बचतगटांची उत्पादने ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर ः ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ

मुंबई : ‘कोरोना’च्या संकटकाळात बचतगटांचा व्यवसाय ठप्प झाला होता. पण आता बचतगटांची उत्पादने ही ॲमेझॉन आणि जीईएम या ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर उपलब्ध करून देण्यात आली आहेत, अशी माहिती ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली.
ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ
ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ

मुंबई : ‘कोरोना’च्या संकटकाळात बचतगटांचा व्यवसाय ठप्प झाल्याने त्यांना मोठा फटका बसला होता. ग्राहकांनाही बचतगटांच्या वस्तूंपासून वंचित राहावे लागले होते. पण आता बचतगटांची उत्पादने ही ॲमेझॉन आणि जीईएम या ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर उपलब्ध करून देण्यात आली असून त्यामुळे बचतगटांना व्यवसाय आणि ग्राहकांना हव्या असलेल्या वस्तू घरपोच मिळणार आहेत, अशी माहिती ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली.

मंत्री मुश्रीफ यांनी नुकताच मंत्रालयात या उपक्रमाचा प्रारंभ केला. या वेळी ग्रामविकास विभागाचे अपर मुख्य सचिव अरविंदकुमार, उमेद अभियानाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आर. विमला, उपमुख्य कार्यकारी अधिकारी दादासाहेब गुंजाळ आदी उपस्थित होते.

स्वयंसहाय्यता समूहांच्या उत्पादनांना बाजारपेठ मिळवून देण्यासाठी उमेद अभियानामार्फत विविध स्तरावर सरस प्रदर्शनांचे आयोजन करण्यात येते. परंतु स्वयंसहाय्यता समूहांनी तयार केलेल्या उत्पादनांना वर्षभर मागणी असते. त्यामुळे प्रदर्शन संपल्यानंतरही ग्राहकांना बचतगटांच्या वस्तू वर्षभर मिळाव्यात यासाठी ॲमेझॉन व जीईएमसारखी ऑनलाइन बाजारपेठ उपलब्ध करून देण्यात आली आहे. सध्या ॲमेझॉनवर ३३ तर जीईएम पोर्टलवर ५० उत्पादनांची नोंद करण्यात आली आहे. यामुळे या उत्पादनांना आता आंतरराष्ट्रीय बाजारपेठ उपलब्ध होत आहे, असे मुश्रीफ यांनी सांगितले.

ॲमेझॉनवर ३३ उत्पादने उपलब्ध प्रायोगिक तत्त्वावर कागदी बॅग्स व टेराकोटा दागिने अशा दोन उत्पादनांची नोंदणी या संकेतस्थळावर करण्यात आली होते. याला मिळालेल्या भरघोस प्रतिसादानंतर आता ३३ उत्कृष्ट उत्पादनांची या संकेतस्थळांवर नोंदणी करण्याचे ठरले. वर्धा जिल्ह्यातील स्वयंसहाय्यता समूहांनी तयार केलेल्या विविध उत्पादनांची नोंदणी ॲमेझॉन संकेतस्थळावर करण्यात आली आहे. यामध्ये विविध प्रकारचे पापड (८ प्रकार), पेपर बॅग (४ प्रकार), टेराकोटा ज्वेलरी (४ प्रकार), सरगुंडे, कुरडई, हळद पावडर, मसाले (४ प्रकार), रेशमी ज्वेलरी (४ प्रकार), शेवई, मुगवडी, न्युट्री बिस्किट, मास्क (८ प्रकार) यांचा समावेश आहे.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com