राज्यसभा निवडणुकीसाठी शरद पवार यांचा उमेदवारी अर्ज दाखल

राष्ट्रवादी काॅंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्यसभा निवडणुकीसाठी अर्ज दाखल केला
राष्ट्रवादी काॅंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्यसभा निवडणुकीसाठी अर्ज दाखल केला

मुंबई  : राज्यसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपला उमेदवारी अर्ज बुधवारी (ता. ११) दाखल केला. विधानभवनात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या उपस्थितीत श्री. पवार यांनी अर्ज भरला. 

मात्र, काँग्रेस चौथ्या जागेसाठी अजूनही आग्रही असल्यामुळे राष्ट्रवादीच्या दुसऱ्या उमेदवार फौजिया खान तूर्तास ‘वेट अँड वॉच’ या भूमिकेत आहेत. राज्यसभेच्या चौथ्या जागेबाबत समन्वय समितीची महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे. या बैठकीत यावर तोडगा काढण्याची शक्यता आहे. राज्यसभेसाठी काँग्रेसने अद्याप आपला उमेदवार जाहीर केलेला नाही. त्यासोबतच शिवसेनेच्या उमेदवाराबाबत ‘सस्पेन्स’ही कायम आहे. महाविकास आघाडीतील चौथ्या जागेवरून काँग्रेस- राष्ट्रवादीत चढाओढ पाहायला मिळत आहे. राष्ट्रवादीने फौजिया खान यांच्या नावाची घोषणा केल्यानंतरही काँग्रेस सतीश चतुर्वेदी यांच्या उमेदवारीसाठी आग्रही होती. प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेतल्यानंतर तणाव निवळल्याचे चित्र होते. परंतु अद्यापही तिढा सुटलेला दिसत नाही.

राज्यसभेच्या महाराष्ट्रातील सात जागांसाठी गुरुवारी (ता. २६) निवडणूक होणार आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत शुक्रवारपर्यंत (ता. १३) आहे. संख्याबळानुसार महाविकास आघाडीचे चार, तर भाजपचे तीन उमेदवार निवडून येऊ शकतात. राष्ट्रवादी दोन तर काँग्रेस- शिवसेना प्रत्येकी एक जागा लढणार असल्याचे बोलले जात होते.

भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक झाली असून, राज्यसभा उमेदवारांची घोषणाही लवकरच होणार आहे. भाजपकडून एकनाथ खडसे आणि छत्रपती उदयनराजे भोसले यांची नावे निश्चित मानली जात असली, तरी अधिकृत उमेदवारांची नावे गुलदस्तातच आहेत. रिपाइंचे अध्यक्ष रामदास आठवले आज राज्यसभा निवडणुकीसाठी उमेदवारीचा अर्ज दाखल करणार आहेत.

शिवसेनेतही चुरस शिवसेनेतही राज्यसभा उमेदवारीसाठी तिरंगी चुरस पाहायला मिळत आहे. काँग्रेसमधून आलेल्या प्रियंका चतुर्वेदी, माजी खासदार चंद्रकांत खैरे यांची नावे चर्चेत आहेत. परंतु माजी मंत्री दिवाकर रावते राज्यसभेच्या उमेदवारीचे प्रबळ दावेदार मानले जात असल्याची चर्चा आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com