बेदाणा दरात प्रतिकिलो २५ ते ३० रुपयांची वाढ

अफगाणिस्तानात तालिबानी राजवट आल्यामुळे सध्या भारताबरोबरची आयात-निर्यात बंद आहे. परिणामी, अफगाणिस्तानातून बेदाणा येत नसल्याने देशांतर्गत उद्योगात ‘फील गुड’ निर्माण झाले आहे.
बेदाणा दरात प्रतिकिलो २५ ते ३० रुपयांची वाढ
बेदाणा दरात प्रतिकिलो २५ ते ३० रुपयांची वाढ

सांगली : अफगाणिस्तानात तालिबानी राजवट आल्यामुळे सध्या भारताबरोबरची आयात-निर्यात बंद आहे. परिणामी, अफगाणिस्तानातून बेदाणा येत नसल्याने देशांतर्गत उद्योगात ‘फील गुड’ निर्माण झाले आहे. त्यामुळे देशातील बाजारपेठेत राज्यातील बेदाण्याच्या मागणीत वाढ झाली आहे. गेल्या पंधरा दिवसांत बेदाण्याच्या दरात २५ ते ३० प्रति किलोस वाढ झाली आहे. सध्या बेदाण्याला सरासरी १५० ते २४० प्रति किलो असा दर मिळत आहे. येत्या काळात बेदाण्याची आवक वाढून दरातही वाढ होईल, अशी माहिती बेदाणा उद्योगातील जाणकारांनी दिली. अफगाणिस्तानातून वाघा बॉर्डरमार्गे भारतात इतर देशांतून बेदाणा आयात होतो. मात्र तालिबान्यांनी अफगाणिस्तानवर कब्जा करताच अंदाधुंद परिस्थिती निर्माण झाली आहे. अफगाणिस्तान-पाकिस्तानमार्गे दळणवळणाची सर्व साधने बंद झाली. अनेक ठिकाणी असणारे चेक पोस्ट उद्ध्वस्त करण्यात आल्याने आयात होणारा माल पूर्णपणे बंद झाला आहे. त्यामुळे अफगाणिस्तानमार्गे भारतात येणाऱ्या बेदाण्याची आयात बंद झाली आहे. त्यामुळे राज्यात तयार होणाऱ्या बेदाण्याला देशांतर्गत बाजारपेठेत मागणी वाढली आहे. कोरोना प्रादुर्भाव काळात बेदाणा खाल्याने प्रतिकारशक्तीत वाढ होत असल्याने बेदाण्याच्या विक्रीत वाढ झाली आहे.

ऑगस्ट महिन्याच्या मध्यावर सुमारे ६५ ते ७० हजार टन बेदाणा शीतगृहात शेतकऱ्यांनी ठेवला होता. गेल्या पंधरा दिवसांत अंदाजे १७ ते २० हजार टनांची विक्री झाली आहे. सध्या राज्यात ४८ ते ५० हजार टन बेदाणा शीतगृहात शिल्लक आहे. गणेशोत्सव आणि दसरा, दिवाळी सणानिमित्त बाजारात बेदाण्याची विक्री होऊ लागली आहे. 

शेतकऱ्यांत समाधान सांगली, तासगाव, पंढरपूर बाजार समितीत बेदाण्याच्या सौद्यात आवक एक हजार ते १२५० टन बेदाण्याची आवक होते. त्यापैकी सुमारे ८० टक्के बेदाण्याची विक्री होते. शासनाने देशांतर्गत बाजारपेठांच्या वेळेत वाढ केली आहे. त्याचा फायदा बेदाणा विक्रीस होऊ लागला आहे. गेल्या वर्षीपेक्षा यंदा बेदाण्याला चांगले दर मिळत असल्याने शेतकऱ्यांत समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.  प्रतिक्रिया... केंद्र सरकार अफगाणिस्तानला देत असलेल्या सवलतीचा गैरफायदा तिथल्या निर्यातदारांनी घेतला आहे. त्यामुळे भारतातील बेदाण्याच्या दरावर परिणाम होत होता. भारतातील बेदाणा उत्पादकांना अपेक्षित दर मिळत नव्हते. सद्यःस्थितीत अफगाणिस्तानातील आयात थांबली असल्याने बेदाणा उत्पादकांना याचा फायदा होत आहे. शासनाने याचे अवलोकन करून भविष्यात अफगाणिस्तानावरुन येणाऱ्या बेदाण्यावर निर्बंध लादावेत. - सुशील हडदरे,  बेदाणा व्यापारी, सांगली

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com