सोयापेंडीच्या मागणीमुळे सोयाबीनचे दर स्थिर 

बाजारात सध्या सोयाबीन दर एका भावपातळीवर भोवती फिरत आहेत. तसेच मागील पंधरवड्यापासून दर टिकून आहेत. मागील आठवडाभरात सोयाबीनची आवक सामान्य होती.
 सोयापेंडीच्या मागणीमुळे सोयाबीनचे दर स्थिर 
Rate stable for soybeans

पुणे ः बाजारात सध्या सोयाबीन दर एका भावपातळीवर भोवती फिरत आहेत. तसेच मागील पंधरवड्यापासून दर टिकून आहेत. मागील आठवडाभरात सोयाबीनची आवक सामान्य होती. मात्र सोयापेंडला जास्त उठाव मिळाला नाही. त्यामुळे दर ६ हजार ते ६ हजार ४०० रुपयांच्या दरम्यान राहिले.  सोयाबीनला वायद्यांमधून वगळल्यानंतर दर बाजारातील मागणी आणि पुरवठ्यानुसार ठरत आहेत. सध्या देशात सोयाबीनचे दर ५ हजार ९०० ते ६ हजार ४०० रुपयांच्या दरम्यान आहेत. बाजारात दर दिवशी २०० ते ३०० रुपयांची तेजी मंदी पाहायला मिळत आहे. वाढलेल्या दरात सोयापेंडीची मागणी सामान्य राहिल्याने सोयाबीन एका भावपातळीभोवती फिरत आहे. शेतकऱ्यांनी टप्प्याटप्प्याने सोयाबीन विक्री सुरू ठेवल्याने आवकेचा दबाव नाही. त्यामुळे दर एका भावपातळीवर टिकून आहेत. मात्र देशांतर्गत सोयापेंडचे दर अधिक असल्याने देशांतर्गत बाजारात आणि निर्यातीसाठीही सोयापेंडला मागणी सरासरी आहे. तसेच कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने कंटेनरची समस्याही आहे, असे निर्यातदारांनी सांगितले.  देशात महिन्याला सोयापेंडची गरज तीन ते साडेतीन लाख टन असते. तर सध्या बाजारात दैनदिन आवक सरासरी अडीच लाख पोत्यांची आवक होत आहे. शेतकरी टप्प्याटप्प्याने सोयाबीन विकत असल्याने दर टिकून आहेत. मागील आठवड्यात दैनिक आवकेचा विचार करता मध्य प्रदेशात आवक सव्वा लाख पोत्यांच्या दरम्यान होती. तर महाराष्ट्रात १ लाख १० हजार पोत्यांची आणि राजस्थानमध्ये १२ हजार पोत्यांची आवक राहिली. आठवडाभर सोयाबीन दर टिकून राहिले. मध्य प्रदेशात सोयाबीनचा सर्वसाधारण दर ६ हजार १०० ते ६ हजार ३५० रुपयांच्या दरम्यान होता. राजस्थानमध्ये सर्वसाधारण दर ६ हजार ते ६ हजार ४०० रुपयांवर होता. तर महाराष्ट्रात मागील आठवड्यात ६ हजार ते ६ हजार ३५० रुपयाने सोयाबीनचे व्यवहार झाले. छत्तीसगडमध्ये सोयाबीनला सरासरी ६ हजार ते ६ हजार ३०० रुपये दर मिळाला.  सोयापेंडीचा विचार करता मागील आठवड्यात मागणी सामान्य राहिली. त्यामुळे दरात एक हजार रुपयांपर्यंत चढ-उतार होता. आठवडाभरात मध्य प्रदेशात ५२ हजार ते ५४ हजार रुपये प्रति टनाने सोयापेंडीचे व्यवहार झाले आहेत. राजस्थानमध्ये ५३ हजार ते ५५ हजार रुपये दर मिळाला. तर महाराष्ट्रात प्रति टन ५३ हजार ते ५६ हजार रुपये दर राहिला. देशातील मागणी आणि पुरवठ्याचा विचार करता सोयापेंडीचे दर टिकून राहण्याची शक्यता असल्याचे व्यापारी सूत्रांनी सांगितले.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.