कर्जमाफीवरून विरोधक दुसऱ्या दिवशीही आक्रमक

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

मुंबई  ः भाजपने शेतकरी कर्जमाफी आणि महिला अत्याचाराविरोधात घेतलेल्या आक्रमक पवित्र्यामुळे विधानसभेचे कामकाज मंगळवारी (ता. २५) दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले. या वेळी विरोधकांनी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. 

अधिवेशनाच्या कामकाजाला सुरुवात होताच विरोधकांनी शेतकरी कर्जमाफीवरून सरकारला कोंडीत पकडण्यास सुरुवात केली. शेतकऱ्यांना सातबारा कोरा करण्याचे दिलेले वचन पाळा, शेतकऱ्यांना हेक्टरी २५ हजारांची मदत द्या, अशी मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी या वेळी केली. तसेच, शेतकरी कर्जमाफीची जाहीर करण्यात आलेली यादी फसवी असल्याचा आरोपही त्यांनी केला. या वेळी शेतकरी कर्जमाफीवरून विरोधकांनी स्थगन प्रस्ताव मांडला होता. या प्रस्तावावर विचार सुरू असून प्रश्नोत्तरांचा तास चालू द्यावा, अशी विनंती विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी केली. मात्र, शेतकऱ्यांचा सातबारा कोरा झालाच पाहिजे, अशी घोषणाबाजी विरोधक आमदार करत होते. तसेच, विरोधकांनी अध्यक्षांसमोरील मोकळ्या जागेमध्ये येऊन सरकारविरोधात घोषणाबाजी सुरू केली. त्यामुळे आधी दोनवेळा आणि नंतर दिवसभरासाठी विधानसभेचे कामकाज तहकूब करण्यात आले. त्याआधी महिला सुरक्षेच्या मुद्यावरही विरोधकांनी स्थगन प्रस्ताव मांडला, पण गोंधळातही सरकारने कामकाज रेटून नेण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप विरोधकांनी केला.

राज्य सरकारने शेतकऱ्यांची फसवणूक केली असल्याची टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस विधानभवनाच्या आवारात पत्रकारांशी बोलताना केली. सरकारने गाजावाजा करून कर्जमाफी केली. मात्र, दोन महिन्यांत केवळ १५ हजार शेतकऱ्यांची यादी जाहीर झाली. महिन्याला केवळ साडेसात हजार शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचा विक्रम या सरकारने केला. अशा वेगाने ३५ लाख शेतकऱ्यांना कर्जमाफीसाठी ४०० महिने लागतील, असा टोलाही त्यांनी लगावला आहे. 

विधान परिषदेतही गोंधळ कायम शेतकऱ्यांना देण्यात आलेली कर्जमाफी फसवी असल्याचा आरोप करत विधान परिषदेत विरोधकांनी केलेल्या गदारोळामुळे कामकाज मंगळवारी (ता. २५) दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले. विधान परिषदेचे कामकाज सुरू होताच विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी शेतकरी कर्जमाफी फसवी असल्याचे सांगत सरकारचा निषेध केला. मात्र, सत्ताधारी बाकावरून  दरेकर यांच्या वक्तव्याला विरोध झाल्यामुळे विरोधकांनी वेलमध्ये उतरून गोंधळ सुरू केला. या गदारोळातच सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी प्रश्नोत्तराचा तास पुकारला. त्यानंतरही गोंधळ सुरूच राहिल्याने कामकाज पहिल्यांदा ३० मिनिटांसाठी तहकूब करावे लागले, कामकाज सुरू होताच अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना कोरडवाहू क्षेत्रासाठी हेक्टरी २५ हजार तर बागायतीसाठी ५० हजार हेक्टरी मदत कधी देणार असा सवाल दरेकर यांनी उपस्थित केला. यामुळे दोन्ही बाकांवरून शाब्दिक खडाजंगी झाली आणि कामकाज दिवसभरासाठी तहकूब करावे लागले.

सरकारकडून शेतकऱ्यांची फसवणूक ज्या गावात शेतकरी कर्जमाफीच्या याद्या जाहीर झाल्या, त्या गावातील ३५ टक्केही शेतकरी कर्जमाफीत येत नाहीत. सरकारकडून शेतकऱ्यांची फसवणूक होत आहे. सरकार ठोस पावले उचलत नाही, तोपर्यंत आमचा पवित्रा कायम राहील. शेतकऱ्यांना न्याय मिळत नाही तोपर्यंत सभागृहात आणि सभागृहाबाहेर आमचा संघर्ष चालूच राहील. कोल्हापूर जिल्ह्यातील ५० हजार शेतकऱ्यांनी फसव्या कर्जमाफीविरोधात पत्रे लिहिली आहेत. ती पत्रे राज्यपालांकडे सोपवणार आहोत. शेतकऱ्यांची कशी फसवणूक होतेय, ते राज्यपालांना सांगणार आहोत, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com