खर्चात बचत हाच नफ्याचा पाया

दापशेड (ता. लोहा, जि. नांदेड) येथील विश्‍वनाथ होळगे यांनी मागील सात वर्षांपासून शेतीमध्ये रासायनिक घटकांचा वापर थांबवत संपूर्ण नैसर्गिक शेतीची कास धरली आहे. बहुविध पीक पद्धती, विषमुक्त अन्न उत्पादन याचा ध्यास घेतला आहे. एकूण नैसर्गिक पद्धतीने खर्चात बचत हाच आपल्या शेतीचा पाया असल्याचे ते सांगतात.
खर्चात बचत हाच नफ्याचा पाया
खर्चात बचत हाच नफ्याचा पाया

नांदेड शहरापासून ३० किलोमीटरवरील दापशेड (ता. लोहा) येथील होळगे कुटुंबीयांची १४ एकर शेती आहे. निविष्ठांचा वाढता खर्च कमी करण्याच्या उद्देशाने आई-वडिलांसह चार भाऊ एकत्रित कुटुंबातील विश्‍वनाथ गोविंदराव होळगे यांनी पुढाकार घेतला. सात वर्षांपूर्वी नैसर्गिक शेती पद्धतीचा अवलंब सुरू केला. आज ते बहुविध पिके घेतानाच विक्रीसाठीही अनोख्या मार्गांचा वापर करत आहेत. खर्चात बचत, विषमुक्त उत्पादनातून वार्षिक दोन लाखापर्यंत निव्वळ नफा मिळवत आहेत. २०१४ पासून शेतीची धुरा स्वत:वर घेतली सातवीपासून शेतीकडे ओढा असलेल्या विश्‍वनाथ यांनी बारावीनंतर शेतीमध्ये पूर्णवेळ लक्ष घातले. त्यांचे बंधू वीरभद्र आणि अच्युत नोकरी करतात. सर्वांत लहान भाऊ संदीप सध्या स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहे. सुरुवातीला तेही वडिलांप्रमाणे पारंपरिक पद्धतीने शेती करत. त्यांना १४ एकरसाठी सत्तर ते ऐंशी हजार रुपयांची रासायनिक खते तर वीस ते पंचवीस हजार रुपयांची कीडनाशके लागत. हा साधारण एक लाखापर्यंतचा खर्च कमी करण्याचा मंत्र त्यांना ग्राम विकास संस्थेच्या माध्यमातून आयोजित सेंद्रिय शेतीविषयक कार्यक्रमात उदय संगारेड्डीकर यांच्याकडून मिळाला. २०१४ मध्ये जालना येथे सुभाष पाळेकर यांचे नैसर्गिक शेतीविषयक सात दिवसांच्या प्रशिक्षण शिबिराला हजेरी लावली. त्यात विविध सेंद्रिय निविष्ठा बनविण्याची माहिती मिळाली. त्यांच्यांकडे पूर्वीपासून असलेल्या चार गाई, दोन कालवडी, दोन बैल यांच्या शेण, गोमूत्र यापासून निविष्ठा तयार केल्या. स्वतः बनवत असल्यामुळे या निविष्ठा स्वस्तामध्ये तयार होतात. उदा. २०० लिटर जिवामृत तयार करण्याचा खर्च केवळ २०० रुपये येतो. पुढे याच २० लिटर जिवामृत शेणखतात मिसळून घन जिवामृत तयार केले जाते. आपल्या १४ एकर शेतीसाठी साधारण २० टन घन जिवामृत तयार करतात. एक टन घन जिवामृत बसवण्यासाठी पाचशे रुपये खर्च येतो. प्रत्येक हंगामामध्ये पेरणीपूर्वी एकरी पाचशे किलो घन जिवामृत वापरले जाते. भाजीपाल्यासारख्या बागायती पिकांना वेगवेगळ्या टप्प्यात घन जिवामृत दिले जाते. पिकांसाठी आवश्यक सेंद्रिय खते घरी बनवली जातात. यामुळे विश्‍वनाथ घोडके यांनी रासायनिक खतावर होणाऱ्या खर्चात वार्षिक रुपये ८० हजार ते एक लाखांपर्यंतची बचत होते. सोबतच शेतजमिनीतील जिवाणूंची संख्या वाढते. गांडुळाचे प्रमाण वाढते. जमिनीतील सेंद्रिय कर्बाचे प्रमाण वाढल्याने जमिनीचा पोत सुधारला असल्याचे ते सांगतात. पीक संरक्षणातही बचत

