वाढत्या मागणीने हरभरा दरात सुधारणा

सध्या हरभऱ्याने हमीभाव गाठला असून, येणाऱ्या सणांमुळे आणखी दर वाढण्याची शक्यता जाणकारांनी व्यक्त केली आहे.
वाढत्या मागणीने हरभरा दरात सुधारणा
वाढत्या मागणीने हरभरा दरात सुधारणा

पुणे : साठेबाज, व्यापारी आणि मिलर्सवर असलेली साठामर्यादा, त्यांच्याकडील अल्पसाठा, ६६ टक्के आयात शुल्क असल्याने हरभरा आयात सध्या प्रभावित झाली आहे. दुसरीकडे बेसनासह हरभराडाळीची मागणी वाढत आहे. देशात सरकारी आकड्यांपेक्षा हरभरा उत्पादन कमी असल्याचे व्यापारी आणि उद्योगाला माहीत असल्याने सरकारच्या निर्बंधानंतरही दर वाढतच आहे. सध्या हरभऱ्याने हमीभाव गाठला असून, येणाऱ्या सणांमुळे आणखी दर वाढण्याची शक्यता जाणकारांनी व्यक्त केली आहे. देशात एप्रिल ते ऑगस्ट या कालावधीत हरभरा आवकेत १६ टक्क्यांची घट झाली आहे. गेल्या वर्षी या कालावधीत ४१.५९ लाख टन हरभऱ्याचा पुरवठा होता. यंदा मात्र ३५लाख टन पुरवठा झाला आहे. देशात रब्बी हंगामातील हरभरा बाजारात आल्यानंतरही दर व्यापाऱ्यांच्या अपेक्षेप्रमाणे जास्त प्रमाणात तुटले नव्हते. त्यानंतरच्या काळात देशात हरभरा पुरवठा कमी होत गेला. मध्य प्रदेशात मागील वर्षी एप्रिल ते ऑगस्ट या कालावधीत १८.४१ लाख टन पुरवठा होता. त्यात घट होऊन यंदा ११.१७ लाख टन झाला. त्याप्रमाणे राजस्थान, उत्तर प्रदेश, कर्नाटक, छत्तीसगड आणि पश्‍चिम बंगालमध्ये हरभरा पुरवठ्यात घट झाली तर महाराष्ट्र, गुजरात आणि तेलंगण या तीन राज्यांमध्ये हरभरा पुरवठा वाढला आहे.  आयात वाढण्याची शक्यता नाही भारतात हरभरा आयातीवर कृषी पायाभूत विकास सेससह एकूण ६६ टक्के शुल्क लागू आहे. भारतीय बंदरावर हरभरा १०० रुपये दराने पोहोचला तर बाहेर पडल्यानंतर त्याची किंमत १६६ रुपये होते. परिणामी हरभरा आयात प्रभावित होत असून त्याचा लाभ दरवाढीत होत आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर कमी देशांत नेहमी हरभरा उपलब्ध असतो. त्यात ऑस्ट्रेलिया आणि टांझानिया हे दोन देश प्रमुख आहेत. पाकिस्तान, बांगलादेश, संयुक्त अरब अमिरातीसह काही मुस्लिम राष्ट्रांमध्ये हरभरा आयात वाढली आहे. परिणाम, आंतरराष्ट्रीय बाजारातही हरभरा भाव खात आहे. जागतिक पातळीवर भारत, ऑस्ट्रेलिया, पाकिस्तान, इथोपिया, टांझानिया आणि म्यानमार आदी देश हरभरा उत्पादनात अग्रेसर आहेत. यापैकी इथोपिया, टांझानिया आणि म्यानमार या देशांमध्ये देशांतर्गत वापर सोडता निर्यातीसाठी जास्त माल उपलब्ध नसतो. भारत आणि पाकिस्तानमध्ये उत्पादन जास्त होते मात्र वापरही अधिक असल्याने आयात करावी लागते. अशा परिस्थितीत ऑस्ट्रेलियातून हरभऱ्याची मोठ्या प्रमाणात निर्यात होते. भारतातील हरभरा मार्च आणि एप्रिल महिन्यात बाजारात येतो. तर ऑस्ट्रेलियाचा हरभरा ऑक्टोबर आणि नोव्हेंबरच्या दरम्यान बाजारात येतो. त्यामुळे ऑस्ट्रेलियाला भारत आणि पाकिस्तानला निर्यातीची संधी मिळते. त्यामुळे यंदाच्या परिस्थितीची विचार करता ऑस्ट्रेलियाचा हरभरा भाव खाण्याची शक्यता आहे. दर पुन्हा वाढण्याची शक्यता रब्बी हंगामात देशांतर्गत हरभरा उत्पादन सरकारच्या अंदाजापेक्षा मोठ्या प्रमाणात कमी झाले. तसेच विदेशातूनही हरभरा आयात कमीच होत आहे. त्यामुळे सरकारने आयातीला परवानगी, वायदाबंदी आदी निर्बंध लादूनही हरभरा अनेक भागांत हमीभावाच्या वर पोहोचला आहे. सरकारने हरभऱ्याच्या वाद्यांवर बंदी घातली असली तरी व्यापारी आणि उद्योगाला याची कल्पना आहे, की देशात हरभऱ्याचासाठा कमी आहे आणि नवीन हरभरा मार्च महिन्याच्या आधी बाजारात येणार नाही. पुढे येणाऱ्या सणांमुळे हरभरा दर पुन्हा वाढण्याची शक्यता, जाणकारांनी व्यक्त केली आहे. राज्यनिहाय पुरवठा (लाख टनांत

राज्य २०२० २०२१
मध्य प्रदेश १८.४१ ११.७७
राजस्थान ५.६३ ५.६२
उत्तर प्रदेश ३.६६ २.९१
कर्नाटक २.१३ १.७२
छत्तीसगड २.०२ १.१३
पश्‍चिम बंगाल १६ हजार टन १३ हजार टन 
महाराष्ट्र ६.०० ७.४७
गुजरात २.९६ ३.९७ 
तेलंगण १८ हजार टन २४ हजार 

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com