मराठवाड्यात गाळपाविना २.८० लाख टन ऊस शिल्लक

अद्याप २६ कारखान्यांकडून गाळप सुरू; संपूर्ण ऊस गाळपाचे प्रशासनाकडून नियोजन
मराठवाड्यात गाळपाविना २.८० लाख टन ऊस शिल्लक
Excess Sugarcane Agrowon

औरंगाबाद : राज्यात यंदाच्या हंगामात (Sugar Season) ३१ मेअखेर ३.७५ लाख टन ऊस गाळपाविना शिल्लक (Excess Sugarcane) असल्याची माहिती साखर आयुक्तालयाच्या सूत्रांनी दिली. जून उजाडला तरीही उसाची वेळेत तोड होत नसल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. तर उसाचे एक टिपरूही गाळपाविना (Sugarcane Crushing) शिल्लक राहणार नसल्याचा दावा प्रशासन करीत आहे.

राज्यात साखर कारखान्यांनी १ जूनअखेर १३१६.८ लाख टन उसाचे गाळप केले असून १३६९.६१ लाख क्विंटल साखर तयार झाली आहे. राज्यातील गाळप केलेल्या कारखान्यांना १०.४ टक्के साखर उतारा मिळाला आहे. तर राज्यात २६ कारखान्यांकडून अद्याप उसाचे गाळप सुरू आहे.

मराठवाड्यात २.८० लाख टन ऊस गाळपाविना शिवारात उभा आहे. त्यामुळे शेतकरी ऐनकेनप्रकारे उसाचे गाळप व्हावे यासाठी प्रयत्न करत आहेत. मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना व बीड या तीन जिल्ह्यांत ३१ मे अखेर २ लाख ८० हजार टन ऊस शिल्लक आहे. एकीकडे पावसाचे संकेत असल्याने शिल्लक असलेल्या उसाचे गाळप पावसापूर्वी होईल की नाही याची चिंता शेतकऱ्यांना लागली आहे.

बीड जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांची आत्महत्या व जालना जिल्ह्यातील शेतकरी दांपत्याचा विष पिण्याच्या प्रयत्नामुळे उसाचा प्रश्न किती गंभीर आहे हे अधोरेखित झाले आहे. एकीकडे शासन व प्रशासन पूर्ण ऊस गाळला जाईल, असा दावा करत असतानाच आपलं रान पेरणीसाठी खाली व्हावं म्हणून ऊस उत्पादक शेतकरी कोणतीही तडजोड करून ऊस कारखान्याला घालण्याचा प्रयत्न करताना दिसतो आहे. एकीकडे ऊस लांबल्यामुळे उत्पादनात घट व दुसरीकडे तोडणीसाठी होणारी परवड या दुहेरी संकटात ऊस उत्पादक सापडला आहे.

जालना जिल्ह्यातील समर्थ अंबड, समर्थ अंबड (सागर), समृद्धी शुगर व श्रद्धा परतुर या चार कारखान्यांच्या कार्यक्षेत्रात १ लाख २६ हजार ३०७ टन ऊस शिल्लक आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील संत एकनाथ पैठण या कारखान्याच्या कार्यक्षेत्रात १९९७ टन ऊस शिल्लक आहे. तर बीड जिल्ह्यातील लोकनेते माजलगाव, एन एस एल शुगर्स माजलगाव, छत्रपती माजलगाव या या तीन कारखान्यांच्या कार्यक्षेत्रात ४८ हजार ७६९ टन ऊस शिल्लक असल्याची माहिती साखर विभागाच्या सूत्रांनी दिली. या सर्वच कारखान्यांच्या कार्यक्षेत्रात जवळपास १३२ हार्वेस्टर ऊस तोडणीसाठी कार्यरत असल्याच साखर विभागाचं म्हणणं आहे. ३१ मे अखेर गाळपात सहभागी झालेल्या कारखान्यांनी ३ कोटी २३ लाख ५० हजार ५९८ टन उसाचे गाळप करत ३ कोटी २० लाख २४ हजार ७५४ क्विंटल साखरेचे उत्पादन केले आहे. त्यामध्ये उस्मानाबाद जिल्ह्यातील १४ कारखान्यांनी यंदाच्या गाळप हंगामात सहभाग नोंदविला. या कारखान्यांनी ७० लाख ४८ हजार १०० टन उसाचे गाळप केले. या गाळपातून सरासरी ९.६० टक्के साखर उताऱ्याने ६७ लाख ६२ हजार ८१४ क्विंटल साखरेचे उत्पादन केले.

औरंगाबाद जिल्ह्यातील ७ कारखान्यांनी २८ लाख ५५ हजार २४४ टन उसाचे गाळप करत सरासरी १०.४४ टक्के उताऱ्याने २९ लाख ८० हजार ७१० क्विंटल साखरेचे उत्पादन केले. जालना जिल्ह्यातील पाच कारखान्यांनी २८ लाख २८ हजार ३५५ टन उसाचे गाळप करत सरासरी १०.३३ टक्के उताऱ्याने २९ लाख ७७ हजार ४०० क्विंटल साखरेचे उत्पादन केले. बीड जिल्ह्यातील सात कारखान्यांनी ४६ लाख ८४ हजार ८९३ टन उसाचे गाळप करत सरासरी ८.६८ टक्के उताऱ्याने ४० लाख ६५ हजार ३७० क्विंटल साखरेचे उत्पादन केले. परभणी जिल्ह्यातील सहा कारखान्यांनी ४३ लाख ४३ हजार १७७ टन उसाचे गाळप करत सरासरी १०.४१ टक्के साखर उताऱ्याने ४२ लाख १० हजार २९५ क्विंटल साखरेचे उत्पादन केले. हिंगोली जिल्ह्यातील पाच कारखान्यांनी २१ लाख ४८ हजार ८ टन उसाचे गाळप करत सरासरी १०.५४ टक्के साखर उताऱ्याने २२ लाख ६४ हजार १७० क्विंटल साखरेचे उत्पादन केले.

नांदेड जिल्ह्यातील सर्व सहा कारखान्यांनी २५ लाख ३० हजार ७०७ टन उसाचे गाळप करत सरासरी ९.८० टक्के साखर उताऱ्याने २४ लाख ७९ हजार ३५ क्विंटल साखरेचे उत्पादन केले. लातूर जिल्ह्यातील दहा कारखान्यांनी ५९ लाख १२ हजार ११४ टन उसाचे गाळप करत सरासरी १०.६३ टक्के साखर उताऱ्याने ६२ लाख ८४ हजार ९६० क्विंटल साखर उत्पादन केले. दुसरीकडे मराठवाड्यात अजूनही शिल्लक उसाचा प्रश्न कायम आहे.

चौकट ----
मराठवाड्यात २० कारखाने सुरू
यंदाच्या गाळप हंगामात सहभागी झालेल्या ६० कारखान्यांपैकी २० कारखान्यांचे गाळप अजूनही सुरूच आहे. त्यामध्ये उस्मानाबादमधील तीन, औरंगाबादमधील २, जालन्यातील चार, बीडमधील तीन, परभणीतील दोन, हिंगोलीतील एक, लातूर जिल्ह्यातील पाच कारखान्यांचा समावेश आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com