
सांगली : जून महिना पावसाविना कोरडा गेला. त्यातच पाण्याची कमतरता यामुळे शेतकरी भाजीपाला लागवडीसाठी (Vegetable Cultivation) पुढे येत नसल्याचे चित्र आहे. परिणामी भाजीपाला रोपांची (Vegetable Seedling) मागणी ५० टक्क्यांनी कमी झाली असल्याची रोपवाटिका मालकांनी (Nursery Owner) सांगितले आहे. पाऊस लांबणीवर पडला तर भाजीपाल्याच्या क्षेत्रात २० टक्क्यांनी घटण्याची शक्यता उद्योगातील जाणकारांनी व्यक्त केली आहे.
जिल्ह्यात भाजीपाल्याचे क्षेत्र ६ हजार हेक्टरपेक्षा जास्त आहे. प्रत्येक हंगामात भाजीपाल्याच्या क्षेत्रात वाढ अथवा कमी होत असते. भाजीपाला लागवडीसाठी शेतकरी मे महिन्यात भाजीपाला लागवडीसाठी शेताची मशागत करून ठेवतात. जूनच्या दुसऱ्या आठवड्यात भाजीपाला पिकाची लागवड करण्यासाठी शेतकरी पुढे येतात. सर्वसाधारणपणे पुढे श्रावण, गणपती, दसरा या सणाला भाजीपाल्याची मागणी अधिक असते आणि दरही चांगले मिळतात. त्यामुळे शेतकरी थोड्या थोड्या क्षेत्रावर भाजीपाल्याचे उत्पादन घेऊन ते विक्रीचे काटेकोर नियोजन करतात. जून ते ऑगस्टपर्यंत भाजीपाल्याची लागवड सुरु असते.
यावर्षी हवामान खात्याने चांगला पाऊस पडेल असा अंदाज व्यक्त केला होता. त्यामुळे शेतकऱ्यांनी रोपवाटिकेत भाजीपाला रोपे खरेदीसाठी नोंदणीही केली आहे. ज्या भागात पुरेसे पाणी आहे, त्याठिकाणी भाजीपाला लागवड झाली आहे. मात्र पाण्याची कमतरता असल्याने भाजीपाला पीक धोक्यात आले असल्याचे दिसते आहे. मात्र जून महिना संपला तरी पावसाने हजेरी लावली नाही. जिल्ह्यातील बहुतांश ठिकाणी तुरळकच पाऊस झाला. परंतु हा पाऊस भाजीपाला लागवडीसाठी उपयुक्त नसल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. जिल्ह्यात पावसाने दडी मारली असून अनेक ठिकाणी पाण्याची कमतरता असल्याचे चित्र आहे. त्यामुळे जिल्ह्यात भाजीपाल्याच्या रोपांच्या मागणीत सुमारे ५० टक्के घट झाली आहे.
नोंदणी करून देखील रोपांची खरेदी नाही
भाजीपाला लागवड करायची असल्याने शेतकऱ्यांनी रोपवाटिकेत रोपे तयार करण्यासाठी नोंदणी केली आहे. लागवडीसाठी शेत तयार असून पाऊस नसल्याने तयार झालेली रोपे शेतकऱ्यांनी विकत घेतलेली नाहीत. त्यामुळे ही रोपे विक्री करण्यासाठी रोपवाटिका मालकांना तारेवरची कसरत करावी लागत असल्याचे त्यांनी सांगितले.
गेल्यावर्षी भाजीपाल्याला अतिवृष्टीचा फटका
गेल्यावर्षी जिल्ह्यात जूनच्या मध्यावर चांगला पाऊस झाला. त्यामुळे शेतकऱ्यांनी भाजीपाल्याची लागवड केली होती. मात्र, जुलैमध्ये अतिवृष्टी आणि महापूर यामुळे भाजीपाल्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असले तरी, त्यांनी पुढे लागवड करून झालेले नुकसान काढण्यासाठी लागवडीचे नियोजन केले.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.