संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

पुणे विभागातील १७०० गावांमधील भूजल पातळी एक मीटरने खालवली

पुणे विभागातील पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर भागांत अनेक ठिकाणी जोरदार पाऊस झाला. मात्र पूर्व भागात कमी पाऊस होता. त्यामुळे भूजलपातळी वाढली नसल्याचे अभ्यासाअंती दिसून आले. येत्या उन्हाळ्यात या भागात तीव्र पाणीटंचाई जाणवेल. त्यामुळे या भागातील नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करण्याची गरज आहे. - मिलिंद देशपांडे, विभागीय उपसंचालक, भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा, पुणे .

पुणे  ः यंदा मुबलक प्रमाणात पाऊस झाला असला, तरी अधिक उपसा होत असल्याने त्याचा परिणाम भूजल पातळीवर झाला आहे. भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेने नुकत्याच केलेल्या सर्वेक्षणातून पुणे विभागातील सातारा, सांगली, सोलापूर, पुणे, कोल्हापूर जिल्ह्यांतील एक हजार ७८८ गावांमधील भूजल पातळी एक मीटरने खालावली असल्याचे स्पष्ट झाले आहे.

गेल्या वर्षी पुणे विभागात कमी पावसामुळे सुमारे दोन हजार २५८ गावांमध्ये एक मीटरने भूजल पातळी खोल असल्याचे समोर आले होते. त्यामुळे या गावांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणीटंचाई भासली होती. गेल्या वर्षीच्या तुलनेत चालू वर्षी चांगला पाऊस झाल्याने टंचाईग्रस्त गावांच्या संख्येत घट झाली आहे. मात्र चांगला पाऊस झाला असला तरी पाणी उपसा अधिक होत आहे. त्यामुळे पाणीपातळी झपाट्याने खोल जात आहे. 

पावसाच्या खंडाचा परिणाम   पुणे विभागात जून ते सप्टेंबर महिन्यात पडलेल्या पावसाचा भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणेने तुलनात्मक अभ्यास केला. त्यामध्ये विभागातील एकूण ५७ तालुक्यांपैकी ४ तालुक्यांतील भूजल पातळीत ० ते २० टक्के घट आढळून आली. २ तालुक्यांत २० ते ३० टक्के, ३ तालुक्यांत ३० ते ५० टक्के घट आढळून आली. सात तालुक्यांत ५० टक्क्यांपेक्षा जास्त भूजल पातळीत घट आढळून आली. भूजल पातळीत शून्य ते एक मीटरने घट आढळून आलेल्या गावात पाणीटंचाईची शक्यता कमी असून, ती नियंत्रित ठेवण्यासारखी असते. शासन निर्णयातील निकषानुसार पर्जन्यमानामध्ये वीस टक्क्यांपेक्षा कमी तूट असलेल्या गावात पाणीटंचाई भासण्याची शक्यता नसते. मात्र पडलेल्या पावसाचा अभ्यास केल्यास विभागातील बहुतांशी तालुक्यात पावसाने सरासरीही गाठली नसल्याचे आढळून येते. 

विहिरींच्या नोंदी ठरल्या महत्त्वाच्या  जून ते सप्टेंबर या कालावधीत झालेल्या पावसामुळे भूजल पातळी किती वाढली यांचे सर्वेक्षण भूजल विकास यंत्रणा करते. यंदाही विभागातील स्थिर भूजल पातळीच्या पाणलोट क्षेत्रनिहाय निश्‍चित केलेल्या निरीक्षण विहिरींच्या नोंदी घेण्यात आल्या होत्या. त्या निरीक्षण विहिरीतील पाणीपातळीचा मागील पाच वर्षांतील आॅक्टोबर महिन्यातील सरासरी भूजल पातळीशी तुलनात्मक अभ्यास करण्यात आला आहे. त्यानुसार विभागातील एकूण ५७ तालुक्यांपैकी ५२ तालुक्यांतील एक हजार ७८८ गावांत भूजल पातळीमध्ये एक मीटरपेक्षा जास्त घट आढळून आली आहे. ५८२ गावांमध्ये तीन मीटरपेक्षा जास्त, ४१९ गावांमध्ये दोन ते तीन मीटर, ७८७ गावांमध्ये एक ते दोन मीटर एवढी घट आढळून आली असल्याचे दिसून आले.

सरकारला उचलावी लागणार ठोस पावले मागील चार ते पाच वर्षांपूर्वी पाणीटंचाईने उग्र रूप धारण केले होते. त्या वेळी भूजलपातळी वाढविण्यासाठी सरकारने जलयुक्त शिवार अभियानासारखी योजना राबवून राज्यातील ओढे, नाल्यांचे खोलीकरण व रुंदीकरण केले. तसेच नद्या, प्रकल्पांमधील गाळ उपसा करण्यात आला. त्यामुळे भूजल पातळी वाढण्यास मदत झाली.

चालू वर्षी सुरुवातीला पुणे, सातारा, कोल्हापूरचा पश्‍चिम पट्टा वगळता उर्वरित भागात अत्यंत कमी पाऊस पडला. त्यानंतर आॅगस्ट, सप्टेंबर व आॅक्टोबरमध्ये मुबलक पाऊस झाल्याने भूजल पातळी काही प्रमाणात वाढली असून, टंचाईग्रस्त गावांच्या संख्येत घट होण्यास मदत झाली आहे, तरीही पुणे विभागातील एक हजार ७८८ गावामध्ये एकमीटर पेक्षा खोल पाणीपातळी गेली आहे. भविष्यात पाणीटंचाई भासू यासाठी आतापासून सरकारला ठोस पावले उचलावी लागणार आहेत.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com