तेलबिया उत्पादनात वाढ 

जागतिक तेलबिया उत्पादनात फेब्रुवारी महिन्याच्या तुलनेत ७ लाख टनांनी वाढ होण्याची शक्यता आहे. फेब्रुवारीत ५९५.१ दशलक्ष टन उत्पादनाचा अंदाज होता.
soybean
soybean

वॉशिंग्टन ः जागतिक तेलबिया उत्पादनात फेब्रुवारी महिन्याच्या तुलनेत ७ लाख टनांनी वाढ होण्याची शक्यता आहे. फेब्रुवारीत ५९५.१ दशलक्ष टन उत्पादनाचा अंदाज होता. तर मार्च महिन्यात ५९५.८ दशलक्ष टन तेलबिया उत्पादन होण्याची शक्यता अमेरिकेच्या कृषी विभागाने (यूएसडीए) वर्तविली आहे. भारत सरकारच्या सुधारित अंदाजाच्या आधारे भारतात तेलबिया उत्पादन २ लाख टनांनी वाढल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. 

मार्च महिन्यात ‘यूएसडीए’ने तेलबिया उत्पादन, निर्यात आणि शिल्लक साठ्यात वाढ झाल्याचे म्हटले आहे. जागतिक उत्पादन ५९५.१ दशलक्ष टनांवरून ५९५.८ दशलक्ष टन राहण्याचा अंदाज आहे. तेलबियांमध्ये सोयाबीन आणि मोहरी उत्पादनात वाढ होणार असल्याचे म्हटले आहे, तर पाम कार्नेल, सरकी आणि सूर्यफूल पिकाच्या उत्पादनात काहीशी स्थिती नकारात्मक आहे. ब्राझीलमधील सोयाबीन उत्पादन १० लाख टनांनी वाढून १३४ दशलक्ष टन राहण्याची शक्यता आहे. तर भारतात सोयाबीन उत्पादन २ लाख टनांनी वाढून १०.७ दशलक्ष टन राहण्याची शक्यता आहे. भारत सरकारने जाहीर केलेल्या सुधारित अंदाजातील लागवड क्षेत्राच्या आधारे उत्पादन वाढीची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. 

निर्यातीत वाढ  जागतिक तेलबिया निर्यातीत ८ लाख टनांनी वाढ झाली आहे. प्रामुख्याने युक्रेन आणि ऑस्ट्रेलियातून मोहरीची निर्यात वाढली आहे. युरोपियन देश आणि युनायटेड किंगडम या देशांत मोहरी उत्पादन वाढून १७.१ दशलक्ष टनांवर आले असतानाही मोहरी आयात वाढली आहे. तर सोयाबीन गाळपात १६ लाख टनांनी वाढ होऊन ३२३.६ दशलक्ष टनांवर गेले आहे. अर्जेंटिना आणि ब्राझीलमध्ये सोयाबीन गाळप वाढले आहे, तर चीनमध्ये घटले आहे. अर्जेंटिनाची तेल आणि सोयामिल निर्यातही वाढली आहे. चीनमध्ये सोयाबीन गाळप १० लाख टनांनी कमी होऊन ९८ दशलक्ष टन झाले आहे.  अमेरिकेत सोयाबीन साठ्यात घट  अमेरिकेचा सोयाबीन पुरवठा आणि वापर मार्च महिन्यात कायम ठेवण्यात आला आहे. अमेरिकेत सोयाबीन गाळप हे २२० कोटी बुशेल्स आणि निर्यात २२५ कोटी बुशेल्स राहण्याची शक्यता आहे. तर शिल्लक साठा १२० दशलक्ष बुशेल्स राहण्याचा अंदाज आहे. मागील वर्षी ४०५ दशलक्ष बुशेल्स शिल्लक साठा होता. अमेरिकेत हंगामातील सरासरी सोयाबीन दर ११.१५ डॉलर प्रतिबुशेल्स राहण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. तर सोयामिल दर मागील महिन्याएवढेच म्हणजेच ४०० डॉलर प्रतिटन राहील. तर सोयातेलाचे दर ४१.० सेंट प्रतिपाउंड राहतील, गेल्या महिन्याच्या तुलनेत हा दर १ सेंटने अधिक आहे.  तेलबिया दृष्टिक्षेपात 

 • जागतिक उत्पादनात ७ लाख टनांनी वाढ 
 • सोयाबीन, मोहरी उत्पादनात वाढ शक्य 
 • पाम कार्नेल, सरकी, सूर्यफूल उत्पादनाला फटका शक्य 
 • जागतिक तेलबिया निर्यात वाढली 
 • चीनमध्ये सोयाबीन गाळप घटले 
 • Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

  ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

  Agrowon
  www.agrowon.com