सोयाबीन दरात सुधारणा 

सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांनी यंदा टप्प्याटप्प्याने विक्रीचा निर्णय घेतल्याचे स्पष्ट दिसत आहे. कारण दिवाळीनंतर बाजारात आवक वाढेल, असा अंदाज व्यापारी आणि प्रक्रिया उद्योग बांधून होता.
सोयाबीन दरात सुधारणा 
Soybean price improvement

पुणे ः सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांनी यंदा टप्प्याटप्प्याने विक्रीचा निर्णय घेतल्याचे स्पष्ट दिसत आहे. कारण दिवाळीनंतर बाजारात आवक वाढेल, असा अंदाज व्यापारी आणि प्रक्रिया उद्योग बांधून होता. मात्र आवक काहीशी वाढल्यानंतरही प्लांट्सची खरेदी वाढल्याने दरातही १०० ते १५० रुपयांची सुधारणा झाली. तर सोयापेंडच्या दरातही एक हजार ते दीड हजार रुपयांची वाढ झाली. पुढील आठवड्यातही हे दर कायम राहतील, असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केला आहे.  दिवाळीनंतर देशभरातील बाजार समित्यांत सोयाबीनची आवक काहीशी वाढली. मात्र गेल्या वर्षीच्या तुलनेत आवक खूपच कमी आहे. त्यातच सोयाबीन प्रक्रिया प्लांट्सची खरेदीही वाढली. त्यामुळे काहीशी आवक वाढल्यानंतरही दरावर दबाव आला नाही तर बाजारात सोयाबीन दरात सुधारणा पाहायला मिळाली. गेल्या वर्षी सोयाबीन दरात आलेली तेजी पाहता शेतकरी कमी दरात सोयाबीन विक्री करण्यास इच्छुक दिसत नाहीत. सध्या स्टॉकिस्ट या दरात कमी स्टॉक करत आहेत. दिवाळीनंतर चालू आठवड्यात सोयाबीन दरात देशभरातील बाजार समित्यांमध्ये १०० ते १५० रुपयांची सुधारणा झाली.  बाजारात सोयाबीनला मागणी आहे, परंतु पुरवठा नसल्याने दराला आधार मिळत आहे. चालू आठवड्यात देशभरातील बाजार समित्यांत दैनंदिन आवक सात ते साडेसात लाख पोत्यांची होती. मध्य प्रदेशात सोयाबीनला सरासरी ५००० ते ५६०० रुपये प्रति क्विंटल दर चालू आठवड्यात मिळाला. तर महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजार समित्यांमध्ये ४८०० ते ५३०० रुपयाने सोयाबीन विकले गेले. राजस्थानमध्ये सोयाबीनला चालू आठवड्यात सरासरी ५००० ते ५६०० रुपये दर मिळाला. ऐन हंगामातही आवक अपेक्षेप्रमाणे वाढत नाही म्हटल्यावर दरवाढ झाली आहे.  प्लांट्चे दर २०० ते २५०० रुपयांनी सुधारले   यंदा देशभरात थेट प्लांट विक्री वाढली आहे. चालू आठवड्यात प्लांट्चे दर २०० ते २५० रुपयांनी वाढले आहे. मध्य प्रदेशात या वाढीसह सोयाबीनला प्लांट दर ५३०० ते ५५०० रुपये राहिला. तर महाराष्ट्रात हाच दर ५५०० ते ५७०० रुपयांवर पोहोचला. राजस्थानमध्ये देशात सर्वाधिक प्लांट्स दरची नोंद चालू आठवड्यात झाली. येथे सोयाबीनला ५६०० ते ५७५० रुपये दर मिळाला.  सोयाबीन तेलाचे दर कमी झाले  सोयाबीन तेलाचा विचार करता दरात चालू आठवड्यात ५० ते ७० रुपयांची घसरण झली. तेल दर कमी करण्यासाठी सरकार विविध उपाय करत आहे, त्यातच साठा मर्यादेची टांगती तलवार असल्याने व्यापारी आणि उद्योग जास्त साठा करताना दिसत नाहीत. त्यामुळे दरात काहीशी घसरण पाहायला मिळाली. चालू आठवड्यात सोयाबीन तेलाला मध्य प्रदेशात प्रतिदहा १० किलोला १२३५ ते १२५५ रुपये दर मिळाला. तर महाराष्ट्रात १२३० ते १२६० रुपये, राजस्थानमध्ये १२३५ ते १२६० रुपये आणि गुजरातमध्ये १२२० ते १२३० रुपये दर मिळाला.  सोयापेंडच्या दरात सुधारणा  चालू आठवड्यात सोयाबीनचे दर वाढल्याने प्लांट्सनी सोयापेंडच्या दरातही वाढ केली आहे. आठवड्यात सोयापेंडच्या दरात एक हजार ते दीड हजार रुपयांची वाढ झाली. या वाढीसह मध्य प्रदेशात सोयापेंडचे दर ४१ हजार ५०० रुपयांवर पोहोचले. महाराष्ट्रात ४२ हजार ते ४५ हजार रुपयांनी सोयापेंडचे व्यवहार होत आहेत. तर राजस्थानमध्ये ४३ हजार ५०० ते ४४ हजार रुपये दर सोयापेंडला मिळत आहे. 

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com