 • पिकांच्या चांगल्या वाढीसाठी जिवामृताची फवारणी केली जाते.
 • एकात्मिक कीड व्यवस्थापन पद्धतीचा अवलंब केला जातो.
 • रसशोषक किडीच्या नियंत्रणासाठी गोमूत्र, हिरवी मिरची, लसूण, कडुनिंब पाला यांचा अर्क तयार करतात. सहा महिन्यांसाठी लागणारा अर्क एकदाच बनवतात. त्यासाठी मजुरीसह सर्व खर्च ४५० रुपये इतकाच येतो.
 • कडुनिंबाचा पाला पाण्यात ४८ तास कुजवून त्यापासून निमास्त्र बनवतात. वेगवेगळ्या किडीसाठी प्रतिबंधात्मक म्हणून फवारणीद्वारे त्याचा वापर केला जातो.
 • रोगांच्या नियंत्रणासाठी ताकाची फवारणी केली जाते.
 • बहुपीक पद्धतीत भाजीपाला, फळपिके

 • विश्‍वनाथ घोडके यांच्याकडे १४ एकरांमध्ये विविध पीक, भाजीपाला, फळपिकांची लागवड केली जाते. यामध्ये दोन एकरांत सोयाबीन अधिक तूर, हळद अधिक तूर तसेच मिरची घेतली जाते.
 • दोन एकरमध्ये पेरू लागवड असून, त्यात पपई, सीताफळ व शेवगा झाडे लावली आहेत. या झाडांच्या आतील पट्टीमध्ये पालक, शेपू, कोथिंबीर, कांदा, कोबी इ. भाजीपाला पिके लावली जातात. दोन एकरमध्ये कांदा असतो. यासोबतच मूग, उडीद प्रत्येक एक एकर पेरले जाते.
 • एक एकर क्षेत्रामध्ये देशी लाल भाताची लागवड करतात. एकरातून सहा क्विंटल तांदळाचे उत्पादन होते. उत्पादन हाती येण्यापूर्वीच ग्राहकाकडून तांदळाची मागणी नोंदवून घेतात. प्रतिक्विंटल दहा हजार रुपये या प्रमाणे दर मिळतो. उत्पन्न एकरी ६० हजार रुपये मिळते.
 • यासोबतच २० गुंठ्यांमध्ये टोमॅटो, वीस गुंठ्यात वांगी, २० गुंठे लसूण असतात. रब्बीमध्ये २० गुंठे बन्सी गहू, २० गुंठे हरभरा दोन एकर गाजर लागवड करतात. संपूर्ण शेतीमध्ये घरचेच बियाणे वापरले जाते.
 • निव्वळ नफा वाढला खरिपात पेरणीसाठी वीस हजार रुपये लागतात, तर रब्बीत पस्तीस हजार रुपये असा एकूण ५५ हजार रुपये पेरणीसाठी खर्च होतो. पूर्वी रासायनिक खते, कीटकनाशके यासाठी होणारा खर्च आता वाचत आहे. पेरणीचा ५५ हजारांचा खर्च वजा जाता बहुविध पीक पद्धतीतून चार लाख रुपयांचे उत्पन्न हाती येते. उदरनिर्वाहासाठी आवश्यक बाबी, कुटुंबातील मुलांची व धाकट्या बंधूच्या शिक्षणाचा खर्च, आजारपणे इ. साठी सुमारे दोन लाख रुपये खर्च येतो. पूर्वी निविष्ठा खरेदीसाठी जाणारी रक्कम आता फायदा म्हणून घरात येत असल्याचे त्यांनी सांगितले. शेती सुधारणेसाठी काही ठरावीक रक्कम बाजूला काढली जाते. विक्रीसाठी प्रयत्न होळगे यांच्याप्रमाणेच शेतकरी करणाऱ्या नैसर्गिक उत्पादनांच्या विक्रीसाठी नांदेड येथील चिखलवाडी भागात उदय संगारेड्डीकर यांनी जागा उपलब्ध केली आहे. तिथे आठवड्यातून बुधवार व रविवारी या दोन दिवशी या ठिकाणी सकाळी बाजार भरतो. तिथे दोन दिवस विषमुक्त फळे, धान्य व भाजीपाला विक्रीसाठी नेतो. आता येथील ४०० ग्राहकांचे मोबाईल गट बनवले आहे. त्यावर बाजारात उपलब्ध होणाऱ्या भाजीपाला, फळे व धान्य यांची माहिती दिली जाते. बहुतांश भाज्यांचे दर ठरलेले आहे. उदा. टोमॅटो, वांगे, भेंडी, काकडी, कांदे, गाजर - प्रति किलो ४० रुपये. कारले, दोडके, गवार, चवळी इ. भाज्या व पपई, पेरू ही फळे प्रति किलो ६० रुपये. लसूण दोनशे रुपये. ग्राहकांना नैसर्गिक शेती पाहता यावी आणि आपण खरोखरच विषमुक्त उत्पादने घेतोय, याची खात्री होण्यासाठी वर्षातून एकदा ग्राहकांची शिवार फेरी आयोजित केली जाते. यात शेतीची माहिती, कशाप्रकारे उत्पादन घेतले जाते हे दाखवण्यासोबतच वनभोजनही दिले जात असल्याचे होळगे यांनी सांगितले. विश्‍वनाथ होळगे, ९७६४०२५२०९

  Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

  ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

  Related Stories

  No stories found.