जमीन सुपीकता, पीक फेरपालट हेच सूत्र

अनियंत्रित पाणी, खतमात्रा वापरामुळे जमीन सुपीकता आणि पीक उत्पादनावर प्रतिकूल परिणाम लक्षात आल्याने राजेगाव (ता. दौंड, जि. पुणे) येथील धनंजय सोमनाथ आटोळे यांनी योग्यवेळी शेती व्यवस्थापनात बदल केला. जमीन सुपीकता, सूक्ष्म सिंचन, फेरपालटीवर लक्ष केंद्रित करत उत्पन्नवाढीचे नियोजन त्यांनी ठेवले आहे.
Use of sprinkler irrigation in onion crop.
Use of sprinkler irrigation in onion crop.

अनियंत्रित पाणी, खतमात्रा वापरामुळे जमीन सुपीकता आणि पीक उत्पादनावर प्रतिकूल परिणाम लक्षात आल्याने राजेगाव (ता. दौंड, जि. पुणे) येथील धनंजय सोमनाथ आटोळे यांनी योग्यवेळी शेती व्यवस्थापनात बदल केला. जमीन सुपीकता, सूक्ष्म सिंचन, फेरपालटीवर लक्ष केंद्रित करत उत्पन्नवाढीचे नियोजन त्यांनी ठेवले आहे. राजेगाव (ता. दौंड, जि. पुणे) येथील धनंजय आटोळे यांच्या एकत्रित कुटुंबाची ५० एकर शेती आहे. वडील सोमनाथ आणि चुलते तात्यासाहेब यांचे एकत्रित १५ व्यक्तींचे कुटुंब आहे. उजनीचे बॅकवॉटर जवळ असल्याने गावशिवारातील बहुतांशी शेती क्षारपड होऊ लागल्यामुळे पीक उत्पादकता कमी होत आहे. या परिस्थितीवर मात करण्यासाठी दहा वर्षांपूर्वी धनंजय आणि त्यांचे बंधू अमोल यांनी पुढाकार घेतला. सुपीकता वाढ, जल, मृद्‌संधारण, ऊस पाचट व्यवस्थापन, ठिबक सिंचन, तुषार सिंचन आणि पीक फेरपालटीवर लक्ष केंद्रित केले. धनंजय हे कृषी पदवीधर असून त्यांच्याकडे पीक नियोजन आणि व्यवस्थापनाची जबाबदारी आहे. त्यांचे बंधू अमोल यांच्याकडे शेतीमधील यांत्रिकीकरणाची जबाबदारी आहे. चुलत बंधू सुयश हे सध्या वैद्यकीय शिक्षण घेत आहेत. कुटुंबातील प्रत्येक सदस्याकडे शेती आणि पशू व्यवस्थापनातील कामकाजाची जबाबदारी वाटून देण्यात आली आहे. त्यामुळे नियोजन सोपे झाले आहे. दहा वर्षांपूर्वी पाणी आणि रासायनिक खतांचे योग्य व्यवस्थापन नसल्याने जमीन क्षारपड होऊ लागली. त्याचा पीक उत्पादनावर प्रतिकूल परिणाम झाला. पीक उत्पादनात सुमारे ५० टक्क्यांपर्यंत घट झाली होती. यावर मात करण्यासाठी धनंजय यांनी पुढाकार घेतला. पीक नियोजन आणि जमीन सुधारणेबाबत धनंजय म्हणाले, की आम्ही शेती नियोजनाची नव्याने आखणी केली. जमिनीतील सेंद्रिय कर्ब वाढविण्यासाठी योग्य ते बदल करण्याचा निर्णय घेतला. यामध्ये पीक फेरपालट, खत, पाण्याचे काटेकोर नियोजन, माती परीक्षणानुसार संतुलित खत मात्रा, ऊस पाचटाच्या योग्य व्यवस्थापनावर भर दिला. जमिनीची सुपीकता टिकवून ठेवण्यासाठी दरवर्षी पिकांची फेरपालट करण्यास सुरुवात केली. बाजारपेठेनुसार ऊस, गहू, हरभरा, कांदा, हळद, केळी या पिकांचे क्षेत्र निश्‍चित केले. सध्या हरभरा दहा एकर, कांदा ४ एकर, उन्हाळी सोयाबीन २ एकर, खोडवा ऊस ८ एकर आणि आडसाली ऊस २२ एकर, हळद २ एकर आणि एक एकरावर चारा लागवड आहे. प्रत्येक पिकाचा जमा-खर्च ठेवला जातो. त्यामुळे पुढील नियोजन सोपे जाते. संपूर्ण शेती सूक्ष्म सिंचनाखाली... पाणी नियोजनाबाबत धनंजय म्हणाले, की पूर्वी आम्ही पाट पद्धतीने पाणी देत होतो. त्यामुळे पाण्याचा किती वापर केला जातो, हे लक्षात येत नव्हते. जमीन क्षारपड होऊ लागली. यातून धडा घेत मागील दहा वर्षांपूर्वी टप्प्याटप्प्याने संपूर्ण ५० एकर शेती ठिबक आणि तुषार सिंचनाखाली आणली. स्वयंचलित ठिबक सिंचनाचा वापर केल्याने पाणी आणि खताचे काटेकोर नियोजन केले जाते. त्याचा पीक उत्पादन वाढीसाठी फायदा झाला. जमीन सुपीकतेवर लक्ष  विविध पिकांना गरजेनुसार एकात्मिक पद्धतीने खतमात्रा दिली जाते. दरवर्षी ऊस गाळपाला गेल्यानंतर पाचटाची यंत्राच्या साह्याने कुट्टी करून शेतामध्ये कुजविली जाते. पिकाला ठरावीक काळानंतर शेण स्लरीचा वापर केला जातो. त्यामुळे पूर्वीपेक्षा रासायनिक खतांच्या वापरात ५० टक्के बचत शक्य झाली आहे. पीक लागवडीपूर्वी हिरवळीच्या पिकांची लागवड केली जाते. आता जमिनीचा सेंद्रिय कर्ब १.२५ पर्यंत गेला आहे. त्याचा जमीन सुपीकता आणि पीक उत्पादनवाढीसाठी फायदा दिसून झाला आहे. घरी दहा जनावरे असून, त्यापासून २० ट्रॉली शेणखत उपलब्ध होते. त्याचा वापर शेतीमध्ये केला जातो. गांडूळ खत, जिवामृत वापर  दरवर्षी पुरेशा प्रमाणात सेंद्रिय खताची उपलब्धता होण्यासाठी गांडूळ खतनिर्मिती केली जाते. दर दोन महिन्याला एक टन गांडूळ खत तयार होते. याचा वापर शेती तसेच ऊस रोपवाटिकेसाठी केला जातो. पीक काढणीनंतर शेतात शेळ्या, मेंढ्या बसविल्या जातात. तसेच जिवामृत तयार करून ठरावीक काळानंतर सर्व पिकांना दिले जाते. पीक उत्पादनात वाढ  योग्य नियोजनामुळे पीक उत्पादनात वाढ मिळू लागली आहे. याबाबत धनंजय म्हणाले, की उसाचे एकरी उत्पादन ३५ ते ४० टनांपर्यंत खाली आले होते. परंतु जमीन सुपीकता आणि पीक व्यवस्थापनातील बदलामुळे आता आम्ही एकरी ७० ते ८० टनांपर्यंत मजल मारली आहे. याचबरोबरीने हरभऱ्याचे एकरी ८ ते १० क्विंटल आणि कांदा पिकाची एकरी १५ ते २० टन उत्पादनाची सरासरी ठेवली आहे. पीक आणि जमीन व्यवस्थापनात केलेल्या बदलामुळे दरवर्षी रासायनिक खतामध्ये एकरी २० ते ३० हजार रुपये बचत झाली. ठिबक सिंचन आणि पाचट आच्छादनामुळे पिकातील तण नियंत्रणासाठी मजुरांचा खर्च वाचला. यांत्रिकीकरणावर भर दिलेला आहे. शेतीचा ताळेबंद 

