ब्राझीलला दणका; भारतीय साखर उद्योगास येणार ‘अच्छे दिन’

प्रत्येक छोट्या-मोठ्या घटनांमुळे सामाजिक आणि आर्थिक क्षेत्र प्रभावित होतात. अशातच ब्राझीलमधील दुष्काळ आणि अचानक पडलेल्या धुक्यामुळे संपूर्ण भारतातील साखर उद्योगांमध्ये चैतन्य निर्माण झाले आहे.
ब्राझिलला दणका; भारतीय साखर उद्योगास येणार ‘अच्छे दिन’
ब्राझिलला दणका; भारतीय साखर उद्योगास येणार ‘अच्छे दिन’

जगात घडणाऱ्या प्रत्येक छोट्या-मोठ्या घटनांमुळे सामाजिक आणि आर्थिक क्षेत्र प्रभावित होताना आपण पाहतो. अशातच ब्राझीलमधील दुष्काळ आणि अचानक पडलेल्या धुक्यामुळे संपूर्ण भारतातील साखर उद्योगांमध्ये चैतन्य निर्माण झाले आहे. काय आहेत या घटना, याचा आपल्या देशातील उद्योगावर काय व कसा परिणाम होतो? हा परिणाम किती काळ टिकेल? याचा ऊहापोह होणे गरजेचे वाटते... ब्राझील साखर उद्योग एक दृष्टिक्षेप... ब्राझील हा जगातील सर्वाधिक साखरनिर्मिती करणारा देश म्हणून ओळखला जातो. ३५० साखर कारखाने जगातील साखर उत्पादनावर तसेच इथेनॉलनिर्मितीवर देशाला प्रचंड असे परकीय चलन मिळवून देण्यात आघाडीवर आहेत. मागील वर्षी म्हणजेच हंगाम २०२०-२१ मध्ये ९० वर्षांतील सर्वांत भीषण अशी दुष्काळी परिस्थिती आणि त्यानंतर मागील दोन महिने प्रचंड धुक्यामुळे येथील अगोदरच कमी असणाऱ्या उसाचे प्रचंड नुकसान झालेले आहे. या दोन्ही कारणांमुळे हेक्‍टरी ९० मेट्रिक टन एवढे उत्पादन मिळणाऱ्या ठिकाणी सध्या हेक्टरी ७३ मेट्रिक टन एवढेच उत्पादन निघत असल्याने एकूण साखर उत्पादनावर त्याचा १८ ते २० टक्के एवढा परिणाम होताना दिसून येत आहे. मागील वर्षी ३८४ लाख मेट्रिक टन एवढे साखरेचे उत्पादन झालेल्या या देशात या वर्षी मात्र ३५० लाख मेट्रिक टन एवढेच साखर उत्पादन होणार आहे. या सर्व घडामोडींमुळे जागतिक बाजारपेठेत जगाला लागणाऱ्या साखरेचा १०० लाख मेट्रिक टन एवढा तुटवडा निर्माण झाला आहे. अर्थातच ब्राझीलनंतर जगभर साखरपुरवठा करेल असा देश म्हणजेच आपला भारत देश. आता जगातील सर्व साखर व्यापारी भारतीय साखरेची मागणी करत आहेत. या सर्व गोष्टींमुळे जागतिक बाजारात कच्ची साखर ४३२ डॉलर्स प्रति मेट्रिक टन यापुढेही पोहोचली आहे. म्हणजेच ३१५० ते ३२०० रुपये प्रति क्विंटल एवढा दर कच्चा साखरेला सध्या मिळत आहे. आपल्याकडे उपलब्ध असणारा प्रचंड साखर साठा कमी करण्याची हीच ती नामी संधी आहे.

भारत हंगाम २०२१- २२ एक दृष्टिक्षेप या हंगामात देखील मागील वर्षी एवढे म्हणजेच ३१० लाख मेट्रिक टन साखरेचे उत्पादन भारत देशात होण्याचा अंदाज आहे. इथेनॉल निर्मितीकरिता ३४ लाख मेट्रिक टन एवढी साखर वळविण्यात आली होती. मागील वर्षीचा ८७ लाख मेट्रिक टन शिल्लक साठा व यंदा होणारे ३१० लाख मेट्रिक टन उत्पादन लक्षात घेतल्यास आपल्याला वर्षाला लागणारी २५० लाख मेट्रिक टन साखर सुरक्षित ठेवूनही जागतिक बाजारपेठेची १०० लाख मेट्रिक टनाची भूक एकटा भारत देश पूर्ण करू शकतो. अर्थातच त्याकरिता पांढऱ्या साखरेऐवजी काही प्रमाण कच्च्या साखरेकडे वळणे गरजेचे आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत साखरेचे दर वाढल्याने देशांतर्गत साखरेला देखील ते ३३ रुपये प्रति किलो इतका दर मिळत आहे. मागील चार वर्षांतला हा उच्चांकी दर आहे. येणाऱ्या डिसेंबर मध्ये संपणारा ब्राझीलचा हंगाम सप्टेंबर-ऑक्टोबर मध्ये संपुष्टात येण्याची चिन्हे असल्याने जानेवारी-फेब्रुवारी २०२२ पर्यंत तरी भारतीय साखर बाजारपेठ भाव खाऊन जाणार आहे.

