साखरनिर्यातीतून मिळणार ३० हजार कोटी रुपये

विक्रमी निर्यातीकडेच भारताची वाटचाल सुरूच
Sugar Export
Sugar ExportAgrowon

कोल्हापूर : साखर निर्यातीत (Sugar Export) धडाकेबाज कामगिरी होत असल्याने यंदा आजपर्यंतचे निर्यातीचे विक्रम मोडणार आहेत. अपेक्षित ९५ लाख टन साखरनिर्यात झाल्यास यातून भारतीय साखर कारखान्यांना तब्बल ३० हजार कोटी रुपये मिळू शकणार आहेत. हा साखर उद्योगाच्या दृष्टीने उचांक असणार आहे. (Sugar Production)

राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अनेक अडचणींचा सामना करत यंदा विक्रमी साखर निर्यात झाली. काही देशांमध्ये भारतीय साखरेला मागणी कमी असली, तरी अनपेक्षितपणे अन्य देशांतून साखरेला मागणी वाढली. त्यामुळे भारतातून साखर जाण्याचे प्रमाण वाढतच राहिले. आतापर्यंत निर्यात झालेल्या देशांमध्ये इंडोनेशियाला सर्वाधिक १५ टक्के साखर निर्यात झाली. त्याखालोखाल बांगलादेशला दहा टक्के साखर निर्यात झाली. अफगाणिस्तान, सोमालिया, जिबूती आणि मलेशिया यांना प्रत्येकी तीन टक्के साखर निर्यात झाली. विशेष म्हणजे यंदा साखर कारखान्यांनी थकीत निर्यात अनुदानाचा कोणताही बाऊ केला नाही. अनुदान मिळो अथवा न मिळो बाहेरून साखरेला मागणी असल्याने साखर कारखान्यांनी मागणी असेल त्याची साखर बाहेर पाठवायला पहिल्यांदाच स्वयंस्फूर्तीने प्राधान्य दिले.

गेल्या दोन वर्षांपासून केंद्र सरकारला साखर कारखान्याने साखर निर्यात करावी यासाठी प्रवृत्त करावे लागत होते. जे साखर कारखाने साखरनिर्यात करणार नाहीत त्या साखर कारखान्याचे कोटे काढून घेऊन साखर निर्यात करणाऱ्या कारखान्यांना देण्याचे धोरण केंद्राने गेल्या वर्षी राबविले. ज्या साखर कारखान्यांनी साखर निर्यात केली त्यांना फायदा झाला. हे पाहून बहुतांशी साखर कारखान्यांनी त्यांचा कित्ता गिरवत साखरनिर्यातीला प्राधान्य दिले. यामुळे काही बंदरावर ही साखरनिर्यातीचा उच्चांक झाला. अजून ही पावसाळा एक महिना असल्याने जेवढी जास्तीत जास्त साखर बाहेर जाईल तितकी फायदेशीर असल्याने कारखानदार तसेच बंदर व्यवस्थापनाचे प्रयत्न सुरू आहेत. विक्रमी निर्यात होत असल्याने साखर उत्पादन वाढीचा काहीसा दबाव कमी असल्याचे चित्र आहे

यंदा मोठ्या प्रमाणात साखरनिर्मिती सुरू असली तरी साखरेचे दर मोठ्या प्रमाणात खाली आले नाहीत याला कारणही जादा प्रमाणात होणारी निर्यात हेच आहे. आतापर्यंत ८५ लाख टन साखर निर्यात करार झाले आहेत. यापैकी ६५ लाख टन साखर प्रत्यक्षात निर्यात झाली आहे. गेल्या वर्षीपेक्षा १४ टक्के साखर उत्पादनात वाढ आहे. महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, कर्नाटक या राज्यांचा देशाच्या एकूण साखर उत्पादनात तब्बल ८५ टक्के वाटा आहे.
प्रकाश नाईकनवरे, व्यवस्थापकीय संचालक, राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघ

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com