ब्राझीलच्या साखरेचा आंतरराष्ट्रीय बाजाराला फटका

साखरेच्या आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत ब्राझीलच्या साखरेची आवक अंदाजापेक्षा एक महिना अगोदर सुरू झाली आहे. याचा फटका साखरेच्या दराला बसला आहे.
ब्राझीलच्या साखरेचा आंतरराष्ट्रीय बाजाराला फटका
ब्राझीलच्या साखरेचा आंतरराष्ट्रीय बाजाराला फटका

कोल्हापूर : साखरेच्या आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत ब्राझीलच्या साखरेची आवक अंदाजापेक्षा एक महिना अगोदर सुरू झाली आहे. याचा फटका साखरेच्या दराला बसला आहे. ब्राझीलची साखर बाजारात येण्यास सुरुवात झाल्याने दरात मोठी घसरण झाली आहे. सध्या आंतराष्ट्रीय बाजारपेठेत मिळणारे भाव गेल्या दोन महिन्यांच्या तुलनेत नीचांकी पातळीवर आले आहेत. ब्राझीलमध्ये फेब्रुवारी व मार्च महिन्यात पावसाळी हवामान होते. सातत्याने पडणाऱ्या पावसामुळे तेथील हंगाम किमान एक महिना लांबेल अशी शक्‍यता होती. यामुळे किमान एक महिना तरी बाजारपेठेत त्यांची साखर येणार नाही अशी अटकळ जगभरातील व्यापाऱ्यांची होती. ब्राझीलची साखर उशिरा आली असती, तरी बाजारभाव तेजीत राहिला असता. त्याचा फायदा भारतासारख्या देशालाही झाला असता. परंतु हा अंदाज मार्चच्या मध्यालाच चुकला. याच कालावधीत ब्राझीलमधील सुमारे तीस कारखाने सुरू झाले. तातडीने ती साखर जागतिक बाजारपेठेत दाखल झाली. याचा ‌‌‌‌‌‌‌प्रतिकूल परिणाम बाजारपेठेवर होऊन दर घसरले. यातच ब्राझीलचे चलन असणाऱ्या रियल मध्येही पडझड झाल्याने एकूणच साखरेचे दर खाली आले. ब्राझीलची साखर येत असल्याने साखर अतिरिक्त होण्याच्या शक्‍यतेने बाजारात अस्वस्थता निर्माण होऊन दर कमी झाले. मागणी, पुरवठा घटला फेब्रुवारी महिन्यात आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या साखरेचा दर १७.५ सेंट प्रति पौंड इतका होता. तो आज १४.९२ सेंट प्रति पौंड इतका झाला आहे. रिफाइन पांढऱ्या साखरेचा दर टनास ४७३ डॉलरवरून ४३१ डॉलरपर्यंत खाली आला आहे. साखरेचा पुरवठा व मागणीचे प्रमाण कमी अधिक झाल्याने दर कमी झाले आहेत. ही परिस्थिती आणखी किती दिवस राहील याबाबत साशंकता असल्याचे व्यापारी सूत्रांनी सांगितले. भारतीय साखरेला फटका शक्‍य जागतिक बाजारपेठेत दराच्या घडामोडीचा भारतीय साखरेला थेट फटका बसण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे. साखरेचे करार चांगले होत असले, तरी भविष्यात जर ब्राझीलच्या साखरेची आवक वाढली तर भारतीय साखरेला मागणी कमी येऊन दर आणखी कमी होण्याची शक्‍यता साखर उद्योगातील सूत्रांनी व्यक्त केली.  प्रतिक्रिया.. गेल्या दोन महिन्यांत भारतातून निर्यात होणाऱ्या साखरेच्या दरात घसरण होत आहे. या कालावधीत कच्च्या व रिफाइन दोन्ही साखरेच्या दरात क्विंटलमागे दीडशे रुपयापर्यंत घट झाली आहे. भारतीय चलनानुसार साखरेला २७०० ते २७५० रुपये प्रति क्विंटल इतका दर मिळत होता. आता तो २६०० रुपयांपर्यंत घसरला आहे. - अभिजित घोरपडे,  साखर निर्यातदार

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.