सांगलीतील लघू, मध्यम प्रकल्पांत ४४ टक्के साठा

सांगली ः जिल्ह्यात ८४ मध्यम आणि लघू प्रकल्प आहेत. या प्रकल्पांची एकूण पाणी साठवण क्षमता ७८५३ दशलक्ष घनफूट असून सध्या या प्रकल्पांमध्ये ३४७८ दशलक्ष घनफूट म्हणजेच ४४ टक्के पाणीसाठा झाला आहे.
संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

सांगली  ः जिल्ह्यात ८४ मध्यम आणि लघू प्रकल्प आहेत. या प्रकल्पांची एकूण पाणी साठवण क्षमता ७८५३ दशलक्ष घनफूट असून सध्या या प्रकल्पांमध्ये ३४७८ दशलक्ष घनफूट म्हणजेच ४४ टक्के पाणीसाठा झाला आहे.  पंधरा दिवसांपूर्वी जिल्ह्यातील सर्व भागांत पुरेसा पाऊस झाला. त्यामुळे प्रकल्पांमधील पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. गेल्या महिन्याच्या तुलनेत ११ टक्क्यांनी पाणीसाठा वाढला आहे. जत तालुक्यातील २८ तलावांत अवघा ११ टक्के पाणीसाठा आहे. सध्या ‘म्हैसाळ’चे पाणी सोडल्याने या तालुक्यातील तलावांमध्ये पाणीसाठा होईल. जिल्ह्यात जुलै महिन्यात पावसाने दडी मारली होती. त्यामुळे ऐन पावसाळ्यात पाणीटंचाईला सामोरे जावे लागण्याची शक्यता होती. मध्यम आणि लघू प्रकल्पांतील पाणीसाठ्यात घट होत चालली होती. जुलै महिन्यात ८४ प्रकल्पांमध्ये ३३ टक्के पाणीसाठा शिल्लक होता. जत तालुक्यातील २८ प्रकल्पांत अवघा ७ टक्के पाणीसाठा शिल्लक होता. त्यामुळे जत तालुक्यात तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली होती.  

दरम्यान, ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीपासून जिल्ह्यात सर्वदूर पावसाने हजेरी लावली. त्यामुळे शेतकरी सुखावले. अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे मध्यम व लघू प्रकल्पांतील पाणीसाठा वाढू लागला. तासगाव, खानापूर या तालुक्यातील प्रकल्प ८३ टक्के भरले आहेत. त्यामुळे या तालुक्यातील पाणीप्रश्न मार्गी लागला आहे.

दरम्यान, टेंभू आणि म्हैसाळ उपसा सिंचन योजना सुरू करण्यात आल्या आहेत. या योजनांच्या माध्यमातून मध्यम आणि लघू प्रकल्प भरून घेतले जाणार असल्याने पुढील आठवड्यात या प्रकल्पांतील पाणीसाठ्यात आणखी वाढ होईल. त्यामुळे दुष्काळग्रस्त पट्ट्यासह इतर भागात पाणीटंचाई भासणार नाही. गत महिन्यात जत तालुक्यातील २८ प्रकल्पांत अवघा ७ टक्के पाणीसाठा होता. परंतु, तालुक्यातील अनेक भागांत पाऊस झाल्याने पाणीसाठ्यात ४ टक्क्यांनी वाढ झाली असल्याचे पाटबंधारे विभागाच्या अहवालात नमूद केले आहे.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com