे योग्य व्यवस्थापन ठेवण्यात आले. या क्षेत्रातून ५०० किलो भात उत्पादन मिळाले. गटाने केवळ भात विकण्यापेक्षा तांदूळ करून प्रति किलो २५ रुपये दराने गावामध्येच विक्री केला. यातून गटाला ७ हजार ५०० रुपयांचा नफा झाला. लागवडीपासून ते झोडणीपर्यंत गटातील सदस्यांचा सहभाग असल्याने शेतीसाठी केवळ २ हजार ५०० रुपयांपर्यंत खर्च आला. उर्वरित रक्कम गटाच्या बँक खात्यात जमा करण्यात आली. यंदाही एसआरटी पद्धतीने ८ गुंठे क्षेत्रावर गटाने भात लागवड केली असल्याचे गटाच्या सदस्या दिशा आंबेकर यांनी सांगितले.

शिवणकाम व्यवसायाला चालना

गटातील सदस्या दिशा आंबेकर यांनी घरामध्ये शिवणकाम व्यवसाय सुरू केला आहे. शिवणकामासाठी लागणारे साहित्य  त्यांनी गटातून मिळणाऱ्या अनुदानातून खरेदी केले. त्या विविध प्रकारचे कपडे शिवतात. त्यामुळे गावातील महिलांना शहराकडे जावे लागत नाहीत. कोरोना कालावधीत तीन हजार मास्क शिवण्याची ऑर्डर गटाला मिळाली होती. दिशा यांच्यासह सात महिलांनी हे मास्क बनवून दिले. एक मास्क शिवण्यासाठी तीन रुपये मेहताना मिळाला. कापड, दोरा हे साहित्य प्रशासनाकडून देण्यात आले होते.

गटाच्या मालकीचे किराणा दुकान गटाच्या माध्यमातून वेगळे काहीतरी करायचे असा उद्देश डोळ्यासमोर ठेवून सदस्यांनी गावामध्ये किराणा माल विक्रीचे दुकान सुरू केले. किराणा साहित्यांसह विविध प्रकारच्या वस्तू येथे विक्रीला उपलब्ध आहेत. तसेच गावातील महिलांनी तयार केलेल्या वस्तू, तसेच खाद्यपदार्थ देखील येथे विक्रीसाठी ठेवले जातात. यासाठी गटाने ग्रामसंघातून ५० हजार रुपयांचे कर्ज घेतले. किराणा दुकानात गटातील गरजू महिला काम करतात. संबंधित महिलेला त्याचा आर्थिक मोबदला दिला जातो. किराणा दुकानातून गटाला महिन्याला तीन ते चार हजार रुपये नफा मिळतो.

-  संजीवनी आंबेकर,७४९८६२१५९५

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.