शेतकरी उत्पादक कंपन्या ‘डिजिटल’ होणार; लागवड ते विक्रीपर्यंत ऑनलाइन कामकाज

शेतकरी उत्पादक कंपन्या ‘डिजिटल’ होणार; लागवड ते विक्रीपर्यंत ऑनलाइन कामकाज
शेतकरी उत्पादक कंपन्या ‘डिजिटल’ होणार; लागवड ते विक्रीपर्यंत ऑनलाइन कामकाज

पुणे : राज्यातील शेतकरी उत्पादक कंपन्यांना डिजिटल व्यवहाराचे धडे देण्यासाठी महाएफपीसी व फार्मईपीआर, गोदा फार्म अशा कंपन्या पुढे सरसावल्या आहेत. शेतमाल उत्पादनव्यवस्थेत लागवड ते विक्रीपर्यंतचे कामकाज ऑनलाइन करण्यासाठी या कंपन्या एकमेकांना मदत करणार आहेत. फार्मईपीआरची स्थापना करणाऱ्या शिवराय टेक्नॉलॉजिज कंपनीने आपल्या २४ व्या वर्धापन दिनानिमित्ताने पुण्यात महाएफपीसी व गोदा फार्मशी करार केला. फार्मईपीआरचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय बोरकर, सीओओ संतोष शिंदे, महाएफपीसीचे अध्यक्ष योगेश थोरात या संकल्पनेवर काम करीत आहेत. करार व वर्धापन दिन सोहळ्यात बोरकर व शिंदे यांच्यासह महाएफपीसीचे मुख्य खरेदी अधिकारी योगेश जायले, गोदाफार्मचे व्यवस्थापक प्रवीण शेळके, फोनिक्स उद्योगसमूहाचे प्रमुख समीर सचदेव उपस्थित होते. फोनिक्स कंपनीदेखील आता शेतमालाच्या डिजिटल व्यवस्थापनासाठी फार्मईपीआरशी करार करीत असल्याचे या वेळी सांगण्यात आले. शेतकऱ्यांच्या समृद्धीसाठी शेतकरी उत्पादक कंपन्या अतिशय प्रभावी भूमिका बजावू शकतात. या कंपन्यांचे मालक स्वतः शेतकरी असल्यामुळे कंपन्यांचे व्यवहार जलद व बळकट होण्यासाठी ‘डिजिटलट’ मोलाचे ठरतील. देशी व विदेशी बाजारपेठांमध्ये होत असलेल्या स्पर्धांमध्ये टिकून राहण्यासाठी शेतकरी उत्पादक कंपन्यांना तंत्रज्ञानाचा अवलंब केल्याशिवाय गत्यंतर नाही, असे डिजिटल तंत्रज्ञांनी या वेळी स्पष्ट केले. डिजिटल तंत्रज्ञानाची मदत घेण्यासाठी करार करण्यात आघाडी घेतलेल्या गोदाफार्मची स्थापना २०१६ मध्ये झाली आहे. शेतकऱ्यांना लागवडीपासून विक्रीपर्यंत; तसेच सेंद्रिय शेती, शाश्वत शेती, खत-बियाणे-कीटनाशकाचा योग्य वापर अशा विविध बाबींवर गोदाफार्मकडून मार्गदर्शन केले जाते. हिंगोली, नांदेड, वाशीम, अकोला, यवतमाळ व औरंगाबाद भागातील शेतकऱ्यांना या कंपनीच्या डिजिटल विस्ताराचा फायदा होणार आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. बोरकर या वेळी म्हणाले की, राज्यातील इतर शेतकरी उत्पादक कंपन्या, मोठे निर्यातदार, प्रयोगशील शेतकरी, निर्यात व्यवस्थेमधील संस्थांना यापुढे प्रत्येक टप्प्यात डिजिटल सुविधा कशा देता येतील, यावर भर दिला जाईल. कृषीव्यवस्थेला लागवड ते विक्रीव्यवस्थेत मदत करणारा सर्वात मोठा डिजिटल प्लॅटफॉर्म म्हणून काम करण्याचे ध्येय आता फार्मईपीआरने ठेवले आहे. डिजिटल तंत्रामुळे लाभ वाढतील... सोयाबीन, हरबरा, हळद, कांदा, डाळिंब या शेतीमालावर सध्या गोदा फार्मकडून बारकाईने कामे सुरू आहेत. गावपातळीवर शेतमालाची खरेदी, साठवण; तसेच विक्रीव्यवस्थेत अनेक अडचणी असतानाही या कंपनीने १२ हजार शेतकऱ्यांना सेवा दिली आहे. सध्या २५० टन शेतमाल हाताळण्याची क्षमता गोदाफार्मने तयार केली आहे. डिजिटल तंत्रामुळे कंपनी व शेतकऱ्यांचे लाभ वाढत जातील, अशी माहिती कंपनीच्या पदाधिकाऱ्यांनी दिली.  

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com