अकोला कृषी विदयापीठाने नियम डावलून दिलेल्या पदोन्नती रद्द

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

नागपूर : अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने केलेल्या सहयोगी प्राध्यापकांच्या पदोन्नत्या मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने रद्द ठरविल्या आहेत. नियम डावलून विद्यापीठाने पदोन्नत्या दिल्या, असा ठपका ठेवत सहयोगी प्राध्यापिका डॉ. आम्रपाली आखरे यांच्यासह पाच प्राध्यापकांनी याप्रकरणी जनहित याचिका दाखल केली होती. न्यायालयाचा हा निर्णय विद्यापीठ प्रशासनासाठी मोठा धक्‍का मानला जात आहे. 

याचिकेनुसार, मार्च २०१९ मध्ये अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने सहयोगी प्राध्यापक पदावरील प्राध्यापकांना पदोन्नत्या दिल्या होत्या. या पदोन्नत्या देताना विद्यापीठ परिनियम १९९० व सुधारित परिनियम २०१४ मध्ये ठरवून दिलेले निकष डावलण्यात आले. तसेच, नव्याने कार्यकारी परिषदेतून पारित करून घेतलेल्या सेवाज्येष्ठतेच्या आधारे पदोन्नत्या देण्यात आल्या. मात्र, परिषदेच्या विषयसूचीवर हा विषय न घेता पारित करण्यात आला. या विषयाबाबत परिषदेच्या सदस्यांना योग्य तो अभ्यास करण्यासाठी वेळदेखील देण्यात आलेला नाही. पुढील कार्यकारी परिषदेत सविस्तर चर्चा करून निर्णय घेण्याकरिता कार्यकारी परिषद सदस्यांनी विनंती अर्ज केला.

मात्र, त्याची दखल न घेतल्यामुळे सहयोगी प्राध्यापक डॉ. आम्रपाली आखरे, डॉ. मनीष देशमुख, डॉ. संजय काकडे, वनिता खोबरकर, डॉ. शिवाजी नागपूरे यांनी उच्च न्यायालयामध्ये धाव घेत याचिका दाखल केली. सुनावणीदरम्यान उच्च न्यायालयाने विद्यापीठाच्या कारभारावर ताशेरे ओढले. २०१९ मध्ये निकष बदलले गेल्यानंतरदेखील त्याचा आधार न घेता गैरमार्गाने पदोन्नत्या देण्यात आल्या, असे न्यायालयाने सुनावणीदरम्यान नमूद केले. त्यामुळे डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने दिलेले पदोन्नती आदेश उच्च न्यायालयाने रद्द केले. याचिकाकर्त्यातर्फे ॲड. आशुतोष धर्माधिकारी, ॲड. मोहन सुदामे, ॲड. भानुदास कुलकर्णी यांनी बाजू मांडली. तर प्रतिवाद्यांतर्फे ज्येष्ठ विधिज्ञ सुनील मनोहर, ॲड. अभय सांबरे यांनी बाजू मांडली. न्यायमूर्ती ए. एस. चांदूरकर आणि न्यायमूर्ती विनय जोशी यांच्या समक्ष याप्रकरणी सुनावणी झाली.    कार्यकारी परिषदेची भूमिका संशयास्पद बायोडाटासाठी देण्यात येणाऱ्या गुणात बदल करण्यात आला. एका पदासाठी पाच उमेदवार असा पदोन्नतीचा निकष आहे. परंतू या ठिकाणी एकास दोन असा नियम विद्यापीठ पातळीवरच निश्चि‍त करण्यात आला. सेवाज्येष्ठता आणि गुणवत्ता (मेरीट) याचाही पदोन्नतीसाठी विचार करण्याचा नियम आहे. परंतू या ठिकाणी सेवाज्येष्ठतेचाच विचार करण्यात आल्याचा आरोप आहे. कार्यकारी परिषदेचे चुकीचे निर्णयही यामुळे चव्हाट्यावर आले आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com