इथेनॉलनिर्मितीवर परिणाम... भारत सरकारच्या इथेनॉल धोरणांतर्गत कारखाने इथेनॉलनिर्मिती करत असून, साखरेला मिळणाऱ्या चांगल्या भावामुळे कारखाने सिरप टू इथेनॉल, बिहेवि टू इथेनॉल या मार्गाचा अवलंब न करता सी मोलासेस मार्गाचा अवलंब करतील. त्यामुळे इथेनॉलनिर्मितीचे उद्दिष्ट नक्कीच अडचणीत येऊ शकते. त्याकरिता केंद्र सरकारने इथेनॉलचे दर वाढवणे गरजेचे आहे. सध्या प्रचलित असणारे तीन वेगवेगळे दर बंद करून सर्व मार्गांनी तयार केलेल्या इथेनॉलला सिरप टू इथेनॉलचा दर देणे गरजेचे आहे. कच्ची साखर बनवण्याचे फायदे....

  1. कच्ची साखर बनवल्यामुळे रिकवरी 0.5% टक्‍क्‍याने वाढते.
  2. बगॅस, पावर सेविंग ,क्रशिंग रेट यामध्ये बचत होते .
  3. केमिकल , चुना, गंधक पी पी बॅग या मार्गाने अंदाजे 50 रुपये वाचतात.
  4. बँकेला तयार झालेली साखर तारण न दिल्यामुळे प्रति क्विंटल दीडशे ते दोनशे रुपयांचा फायदा होतो.

महाराष्ट्र हंगाम २०२१- २२... मागील हंगामात १०१२ लाख मेट्रिक टन गाळप होऊन १०६ लाख मेट्रिक टन साखरनिर्मिती करणारा महाराष्ट्र येणाऱ्या वर्षी १२५० लाख मेट्रिक टन गाळप करून ११० लाख मेट्रिक टन साखरनिर्मिती करेल. उत्तर प्रदेश, बिहार, हरियाना या राज्यांना साखर निर्यातीकरिता कोणतेच जवळचे बंदर नसल्याने साखरनिर्यातीत महाराष्ट्र आघाडीवर राहणार आहे. त्याच बरोबर देशांतर्गत साखर साठा कमी झाल्याने पांढऱ्या साखरेला देखील ३५ रुपयांच्या आसपास दर मिळतील. ज्या कारखान्यांची आर्थिक परिस्थिती चांगली आहे, ज्यांना बँकेचे कारण कर्ज मिळते आहे. साखरेची प्रत चांगली आहे अशा कारखान्यांनी पांढऱ्या साखरेकडे देखील जाण्यास हरकत नाही. साखरेचा दर ‘अजून वाढेल,अजून वाढेल’ ही वाट न पाहता टप्प्याटप्प्याने साखर विक्री करून मागील पाच-सहा वर्षांपासून साखर उद्योगाला लागलेले ग्रहण दूर करण्याची ही नामी संधी कारखानदारांनी सोडता कामा नये. देशांतर्गत साखरेच्या भावाला ब्रेक लागेल असा कोणताही कायदा नियम किंवा निर्यात बंदी यापासून केंद्र सरकार दूर राहिल्यास तसेच इथेनॉलच्या दरात वाढ केल्यास आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत देखील साखरेचे दर अजूनही वाढायला संधी निर्माण होऊ शकते. हजार वेळा मागणी करूनही केंद्र सरकारने साखरेचा दर ३३ रुपये केला नव्हता तोच दर ब्राझीलचा दुष्काळ आणि धुक्याने मिळवून दिलाय एकूणच काय यंदा... अच्छे दिन... जय ब्राझील! (लेखक, ट्वेंटीवन शुगर्स लि. चे (लातूर)व्हाइस प्रेसिडेंट आहेत.) संपर्क : 9923002670

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com