
Amravati News : खरीप हंगामातील तुरीला ९ हजार रुपयांची झळाळी मिळाली असली, तरी तूरडाळीचे भाव मात्र चांगलेच वधारले आहेत. तुरीचे खुल्या बाजारातील वाढते दर शेतकऱ्यांना दिलासा देणारे आहेत.
सध्या डाळीचा दर १३० रुपये प्रतिकिलो असून, पुरवठा व मागणी यातील अंतर वाढत असल्याने दर नजीक काळात १७५ ते १८५ पर्यंत जाण्याचा अंदाज जाणकारांनी वर्तविला आहे.
या वर्षी तुरीच्या उत्पादनाची सरासरी घसरली आहे. त्यामुळे मागणी असली तरी आवक त्या तुलनेत फार कमी असल्याने तुरीचे खुल्या बाजारातील दर वधारले आहेत.
केंद्राने तुरीला ६६०० रुपये हमीदर दिला असला तरी कोणत्याच शासकीय केंद्रांवर तुरीची खरेदी झाली नसल्याने शासनालाही खुल्या बाजारातून तूर खरेदी करावी लागणार आहे. हंगामाच्या प्रारंभीपासूनच तुरीला सहा हजारांहून अधिक भाव मिळाला आहे.
हंगामात तुरीचे पेरणी क्षेत्र वाढले होते. मात्र अतिवृष्टी व नंतर दव गेल्याने तुरीचे नुकसान झाले व त्याचा एकूणच परिणाम उत्पादन सरासरीवर झाला. मागणी अधिक व पुरवठा कमी यामुळे खुल्या बाजारात सहा हजारांहून अधिक दर मिळू लागला.
हळूहळू दरात सुधारणा होत एप्रिलमध्ये ८८०० रुपये दर मिळाला. मे मध्ये हंगाम ओसरत आला असताना तुरीचा दर नऊ हजारांवर गेला. हा दर आणखी वाढेल, असा अंदाज खरेदीदारांनी वर्तविला आहे.
शेतकऱ्यांना समाधान मिळेल, असे तुरीचे दर वधारत असताना डाळीचे दरही चांगलेच वधारू लागले. सध्या बाजारात तूरडाळ १३० रुपये प्रतिकिलो आहे. मार्चमध्ये हा दर ११९ रुपयांवर गेल्यावर सरकारने स्टॉक लिमिट लावली. मात्र दर कमी झाले नाहीत. ऑक्टोबरमध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे उत्पादन घटल्याने ही स्थिती निर्माण झाली आहे.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.