पीक उत्पादन (एकरी) उत्पादन खर्च उत्पन्न (खर्च वजा जाता)
ऊस ७५ते ८० टन ४० ते ५० हजार रुपये एक लाख रुपये
हरभरा  ८ ते १० क्विं.  १० ते १२ हजार रुपये  ४० ते ४५ हजार रुपये
उन्हाळी कांदा १५ ते २० टन  ३० ते ४५ हजार रुपये ६० ते ७० हजार रुपये

मुलांना चांगले शिक्षण  शिक्षणाबाबत धनंजय म्हणाले, की मुलांना चांगले शिक्षण देण्याचा आमचा प्रयत्न आहे. सध्या मुले इंग्रजी माध्यम शाळेत शिकत आहेत. शेती अजून प्रगत झाली पाहिजे, त्यादृष्टीने कृषी तसेच पूरक उद्योगात मुलांनी पुढे शिकावे अशी कुटुंबाची इच्छा आहे. आरोग्यासाठी आर्थिक तरतूद  आरोग्याच्या दृष्टीने जागरूक राहून सर्व कुटुंबातील सदस्यांचा आरोग्य विमा काढला आहे. त्यासाठी ठरावीक रक्कम वेगळी काढली जाते. दर वर्षी हा खर्च होत असला तरी कुटुंबातील सदस्यांमध्ये अचानक उद्‌भवणाऱ्या आजाराची चिंता राहत नाही. वेळेवर चांगले उपचार मिळतात. अभ्यास दौऱ्यातून ज्ञानवृद्धी  कृषी विभाग, आत्मा विभाग तसेच कृषी विज्ञान केंद्रातील प्रशिक्षण आणि अभ्यास दौऱ्यामध्ये धनंजय यांचा नेहमी सहभाग असतो. आटोळे कुटुंबीय दैनिक ‘अॅग्रोवन’चे नियमित वाचक आहे. अंकातील विविध विषयांची कात्रणे काढून स्वतंत्र संग्रह केला आहे. राज्यातील कृषी विद्यापीठ तसेच प्रयोगशील शेतकऱ्यांना सातत्याने भेटी देऊन पीक व्यवस्थापनात बदल केले जातात. धनंजय आटोळे यांना २०१९ मध्ये ‘आत्मा‘तर्फे उत्कृष्ट शेतकरी तसेच २०१९-२० मध्ये पुणे जिल्हा परिषदेतर्फे कृषिनिष्ठ शेतकरी पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. संपर्क ः धनंजय आटोळे, ९६५७६७२२७७

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Agrowon
www.agrowon.com