तुरीचे दर स्थिरावले; नवीन तूर पुढील महिन्यापासून बाजारात

ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यापासून तुरीचे दर काहीसे घसरले होते, मात्र १ नोव्हेंबरपासून दर स्थिरावले आहेत. देशात सरासरी ५४०० ते ६१०० रुपये प्रतिक्विंटल दर मिळत आहे.
tur_1.jpg
tur_1.jpg

पुणे : देशातील नवीन तूर डिसेंबरपासून बाजार येणार आहे. त्यामुळे व्यापारी आणि स्टॉकिस्ट शिल्लक तुरीची विक्री करत आहेत. ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यापासून तुरीचे दर काहीसे घसरले होते, मात्र १ नोव्हेंबरपासून दर स्थिरावले आहेत. देशात सरासरी ५४०० ते ६१०० रुपये प्रतिक्विंटल दर मिळत आहे.

मागील आठवड्यात दिवाळी सणाच्या काळात तुरीचे दर स्थिरावले आहेत. कडधान्यावरील साठा मर्यादेची मुदत ३१ ऑक्टोबरला संपली, मात्र सरकारकडून पुढील कार्यवाहीबाबत हालचाली झाल्या नाहीत. त्यामुळे सरकारच्या धोरणांवर अविश्‍वास दाखवत व्यापारी, उद्योजक संथ व्यवहार करत आहेत. सणांच्या काळातही तुरीची मागणी सामान्य राहिली. परिणामी, दरात मोठी तेजी-मंदी पाहायला मिळाली नाही. महाराष्ट्र आणि कर्नाटकात मागील आठवड्यात तुरीचे दर ५५०० ते ६९०० रुपयांदरम्यान स्थिरावले होते. ऑक्टोबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात तुरीच्या दरात देशभरात बाजार समित्यांत क्विंटलमागे १०० ते २०० रुपयांपर्यंत घट पाहायला मिळाली होती. मात्र दिवाळीच्या काळात दर काहीशा वाढीनंतर स्थिरावले आहेत.

यंदा कर्नाटक आणि महाराष्ट्रात तूर उत्पादनात १५ ते २० टक्के घट येण्याचा अंदाज शेतकऱ्यांनी व्यक्त केला आहे. मराठवाडा, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात पावसामुळे पिकाला फटका बसल्याचे येथील शेतकऱ्यांनी सांगितले. मात्र काही भागांत या पावसाचा पिकाला फायदाच झाल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. तसेच कर्नाटकातील महत्त्वाच्या तूर उत्पादक जिल्ह्यांतही काही प्रमाणात पिकाला फटका बसला असे, शेतकऱ्यांनी सांगितले. देशात नविन तूर डिसेंबरपासून बाजारात येण्यास प्रारंभ होईल. सध्या गेल्या हंगामातील तूर आणि आयात तुरीचा व्यापार होत आहे. नविन माल पुढील महिन्यापासून येण्याची शक्यता असल्याने व्यापारी आणि स्टॉकिस्ट जुनी तूर विकत आहेत. आयात तुरीचे दर स्थिरावले देशांतर्गत बाजाराचा विचार करता १ नोव्हेंबर ते ८ नोव्हेंबरपर्यंत भारतीय तुरीचे दर स्थिर होते. त्यासोबतच सरकारने आयात केलेल्या तुरीचे दरही स्थिर होते. यंदा सरकारने कडधान्याचे दर पाडण्यासाठी मोठी आयात केली. त्यात तुरीचा समावेश मोठ्या प्रमाणात होता. देशात टांझानिया, सुदान, मालावी, म्यानमार, युगांडा आणि मोझांबिक या देशांतून तुरीची आयात झाली आहे. या देशांतून जवळपास अडीच लाख टन तूर आयात झाल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. ……… महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजार समित्यांतील तुरीचे दर (रुपये/प्रतिक्विंटल) जालना : ५३०० ते ५९०० वाशीम : ४८०० ते ५९८० उदगीर : ६००० ते ६१०० कर्नाटकातील महत्त्वाच्या बाजार समित्यांतील तुरीचे दर (रुपये/प्रतिक्विंटल) बीदर : ५३०० ते ५९२९ गुलबर्गा : ६१०० ते ६५०० दाहोद  : ५३५० ते ५५००

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com