देशभरात सोयाबीन ५५०० ते ७३००च्या दरम्यान

सध्या बाजारात येणाऱ्या सोयाबीनपैकी ज्या मालात आर्द्रता अधिक आहे आणि गुणवत्ता कमी आहे, त्याच सोयाबीनचे दर किमान पातळीवर आहेत. गुणवत्तेचे सोयाबीन देशभरातील बाजार समित्यांमध्ये ५५०० ते ७३०० रुपयांदरम्यान विकले जात आहे.
देशभरात सोयाबीन ५५०० ते ७३००च्या दरम्यान
Between 5500 and 7300 soybeans across the country

पुणे : सध्या बाजारात येणाऱ्या सोयाबीनपैकी ज्या मालात आर्द्रता अधिक आहे आणि गुणवत्ता कमी आहे, त्याच सोयाबीनचे दर किमान पातळीवर आहेत. गुणवत्तेचे सोयाबीन देशभरातील बाजार समित्यांमध्ये ५५०० ते ७३०० रुपयांदरम्यान विकले जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी काढणी केल्यानंतर सोयाबीनच्या आर्द्रता आणि ग्रेडिंगवर, गुणवत्तेवर लक्ष द्यावे. तसेच बाजाराचा अभ्यास करूनच विक्री करावी. गुणवत्तेच्या सोयाबीनसाठी ५ हजारांचे टार्गेट ठेवता येईल, असे आवाहन जाणकारांनी केले आहे.

मागील हंगामात शेतकऱ्यांची सोयाबीन बाजारात येऊन गेल्यानंतर दराने उसळी घेतली. फेब्रुवारीपासून दरात सातत्याने वाढ होत गेली आणि जुलै महिन्यात विक्रमी १० हजारांचा टप्पा गाठला. मात्र जनुकीय सुधारित सोयापेंड आयातीला परवानगी आणि खाद्यतेल आयातशुल्कात कपात केली. त्यामुळे बाजारात पॅनिक निर्माण केले गेले आणि व्यापाऱ्यांच्या हाती आयते कोलीत मिळाले. परंतु यामुळे दर कमी झाल्याचा होत असलेला दावा जाणकारांनी फेटाळला आहे. 

देशी वाण (आंतरराष्ट्रीय बाजारात ऑरगॅनिक म्हटले जाते) असल्याने भारतीय सोयाबीनपेंडला मोठी मागणी असते. त्यामुळे अमेरिकेच्या सोयाबीनपेक्षा भारतीय सोयाबीनला जास्त दर असतो. मागील हंगामात उत्पादनात घट झाल्याने मोठी टंचाई निर्माण झाली. त्यामुळे यंदा सोयाबीनचा शिल्लक साठा नगण्य आहे. त्यातच नव्या सोयाबीनची आवक सुरू झाली. 

इंदूर येथे दर पाडल्याने शेतकरी आणि व्यापारी यांच्यात खडाजंगी होऊन बाजार बंद पाडला होता. मात्र येथे एक गोष्ट लक्षात घेण्याजोगी आहे, की सधा सुरू असलेल्या पावसाने किंवा मागे झालेल्या पावसाने दर्जा कमी असलेल्या, तसेच आर्द्रता २५ टक्क्यांपेक्षा अधिक असलेल्या सोयाबीनला हा दर मिळाल्याचे जाणकारांनी सांगितले. गुणवत्तेच्या सोयाबीनला ५५०० ते ७३०० रुपयांपर्यंत दर मिळत असल्याचे जाणकारांनी सांगितले. त्यामुळे शेतकऱ्यांनी लगेच सोयाबीन विक्री करण्यापेक्षा वाळवून, आर्द्रता कमी झाल्यानंतर विक्री करावी, असे आवाहन जाणकारांनी केले आहे.

जास्त दराने प्रक्रिया उद्योगाकडून सोयाबीनला जास्त मागणी नाही. तसेच आंतरराष्ट्रीय बाजारातही काही प्रमाणात दर नरमले आहेत. तसेच सरकारच्या निर्णयामुळे काही प्रमाणात पॅनिक निर्माण झाले. मात्र देशातील सोयाबीन नुकसानही जास्त असण्याची शक्यता आहे. त्यामुळे सोयाबीन दर चांगले राहतील. ऑक्टोबर वायद्यात घट झाली असली, तरी ५६०० च्या खाली राहणार नाहीत. त्यामुळे हजर बाजारातही चांगल्या गुणवत्तेचे सोयाबीन याच्या जवळपास राहण्याची शक्यता आहे. - अजय केडिया, शेतीमाल बाजार विश्‍लेषक आणि सल्लागार

दरवर्षीच आवक वाढ झाल्यानंतर दर कमी होताना दिसतात. सध्याचा जो किमान दर आहे तो कमी गुणवत्तेच्या आणि आर्द्रता अधिक असलेल्या सोयाबीनला मिळत आहे. चांगले सोयाबीन सध्याही ५००० हजारांपेक्षा अधिक दराने विकले जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी सोयाबीनच्या आर्द्रता, ग्रेडिंगवर लक्ष द्यावे. तसेच दराचे टार्गेट ठेवूनच बाजाराची माहिती घेऊन विक्री करावी. - दिनेश सोमाणी, शेतीमाल बाजार विश्‍लेषक, मुंबई

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.