जायकवाडी प्रकल्पातून ५५ टीएमसी पाण्याचा विसर्ग

औरंगाबाद ः जायकवाडीतून ५ सप्टेंबरला पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला होता. १२ वर्षांत प्रथमच आत्तापर्यंत जवळपास ५५ टीएमसी पाण्याचा नियोजनबद्ध विसर्ग करण्यात आला आहे.
संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

औरंगाबाद : जिल्ह्यातील जायकवाडी प्रकल्पातून गत २५ दिवसांपासून अविरत सुरू असलेला विसर्ग थोड्या प्रमाणात का होईना बुधवारी ( ता ३०) २६ व्या दिवशीही सुरू होता. सध्या धरणात ९८.६२ टक्के उपयुक्त पाणीसाठा आहे. जायकवाडीतून ५ सप्टेंबरला पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला होता. १२ वर्षांत प्रथमच आत्तापर्यंत जवळपास ५५ टीएमसी पाण्याचा नियोजनबद्ध विसर्ग करण्यात आला आहे. बुधवारी सकाळच्या सत्रात प्रकल्पातून ४१९२ क्‍युसेकने विसर्ग तर १३,०५२ क्युसेकने आवक सुरू होती.

मराठवाड्यात यंदा दमदार पाऊस झाल्याने जायकवाडी प्रकल्पातील पाणीसाठ्यातही मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. बुधवारी प्रकल्पातील  उपयुक्त पाणीसाठा ९८.६२ टक्क्यांवर पोहोचला होता. त्यावेळी प्रकल्पात १३ हजार ५२ क्युसेकने पाण्याची आवक  तर ४१९२ क्‍युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू होता, अशी माहिती कडा विभागाच्यावतीने देण्यात आली.

मध्यंतरी आवक वाढल्याने जायकवाडीतून होणारा पाण्याचा विसर्ग ९४ हजार क्यूसेकवर नेण्यात आला होता. त्यानंतर टप्प्याटप्याने त्यामध्ये घट करण्यात आली. रविवारी (ता २०) सकाळी ६ वाजता ५३,४५५क्युसेकने पाण्याची आवक प्रकल्पात सुरू होती. रविवारी सायंकाळी ६ वाजता ३४,३२३ क्युसेकने विसर्ग सुरू होता. त्यावेळी धरणात ९६.३७ टक्के पाणीसाठा होता. प्रकल्पाच्या उजव्या कालव्यातून १०० क्युसेक तर दरवाज्याव्दारे ४७,१६० क्युसेक विसर्ग सुरू होता.

सोमवारी (ता. २१) जायकवाडी प्रकल्पात ४९,४७० क्युसेकने पाण्याची आवक सुरू होती. यावेळी प्रकल्पात जिवंत पाणीसाठा ९८.२९ टक्के झाला होता. प्रकल्पाच्या उजव्या कालव्यातून १०० क्युसेक तर विविध दरवाज्यांव्दारे ३७,७२८ क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू होता. २५ सप्टेंबरला प्रकल्पातून ९४३२ क्यूसेकने पाण्याचा विसर्ग सुरू होता. उपलब्ध पाणीसाठ्यामुळे आता लक्ष रब्बी नियोजनाकडे लागले आहे.   ‘प्राथमिक सिंचन कार्यक्रम तयार करणार’ उपलब्ध पाणीसाठा व रब्बी तसेच अपेक्षित सिंचनाविषयी बोलताना कार्यकारी अभियंता राजेंद्र काळे म्हणाले, की नियोजनबद्ध पद्धतीने सुमारे २६ दिवसांपासून अविरत सुरू असलेला विसर्ग आता मोठ्या प्रमाणात घटविला आहे. प्रकल्पाच्या खालच्या भागातील ३८० किलोमीटर पर्यंतच्या गोदावरी पात्रातील सोळा बंधारे तुडुंब आहेत. लवकरच प्रकल्पाचा प्राथमिक सिंचन कार्यक्रम तयार करून तो कालवा-सल्‍लागार समितीपुढे ठेवण्यात येईल. पुढील काळात रब्बीच्या तीन व उन्हाळी चार पाणी पाळ्या होणे अपेक्षित आहे. जवळपास १ लाख ८३ हजार ३०० हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणे अपेक्षित असून कालव्याची पाणीवहन क्षमता वाढविण्याच्या दृष्टीने दुरुस्ती विषयक प्रस्तावही सादर केला जाणार आहे. शेतकऱ्यांनी पाणी वापर संस्था स्थापन करण्यासोबतच सूक्ष्म सिंचनाचा वापर वाढविण्याची गरज आहे.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com