खासदार डॉ. जयसिध्देश्वर शिवाचार्य महास्वामींना उच्च न्यायालयाचा दिलासा

खासदार डॅा. जयसिद्धेश्वर शिवाचार्य  महास्वामी
खासदार डॅा. जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी

सोलापूर  ः बनावट जातप्रमाणपत्रप्रकरणी सोलापूरचे भाजप खासदार डॉ. जयसिद्धेश्‍वर शिवाचार्य महास्वामी यांना सोमवारी (ता. २) मुंबई उच्च न्यायालयाने तात्पुरता दिलासा दिला. बनावट जात प्रमाणपत्र दाखल केल्याच्या जात पडताळणी समितीच्या निर्णयावर ही सुनावणी होणार होती. पण तूर्त यावर कोणताच निर्णय न देता, न्यायालयाने शुक्रवारी (ता. १३) यासंबंधीची पुढील सुनावणी ठेवली आहे. 

लोकसभा निवडणुकीत खासदार महास्वामी यांनी काँग्रेसचे उमेदवार आणि माजी केंद्रीयमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचा पराभव केला होता. त्यांनी दाखल केलेले जात प्रमाणपत्र बनावट असल्याचा दावा करणारी याचिका उच्च न्यायालयात करण्यात आली होती. याबाबत उच्च न्यायालयाने सोलापूरच्या जात प्रमाणपत्र पडताळणी समितीला पडताळणी करण्याचे निर्देश दिले होते. या समितीने खासदार महास्वामी यांचे जात प्रमाणपत्र बनावट असल्याचे जाहीर केले असून, तहसीलदारांना कलम क्र. ११ (१) (अ)(ब) नुसार गुन्हा नोंदविण्याचे आदेशही दिले आहेत.

या निर्णयाच्या विरोधात डॉ. महास्वामी यांनी केलेल्या याचिकेवर सोमवारी न्या. के. के. तातेड आणि न्या. सारंग कोतवाल यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली. याबाबत सुनावणी घ्यावी आणि गुन्हा दाखल करण्यास स्थगिती द्यावी, अशी मागणी त्यांचे वकील ॲड. मिलिंद मुळे यांनी केली. या मागणीला प्रतिवादींच्या वतीने ॲड. गुणरत्न सदावर्ते यांनी विरोध केला आणि तक्रार दाखल केल्याची माहिती दिली; परंतु तक्रार दाखल केली नसल्याचे ॲड. प्रसाद धाकेफाळकर यांनी खंडपीठाच्या निदर्शनास आणून दिले. त्यामुळे तूर्तास तक्रार नोंदवू नये आणि नोंदवली असल्यास योग्य कारवाई करावी, असे निर्देश उच्च न्यायालयाने दिले. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com