
खरीप पिकांची आवक (Kharif Crop arrival) सुरू होऊन आता जवळ जवळ दीड महिना झालाय. १ ऑक्टोबर ते २५ नोव्हेंबर दरम्यान, गेल्या वर्षातील याच कालावधीच्या तुलनेने, देशातील बाजार समित्यांमध्ये सोयाबीनची आवक (Soybean Arrival) ३२ टक्क्यांनी वाढली. मका (१३ टक्के), कांदा (२२ टक्के) व टोमॅटो (१५ टक्के) यांच्याही आवकेत वाढ झाली. कापसाची आवक (Cotton Arrival) मात्र गेल्या वर्षीच्या तुलनेने ४४ टक्क्यांनी कमी आहे.
मक्याची मागणी वाढती आहे; त्यामुळे आवकेत वाढ झाली तरी किमतीसुद्धा गेल्या महिन्यात वाढत होत्या. कापूस व सोयाबीनच्या किमतीसुद्धा नोव्हेंबर महिन्यात वाढत होत्या. कांद्याच्या आवकेचा परिणाम मात्र किमती घसरण्यावर झाला. पिंपळगावमध्ये या महिन्यात कांद्याच्या किमती रु. २६५० वरून रु. १४५० वर आल्या. या पूर्वी २०११, २०१६ व २०१८ च्या नोव्हेंबरमध्ये कांद्याच्या किमती रु. १००० पेक्षा कमी झाल्या होत्या. वाढत्या आवकेचा परिणाम टोमॅटोच्या किमतींवरही झाला. कांदा व टोमॅटो हे नाशीवंत असल्याने आवकेचा परिणाम त्यांच्या किमतींवर लगेच होतो. या सप्ताहात कांद्याने रु. १,४२२ ची पातळी गाठली आहे, तर टोमॅटो रु. ४०० वर आले आहे.
या सप्ताहामध्ये प्रमुख शेतीमालाच्या किमतींतील सविस्तर चढ-उतार खालील प्रमाणे आहेत ः
कापूस/कपाशी
MCX मधील कापसाचे व कपाशीचे राजकोटमधील स्पॉट भाव (रु. प्रति १७० किलोची गाठी) नोव्हेंबर महिन्यात वाढत होते. गेल्या सप्ताहात कापसाचे स्पॉट भाव १.४ टक्क्याने वाढून रु. ३३,१०० वर आले होते; या सप्ताहात ते ०.४ टक्क्याने घसरून रु. ३२,९६० वर आले आहेत. डिसेंबर डिलिव्हरी भाव ०.१ टक्क्याने वाढून रु. ३१,४१० वर आले आहेत. कपाशीचे स्पॉट भाव (प्रति २० किलो) ०.५ टक्क्याने घसरून रु. १,७८८ वर आले आहेत. नवीन वर्षासाठी कपाशीचे हमीभाव लांब धाग्यासाठी (प्रति क्विंटल) रु. ६,३८० व मध्यम धाग्यासाठी रु. ६,०८० जाहीर झाले आहेत.
मका
मक्याच्या स्पॉट (छिंदवाडा) किमती नोव्हेंबर महिन्यात वाढत होत्या. गेल्या सप्ताहात स्पॉट किमती १.३ टक्क्याने वाढून रु. २,२०० वर आल्या होत्या. या सप्ताहातसुद्धा त्या रु. २,२०० वर स्थिर आहेत. फ्यूचर्स (डिसेंबर डिलिव्हरी) किमती रु. २,२१० वर आल्या आहेत. फेब्रुवारी फ्यूचर्स किमती रु. २,२३४ वर आहेत. मक्याचा हमीभाव रु. १,९६२ आहे. सध्याच्या किमती हमीभावापेक्षा अधिक आहेत. या वर्षी खरीप मक्याचे देशातील उत्पादन विक्रमी २३.१ दशलक्ष टन राहण्याचा केंद्र सरकारचा अंदाज आहे. गेल्या वर्षी ते २२.६३ दशलक्ष टन होते. परंतु मागणीसुद्धा, विशेषतः पशुखाद्यासाठी, वाढती राहील.
हळद
हळदीच्या स्पॉट (निजामाबाद) किमती नोव्हेंबर महिन्यात वाढत होत्या. गेल्या सप्ताहात त्या १.५ टक्क्याने वाढून रु. ७,५१५ वर आल्या होत्या. या सप्ताहात त्या १ टक्क्याने घसरून रु. ७,४४१ वर आल्या आहेत. डिसेंबर फ्यूचर्स किमती रु. ७,१५६ वर आल्या आहेत. एप्रिल फ्यूचर्स किमती रु. ७,९४० वर आल्या आहेत.
हरभरा
हरभऱ्याच्या स्पॉट (बिकानेर) किमती गेल्या सप्ताहात १.७ टक्क्याने वाढून रु. ४,७२२ वर आल्या होत्या. या सप्ताहात त्या ५.३ टक्क्यांनी वाढून रु. ४,९७३ वर आल्या आहेत. हरभऱ्याचा हमीभाव रु. ५,३३५ आहे.
मूग
मुगाच्या किमती नोव्हेंबर महिन्यात घसरत होत्या. मुगाची स्पॉट किमत (मेरटा) या सप्ताहात रु. ७,१०० वर स्थिर आहे. मुगाचा हमीभाव रु. ७,७५५ जाहीर झाला आहे. सध्या किमती हमीभावापेक्षा कमी आहेत.
सोयाबीन
गेल्या सप्ताहात सोयाबीनची स्पॉट किमत (इंदूर) २ टक्क्यांनी घसरून रु. ५,६२७ वर आली होती; या सप्ताहात ती रु. ५,६२४ वर आली आहे. सोयाबीनचा हमीभाव रु. ४,३०० आहे.
तूर
तुरीची स्पॉट किमत (अकोला) या सप्ताहात १ टक्क्याने घसरून रु. ७,००७ वर आली आहे. तुरीचा हमीभाव रु. ६,६०० आहे.
कांदा
कांद्याच्या किमती नोव्हेंबर महिन्यात घसरत होत्या. कांद्याचे दर (पिंपळगाव) गेल्या सप्ताहात रु. १,८०० होते; या सप्ताहात ते रु. १,४२२ वर आले आहेत.
टोमॅटो
गेल्या सप्ताहात टोमॅटोची स्पॉट किंमत (जुन्नर, नारायणगाव) रु. ४०० वर आली होती. या सप्ताहातसुद्धा ती रु. ४०० वर आहे.
(सर्व किमती प्रति क्विंटल; कापसाची किंमत प्रति १७० किलोची गाठी; कपाशीची किंमत प्रति २० किलो.)
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.