जिल्हा बँका, विकास सोसायट्यांच्या निवडणुका लांबणीवर

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

मुंबई  : राज्यातील कर्जमाफी योजना व जिल्हा बँक; तसेच सहकारी सोसायट्यांच्या निवडणुका समांतर पद्धतीने राबविल्यास कर्जमाफी योजनेच्या अंमलबजावणीत अडचणी येण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे राज्यातील २२ जिल्हा बँकांची निवडणूक व सुमारे ८ हजार विकास सोसायट्यांच्या निवडणुका राज्य शासनाने तीन महिने पुढे ढकलल्या आहेत. सहकार विभागाने मंगळवारी हा आदेश जारी केला.  

राज्य शासनाच्या महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या अंमलबजावणीची प्रक्रिया सध्या युद्धपातळीवर सुरू आहे. या कामात विविध विभागांचे क्षेत्रीय अधिकारी व्यग्र आहेत. निवडणुकीसोबतच कर्जमाफी योजनेची अंमलबजावणी समांतर पद्धतीने राबविल्यास कर्जमाफी योजनेत अडथळा येण्याची शक्‍यता आहे; तसेच संचालक मंडळाची निवडणूक ही वैधानिक जबाबदारी असल्याने कर्जमाफी योजनेत विलंब होईल व खरीप हंगामात शेतकऱ्यांना कर्ज घेण्यास अडचणी निर्माण होण्याची शक्यता असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. 

या निर्णयामुळे राज्यातील २२ जिल्हा मध्यवर्ती बँका ८ हजार १९४ प्राथमिक कृषी सहकारी संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या आहे. त्यामुळे विद्यमान संचालकांना तीन महिन्यांची मुदतवाढ मिळाली आहे. या जिल्हा बँकांमध्ये पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली, सातारा, नगर आणि मराठवाड्यातील उस्मानाबाद, औरंगाबादसारख्या महत्त्वाच्या जिल्हा बँका आहेत. या संस्थांच्या निवडणुकीची जबाबदारी राज्य सहकार निवडणूक प्राधिकरणाकडे आहे. जिल्हा मध्यवर्ती बँका आणि प्राथमिक कृषी सहकारी संस्थांच्या निवडणुका जानेवारी ते जून या कालावधीत होऊ घातल्या आहेत. संचालकांची मुदत संपण्यापूर्वी या संस्थांची निवडणुक प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक असते; तसेच शासनाच्या महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्त योजनेची अंमलबजावणीची प्रक्रिया राज्यात सुरू आहे. या योजनेच्या अंमलबजावणीसाठी अधिकारी, कर्मचारी व्यग्र राहणार आहेत. या निवडणुका जिंकण्यासाठी सत्ताधारी काँग्रेस, राष्ट्रवादीला अवधी आवश्यक असल्याने या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्याचे बोलले जाते.   अर्ज दाखल प्रक्रिया सुरू झालेल्या बॅंका, सोसायट्यांना वगळले उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झालेल्या बँका व गावपातळीवरील विकास सहकारी सोसायट्यांना या निर्णयातून वगळले आहे. उर्वरित सहकारी बँका व सोसायट्यांची निवडणूक तीन महिने पुढे ढकलण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com