सात-बारा कोरा होणार होता, त्याचं काय झालं ः फडणवीस

अकलूज येथे आयोजित कार्यक्रमात बोलताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस
अकलूज येथे आयोजित कार्यक्रमात बोलताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस

अकलूज, जि. सोलापूर  ः अतिवृष्टिग्रस्त शेतकऱ्यांना २५ हजारांची मदत देणार होते, शेतकऱ्यांचा सात-बारा कोरा करणार होते, आश्‍वासनांची नुसती खैरात झाली, पण प्रत्यक्षात काय? असा प्रश्‍न उपस्थित करताना बेरोजगारी, शेतकऱ्यांच्या प्रश्‍नांशी या सरकारचे काहीच देणेघणे नाही, केवळ भाजपला दूर ठेवणे, एवढाच एककलमी कार्यक्रम या सरकारचा आहे, अशा शब्दांत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सरकारवर जोरदार प्रहार केला. 

सहकारमहर्षी शंकरराव मोहिते पाटील यांच्या १०२ व्या जयंतीनिमित्त भांबुर्डी येथील विजय गंगा प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्याचा प्रारंभ, शिवामृत दूध संघाच्या आवारात (कै.) शंकरराव मोहिते पाटील यांच्या पुतळ्याचे अनावरण, एक मेगावॉट सोलर प्रकल्पाचे उद्‍घाटन, डाळिंब मार्केट इमारतीचे उद्‍घाटन आदी विविध कामांचा प्रारंभ श्री. फडणवीस यांच्या हस्ते रविवारी (ता. १२) झाला. त्यावेळी ते बोलत होते. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील अध्यक्षस्थानी होते. 

याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील, खासदार रणजितसिंह निंबाळकर, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, आमदार पृथ्वीराज देशमुख, जयकुमार गोरे, सचिन कल्याणशेट्टी, राम सातपुते, माजी खासदार धनंजय महाडिक, बबनराव अवताडे, जिल्हा परिषद अध्यक्ष अनिरुद्ध कांबळे, कल्याणराव काळे, भाजपचे जिल्हाध्यक्ष शहाजी पवार, विक्रम देशमुख, जयसिंह मोहिते पाटील, माजी खासदार रणजितसिंह मोहिते पाटील, धैर्यशील मोहिते पाटील उपस्थित होते.

या वेळी श्री. फडणवीस म्हणाले, की सध्या केवळ द्वेषाचे राजकारण सुरू आहे. आमच्या सगळ्या योजना बंद करण्याचा कार्यक्रम या सरकारने हाती घेतला आहे. ‘जलयुक्त शिवार’सारखी योजनाही बंद केली. पण ती जनतेच्या मनात रुजली आहे. त्याचे फायदे सर्वांना माहिती आहेत. आम्ही सहकार क्षेत्राला बळकटी दिली, साखर कारखानदारी वाचविण्यासाठी दोन हजार कोटींची मदत केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी साखरेचा दर निश्‍चित केल्यामुळेच आज उसाला चांगला दर मिळत आहे. उसाला एफआरपीप्रमाणे दर मिळू लागला. अतिवृष्टीग्रस्तांना मदत देण्याबाबतही नुसतेच भुलवण्यात आले.  आजही २५ हजारांची वाट शेतकरी पाहतायेत, कर्जमाफीबाबतही सरसकट सात-बारा कोरा करण्याचे आश्‍वासन दिले. पण दिलेली कर्जमाफी फसवी आहे. आमच्या काळात आम्ही १९ हजार कोटींची कर्जमाफी दिली, तर शेतकऱ्यांना विविध लाभातून थेट ५० हजार कोटीची मदत दिली. कृष्णा-भीमा स्थिरीकरण योजनेसाठी केंद्राकडे पाठपुरावा करू.     ‘कृष्णा खोरेसाठी निधी द्यावा’ कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात माजी खासदार रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी सोलापूर जिल्ह्याच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या कृष्णा-भीमा स्थिरीकरण योजनेसाठी केंद्राकडून निधी मिळून कामास सुरुवात व्हावी, तालुक्‍यातील रस्त्यांच्या कामासाठी ३९ कोटी रुपये, तसेच विजय गंगा अभियानासाठी व सिमेंट बंधाऱ्यांसाठी निधी मिळावा, अशा मागण्या केल्या.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com