खत आणि किटकनाशक कंपन्यांनी सरकारसोबत काम करावे: केंद्रीय कृषीमंत्री

शेतकऱ्यांनी पीक बदल करण्यावर भर द्यावा, असे आवाहन तोमर यांनी यावेळी केले. किफायतशीर पिके घेतली तरच शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होते.
Narendra Singh Tomar
Narendra Singh TomarAgrowon

कृषी क्षेत्रात रासायनिक खतांचा (Fertilizer) आणि किटकनाशकांचा (Pesticide) वाढता वापर कमी व्हावा यासाठी खासगी कंपन्यांनी सरकारबरोबर काम करावे, असे मत केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्र सिंह तोमर (Narendra Singh Tomar) यांनी व्यक्त केले. भारतीय वाणिज्य आणि उद्योग महासंघाने (फिक्की) आयोजित केलेल्या कृषी रसायन परिषदेला ते संबोधित करत होते.

शेतकरी आता मोठ्या प्रमाणावर सेंद्रिय आणि नैसर्गिक शेतीत रस घेत आहेत. त्यामुळे रासायनिक खते व किटकनाशकांना पर्यायी उत्पादने विकसित करण्याकडे खासगी क्षेत्राने लक्ष दिले पाहिजे, असे तोमर म्हणाले. कीटकनाशकांवरील जीएसटी कमी करण्याच्या उद्योजकांच्या मागणीवर तोमर म्हणाले की, हा विषय जीएसटी परिषदेच्या विचाराधीन आहे. आपण अर्थमंत्र्यांची भेट घेऊन त्यांना या विषयाची माहिती देऊ, त्यावर अंतिम निर्णय जीएसटी परिषद घेईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

शेतकऱ्यांनी पीक विविधतेवर भर द्यावा

शेतकऱ्यांनी पीक बदल करण्यावर भर द्यावा, असे आवाहन तोमर यांनी यावेळी केले. किफायतशीर पिके घेतली तरच शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होते. उद्योग क्षेत्राने पीक विविधतेसाठी शेतकऱ्यांबरोबर काम करावे.

"शेतकऱ्यांसाठी पिकातून मिळणारा मोबदला खूप महत्त्वाचा असतो. पिकांचं उत्पादन वाढवणं आवश्यकच आहे, पण त्याच बरोबर शेतकऱ्यांना मिळणारा परतावा देखील खूप महत्त्वाचा आहे. पिकांची काढणी झाल्यानंतर शेतीमालाचं होणारं नुकसान कमीत कमी व्हावं, यासाठी पावलं उचलावी लागतील," असे तोमर म्हणाले. शेतकऱ्यांनी किफायतशीर पिकांकडे वळण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा, असे आवाहन तोमर यांनी यावेळी केले.

देश अन्नधान्य उत्पादनात स्वयंपूर्ण झालेला आहे, त्यामुळे आता कडधान्य आणि तेलबिया पिकांचं उत्पादन वाढवण्यासाठी मिशन मोडवर काम सुरू आहे, असे कृषिमंत्री म्हणाले. पिकांचे उत्पादन वाढवण्यासाठी नवीन वाण विकसित करण्यावर संशोधन व्हायला हवे. तर उद्योगक्षेत्राने खते व कीडनाशकांचा संतुलित वापर व्हावा, यासाठी काम केले पाहिजे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com