
पुणे ः सोयाबीनने प्लॅंट दरासह बाजार समित्यांमध्येही पाच हजारांचा टप्पा पार केला आहे. वाशीम बाजार समितीत ५२११, लातूर ५१०० तर मध्य प्रदेशातील निमच येथे ५०५०, बाडनगर ५३०० रुपये दर मिळाला. बाजारात मालाचा तुटवडा, सोयमिलची वाढलेली निर्यात यामुळे दर पुढील दीड ते दोन महिन्यांत ५४०० रुपयांवर पोचतील, असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केला आहे.
जागतिक पातळीवर यंदा सोयाबीनचा तुटवडा असल्याने दर तेजीत आहेत. ‘सीबॉट’वर दर वाढून १४०० डॉलर प्रतिबुशेल्सवर पुन्हा पोचले आहेत. तसेच ‘एनसीडीईएक्स’वर मार्चचे सौदे ५००० रुपयांनी झाले. मात्र सध्या देशात प्लॅंटचे दर हे ५२५० रुपयांवर पोचले आहेत. त्यामुळे सोयाबीन दरातील तेजी कायम असून पुढील काळात आणखी भाव खाईल अशी शक्यता आहे.
‘‘सोयाबीनची बाजारात आवक झाल्यानंतर थोडाच माल शिल्लक आहे. पुढील हंगामातील सोयाबीन येण्याला ६ महिन्यांचा कालावधी आहे. या काळात चांगल्या मालाचा मोठा तुटवडा जाणवेल. त्यामुळे दरात वाढ होईल. पुढील दीड ते दोन महिन्यांत सोयाबीनचे दर सध्याच्या पातळीवरून २०० ते २५० रुपयांनी वाढून ५२५० ते ५४०० रुपयांचा टप्पा गाठतील,’’ असा अंदाज शेतमाल बाजार विश्लेषक दिनेश सोमाणी यांनी व्यक्त केला.
दरवाढीला पूरक घटक
विक्रमी सोयामील निर्यात शक्य सोयामीलची यंदा विक्रमी निर्यात होण्याचा अंदाज आहे. जागतिक पातळीवर भारतीय सोयामीलला मोठी मागणी असते. यंदा तब्बल १८ लाख टन सोयामील निर्यात होण्याची शक्यता निर्यातदार सूत्रांनी व्यक्त केली आहे. गेल्यावर्षी ८.५ लाख टन सोयामीलची निर्यात झाली होती. यंदा सोयामील निर्यात वाढीच्या परिणामी सोयाबीन दराला आधार मिळत आहे. त्यामुळे येणाऱ्या काळातही सोयाबीन दर आणखी तेजीत राहतील, असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केला आहे. प्लॅंट रेटही वाढले देशभरातील बाजार समित्यांमध्येही सोयाबीन ४२०० ते ५२२१ रुपयाने विकले जात आहे. तर प्लॅंटचे दर हे ५१०० ते ५२५० रुपये आहेत. ‘एनसीडीईएक्स’वर सोयाबीनचे मार्चचे सौदे ५००० रुपयाने होत असताना प्लॅंटचे दर हे १०० ते २५० रुपयांनी अधीक आहेत. म्हणजेच बाजारात सोयाबीनचा तुटवडा असून दर आणखी वाढण्याचे संकेत आहेत. प्रतिक्रिया आत्तापर्यंत बाजारात ६५ लाख टन माल खरेदी होऊन थोडाच शिल्लक आहे. तसेच सोयामीलची विक्रमी १८ लाख टन निर्यात होण्याचा अंदाज आहे. त्यामुळे सोयाबीनचे दर तेजीत असून पुढील दीड ते दोन महिन्यांत सध्याच्या दरात आणखी २०० ते २५० रुपयांनी वाढतील. पुढील हंगामात अद्याप सहा महिन्यांचा कालावधी असल्याने येणाऱ्या काळात सोयाबीन आणखी भाव खाणार हे निश्चित आहे. - दिनेश सोमाणी, शेतमाल बाजार विश्लेषक
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.