कच्ची साखरनिर्यात यंदा फायदेशीर 

येत्या साखर हंगामात आंतरराष्ट्रीय बाजारात साखरेला दर चांगला मिळण्याची शक्‍यता निर्माण झाल्याने यंदा कच्च्या साखरेच्या निर्यातीची संधी भारताला उपलब्ध झाली आहे.
raw sugar
raw sugar

कोल्हापूर ः येत्या साखर हंगामात आंतरराष्ट्रीय बाजारात साखरेला दर चांगला मिळण्याची शक्‍यता निर्माण झाल्याने यंदा कच्च्या साखरेच्या निर्यातीची संधी भारताला उपलब्ध झाली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत साखर तुटवडा भासण्याची शक्यता असल्याने कच्या साखरेस चांगले दर मिळू शकतात. पुरेशा प्रमाणात साखरनिर्यात झाल्यास देशातील स्थानिक साखर विक्रीवरील दबाव कमी होणार आहे. कारखान्यांची हंगामात ऐनवेळी पळापळ होऊ नये यासाठी राष्ट्रीय सहकारी साखर महासंघानेही हंगाम सुरू होण्यापूर्वीच कच्ची साखरनिर्यात करार करण्याच्या सूचना दिल्या आहेत. 

गेल्या दोन वर्षांपासून देशाने साखरनिर्यातीत समाधानकारक कामगिरी केली आहे. अनुदान मिळणार असल्याने अनेक कारखान्यांनी साखर निर्यातीला प्राधान्य दिले. यामुळे ५५ लाखांहून अधिक टन साखरनिर्यात झाली. चांगला दर मिळाल्याने कारखान्यांनी निर्यातीला प्राधान्य दिले. गेल्या वर्षी निर्यात अनुदान योजना उशीर म्हणजे डिसेंबरमध्ये जाहीर झाल्याने कारखान्यांना साखर निर्यातीसाठी धावाधाव करावी लागली. यंदा ही धावाधाव टाळण्यासाठी राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाने कारखान्यांना एक पत्र लिहून कारखान्यांनी कच्ची साखर तयार करण्याला प्राधान्य द्यावे व त्याचे करार करून ती जास्तीत जास्त निर्यात करण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन केले आहे. 

पक्क्या साखरेच्या तुलनेत कच्ची साखर जास्त वेळ साठा करून ठेवता येत नाही. आपण जितकी कच्ची साखर तयार करणार आहोत. तितक्या साखरेचे करार आत्तापासूनच बाहेरच्या देशाशी करावेत, जशी साखर तयार होईल तशी ती साखर पाठवल्यास बाजारात असणाऱ्या चांगल्या दराचा फायदा साखर कारखान्यांना होऊ शकतो, असे साखर उद्योगातील सूत्रांचे म्हणणे आहे. 

यंदाही विक्रमी साखर उत्पादन होणार असल्याने या पार्श्‍वभूमीवर आतापासूनच नियोजन केल्यास साखर विक्रीचा ताण कमी होऊ शकेल असे राष्ट्रीय साखर सहकारी साखर कारखाना महासंघाच्या सूत्रांनी स्पष्ट केले. 

महाराष्ट्रातून कराराला पसंती  साखर उद्योगातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पुढील वर्षासाठी निर्यात कराराला महाराष्ट्रातून अधिक पसंती आहे. राज्यातून हंगाम २०२१-२२ करिता कच्ची साखरेचे (रॉ शुगर) ओपन जनरल लायसन्स (ओजीएल) योजनेअंतर्गत अंदाजे पाच लाख टनांचे करार झाले आहेत. करार केलेली साखर नोव्हेंबर व डिसेंबर २०२१ या कालावधीत निर्यात होईल. हे साखरनिर्यात करार अंदाजे २९०० ते २९५० प्रति क्विंटल एक्स मिल या दराने फॉरवर्ड कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने झाले आहेत. 

ब्राझीलमध्ये अंदाजे ५० लाख टन साखर मागील हंगाम पेक्षा कमी उत्पादन होईल असा अंदाज आहे. थायलंड मध्ये २०२१-२२ हंगामात मागील वर्षापेक्षा पंधरा लाख टन साखर जादा उत्पादन होण्याची शक्यता आहे. येत्या वर्षभरात जागतिक बाजारात अंदाजे ४० लाख टन साखरेची कमतरता राहू शकते. यामुळे जागतिक बाजारात भारतीय कारखानदारांना साखरनिर्यातीची संधी उपलब्ध झाली आहे. 

...अशी आहे राज्याची स्थिती  निर्यातदार सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यातील साखर कारखाने मागील सहा ते सात मे महिन्यापासून देशांतर्गत किमान साखर विक्री दराच्या (एमएसपी) कमी दराने साखर विक्री करत आहेत, ओपन जनरल लायसन अंतर्गत साखरेला जर २९५० प्रती क्विंटल पेक्षा जास्त दर मिळू लागला तर जास्तीत जास्त कारखाने निर्यातीला साखर देण्यास प्राधान्य देऊ लागतील यामुळे देशांतर्गत बाजारपेठेत साखरेचे दर वाढण्यास मदत होईल याचा सरकारने व कारखानदारांनी विचार करावा २०२०-२१ मध्ये सरकारने जाहीर केलेल्या ६० लाख टन साखर निर्यात अनुदान योजनेपैकी अंदाज तीस लाख टनांपेक्षा जास्त साखर महाराष्ट्रातून निर्यात झाली. तसेच हंगाम २०२१-२२ करिता ओपन जनरल लायसन अंतर्गत झालेले पाच लाख टन साखर निर्यातीचे करार हे महाराष्ट्रातून झालेले आहेत. राज्यात यंदाच्या हंगामात ११५ लाख टना पेक्षा जास्त साखर उत्पादन होण्याची शक्यता आहे.  प्रतिक्रिया  कारखान्यांनी सध्या पक्क्या साखरेऐवजी कच्च्या साखरेच्या निर्मितीचे नियोजन करावे. त्याच्या निर्यातीचे करार आताच करावेत यासाठी आम्ही आग्रही आहोत, कारखान्यांनी पक्की साखर तयार करून बँकेचा बोजा वाढवण्यापेक्षा कच्ची साखर तयार करावी व ती तातडीने निर्यात करावी, अशी आमची अपेक्षा आहे. या आवाहनाला कारखान्यांनी पसंती दिली आहे ही समाधानाची बाब आहे.  - प्रकाश नाईकनवरे, व्यवस्थापकीय संचालक, राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघ. 

राज्यातील कारखान्यांना बंदरापर्यंत साखर वाहतूक खर्च कमी आहे. त्यामुळे सरकारने निर्यात अनुदान योजनेऐवजी ओपन जनरल लायसन्स अंतर्गत साखर निर्यातीस परवानगी दिली तर महाराष्ट्र, कर्नाटक व गुजरात या राज्यातून अंदाजे ४५ लाख टनांपेक्षा जास्त साखरनिर्यात होऊ शकेल. जर सरकारने देशांतर्गत किमान विक्री मूल्य (एमएसपी) वाढवली नाही, तसेच निर्यात अनुदान नाही दिले तरी २९५० रुपये प्रती क्विंटल पेक्षा जास्त दर साखर निर्यातीला मिळू शकेल.  - अभिजित घोरपडे, साखर निर्यातदार 

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com