कापूस लागवडीत यंदा घट शक्य

पाऊस जर वेळेवर झाला तर कापसाच्या लागवडीत घट अपेक्षित आहे आणि पाऊस पडण्यास उशीर झाला तर मात्र लागवड गेल्या वर्षी होती तितकीच होण्याची शक्यता जाणकारांनी व्यक्त केली.
कापूस लागवडीत यंदा घट शक्य
कापूस लागवडीत यंदा घट शक्य

पुणे ः पुढील दोन ते तीन महिन्यांत खरीप लागवड सुरू होईल. यंदा पावसाच्या परिस्थितीचा अंदाज घेऊनच शेतकरी कपाशीची लागवड करतील, असा अंदाज आहे. पाऊस जर वेळेवर झाला तर कापसाच्या लागवडीत घट अपेक्षित आहे आणि पाऊस पडण्यास उशीर झाला तर मात्र लागवड गेल्या वर्षी होती तितकीच होण्याची शक्यता जाणकारांनी व्यक्त केली.  गेल्या वर्षी सप्टेंबर आणि ऑक्टोबरमध्ये अतिवृष्टी झाली होती. त्याचबरोबर गुलाबी बोंड अळी आणि बोंडसड झाल्याने कापूस उत्पादक शेतकऱ्यांना मोठे नुकसान सहन करावे लागले होते. त्यामुळे यंदा कपाशीच्या लागवडीत घट अपेक्षित आहे. नुकतेच भारतीय कापूस संघटनेने कापसाच्या उत्पादनाचा अंदाज कमी केला आहे. मागील वर्षी पिकाचे नुकसान झालेच, पण शेतकऱ्यांसाठी उत्पादन खर्चही वाढला होता. यंदा केंद्र सराकरने कापसाच्या बियाण्याचे दर वाढविण्यासाठी परवानगी दिली आहे. गेल्या आठवड्यात, बीजी-१ आणि बीजी-२ कपाशी बियाणे दरात पाच टक्के वाढीचा निर्णय घेतला होता.   भारताप्रमाणे इतर कापूस उत्पादक देशांमधील शेतकरी कापसाकडे पाठ फिरवतील अशी शक्यता आहे. अमेरिकेच्या कृषी विभागाच्या माहितीनुसार तेथे कापसाची लागवड १२० लाख हेक्टरवर अपेक्षित आहे. म्हणजे अमेरिकेतील कापसाच्या लागवड क्षेत्र यंदाही गेल्या वर्षी इतकेच राहण्याची शक्यता आहे. अमेरिकेत सोयाबीन आणि मका पिकावरील परतावे कापसाच्या तुलनेत जास्त असल्याने कापसाची लागवड कमी होण्याची शक्यता आहे. दोन दिवसांपूर्वी पाकिस्तानने भारतातून कापूस आणि साखरेची आयात करण्यास परवानगी दिली होता. पाकिस्तानातील शेतकऱ्यांनी यंदा कापसाची लागवड कमी केली होती. त्यामुळे कापसाचे लागवड क्षेत्र १० टक्क्यांनी घटले होते. त्याचबरोबर अतिवृष्टी आणि रोगांच्या प्रादुर्भावामुळे तेथील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. मात्र मंजुरी दिल्यानंतर दुसऱ्याच दिवशी त्या निर्णयावर माघार घेतली. त्यामुळे भारत-पाकिस्तानच्या व्यापार संबंधांवर राजकारणाचा मोठा पगडा आहे, हे स्पष्ट होते.  दरावर अनिश्‍चिततेचे सावट गेल्या वर्षी कोरोनामुळे कापड उद्योग ठप्प होता. मात्र जगभरात जसजशी टाळेबंदी उठवण्यात आली तसतशी कपाशीच्या दरांमध्ये नीचांकी पातळीवरून सुधारणा होत गेली. जुलै २०२० पासून कापूस उद्योग पूर्ववत होत गेल्याने वर्षअखेरीपर्यंत कपाशीचे दरही पूर्ववत झाले. असे असले, तरी जागतिक पातळीवर कापसाच्या भावात अनिश्‍चिततेचे सावट कायम राहिले. फेब्रुवारी २०२१ मध्ये अमेरिकेतील ‘आयईएस’वरील कापसाच्या वायद्यांनी बढत घेतली. मात्र मार्चच्या दोन आठवड्यांमध्ये ती बढत कमी झाली आहे. त्याचा परिणाम भारतीय कापसाच्या किमतीवर झाला असला तरी अस्थिरतेचे प्रमाण कमी होते. त्यामुळे कापसाचे देशांतर्गत दर ४५,००० ते ४७,००० रुपये प्रति खंडी राहिले आहेत. भारतीय कापूस महामंडळाने कापसाची विक्री केल्याने दर स्थिर राहण्यास मदत झाली. महामंडळाच्या विक्रीमुळे भारतातील दर निर्यातीच्या दृष्टिकोनातून स्पर्धात्मक राहिल्या. असे असले तरी देशात कोरोनाची दुसरी लाट येताना दिसत आहे. महाराष्ट्र, गुजरातसारख्या राज्यात रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याने पुन्हा टाळेबंदी लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे अनिश्‍चिततेचे सावट कापड उद्योगावरून पूर्णपणे गेलेले नाही असे दिसत आहे. प्रारंभी उत्पादनवाढीचे अंदाज सरकार आणि व्यापारी कंपन्यांनी यंदा देशात विक्रमी कापूस उत्पादन होईल असे अंदाज प्रारंभी वर्तविले होते. मात्र देशातील अनेक कापूस उत्पादक राज्यांमध्ये गुलाबी बोंड अळी, बोंडसड आणि पावसाने पिकाला मोठा फटका बसला. याची माहिती असतानाही शेतकऱ्यांकडून कमी दरात खरेदी झाली. नंतर दुसऱ्या अंदाजात सरकारने कापूस उत्पादन ३६५ लाख गाठी होईल, असे म्हटले. मात्र  बाजारातील जाणकार यापेक्षाही उत्पादन कमी होईल, असे सांगत आहेत. दरवाढीचा फायदा शेतकऱ्यांना कमीच सध्या कापसाचे दर अनेक ठिकाणी सहा हजारांच्या पुढे गेले आहेत. मात्र शेतकऱ्यांचा कापूस बाजारात येत होता तेव्हा सुरुवातीच्या काळात दर हे ४५०० ते ५२०० रुपयांच्या दरम्यान होते. शेतकऱ्यांनी उत्पादन वाढल्याचे गृहीत धरून शेतकऱ्यांनी विक्री केली. तसेच व्यापारी आणि मिल्सनी कमी दराने शेतकऱ्यांचा कापूस खरेदी केला. त्यानंतर उत्पादनात घटीच्या अंदाजाने दरात वाढ झाली. दराने काही ठिकाणी सात हजारांचाही टप्पा ओलांडला. मात्र तोपर्यंत शेतकऱ्यांनी बहुतेक कापूस विकला होता. कापूस साठवण्याची अडचण येत असल्याने साधारणपणे शेतकरी जास्त काळ कापूस ठेवत नाही. याचा लाभ व्यापाऱ्यांनी घेतला. वाढत्या दराचा लाभ खूपच कमी शेतकऱ्यांना मिळाला. अनेक शेतकऱ्यांनी कमी दरानेच कापसाची विक्री केली. शेतकऱ्यांना मात्र जास्त उत्पादन खर्च करूनही हाती काही लागले नाही. त्यामुळे यंदा शेतकरी कापसाची लागवड कमी करतील, असा अंदाज जाणकार व्यक्त करत आहेत.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.