
Sangli News : देशातील हळद विक्रीचा हंगाम ४० टक्क्यांपेक्षा अधिक आटोपला आहे. मात्र, हंगामाच्या प्रारंभापासूनच हळदीच्या दरात फारशी सुधारणा झालेली नाही. त्यामुळे उत्पादकांना आर्थिक फटका बसला आहे. शिवाय दरावर मंदीचे सावट असल्याने शेतकऱ्यांकडे अंदाजे ४५ ते ५० लाख पोती विक्रीविना शिल्लक आहेत.
देशात ३ लाख ४९ हजार ६४२ हेक्टरवर हळदीची लागवड झाली आहे. अर्थात दोन वर्षांपूर्वीपेक्षा गेल्यावर्षी ५६ हजार ७६६ हेक्टरने लागवड वाढली. परिणामी यंदा उत्पादनात वाढ होणार हे निश्चित होते.
देशात सुमारे ८० लाख पोती (एक पोते ५० किलोचे) उत्पादन होते. देशात ९० लाख ते १ कोटी पोती हळदीचे उत्पादन होईल, असा अंदाज व्यापाऱ्यांनी वर्तविला आहे. फेब्रुवारीपासून हळद विक्रीस सुरु झाली.
तेव्हापासून दरात वाढ झाली नाही. आरंभीच प्रतिक्विंटल एक हजार रुपयांनी दर कमी होते. त्यामुळे शेतकरी हळद विकायची की नाही, अशा द्विधा मनःस्थितीत होते.
दरम्यान, बाजारपेठेत हळदीच्या मागणीपेक्षा पुरवठा अधिक झाला. यासाऱ्याचा परिणाम हळदीच्यादरावर झाला. सांगली जिल्ह्यासह सातारा, कर्नाटकातील हंगाम ३० टक्के बाकी आहे.
मराठवाड्यातील हळद विक्रीचा हंगाम ३० टक्के हळद आटोपला आहे. ७० टक्के हळद शेतकऱ्यांकडे आहे. पावसाच्या शक्यता कमी झाल्यास आवकेत प्रचंड वाढ होईल.
तर तेलंगणासह अन्य राज्यातील हळदीचा हंगाम ३० टक्के बाकी आहे. तमिळनाडूमध्ये २५ टक्के हळद विक्री झाली आहे. गेल्या हंगामातील २० लाखापेक्षा अधिक पोती अजूनही व्यापाऱ्यांकडे शिल्लक आहेत.
यंदा आतापर्यंत हळदीच्या दरात प्रतिक्विंटलला सरासरी २०० रुपयांपासून ७०० रुपयांपर्यंत वाढ राहिली. सध्या हळदीला ५५०० ते ८५०० रुपये दर आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा खर्चही निघत नसल्याची स्थिती आहे.
गेल्या पंधरा दिवसापासून वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. त्यामुळे हळदीची आवक घटली. त्यामुळे दरात प्रति क्विंटलला ८०० रुपयांची तेजी आली होती. परंतु ती फारकाळ टिकली नाही. गेल्या चार ते पाच दिवसांत पुन्हा ५०० ते ६०० रुपयांनी दर घटले आहेत.
थोडक्यात महत्त्वाचे
- मागणीपेक्षा पुरवठा झाल्याने दरात घसरण
- देशात ९० ते १ कोटी पोती हळदीचे उत्पादन शक्य
- गेल्या हंगामातील २० लाखापेक्षा जास्त हळद शिल्लक
- हळद ठेवण्यासाठी जागा अपुरी
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.