सोयाबीन लागवड क्षेत्रात दहा टक्के वाढीची शक्यता 

बियाणे उपलब्धता नसल्याने शेतकरी लागवड कमी करतील तर सोयाबीन उद्योगाशी संबंधित जाणकारांनी मात्र या वर्षी देशात ९.९% लागवड क्षेत्रात वाढीचा अंदाज वर्तविला आहे.
soybean
soybean

नागपूर : देशात सोयाबीन लागवड क्षेत्र आणि उत्पादनासंदर्भात विविध दावे-प्रतिदावे केले जात आहेत. काहींच्या मते यावर्षी बियाणे उपलब्धता नसल्याने शेतकरी लागवड कमी करतील तर सोयाबीन उद्योगाशी संबंधित जाणकारांनी मात्र या वर्षी देशात ९.९% लागवड क्षेत्रात वाढीचा अंदाज वर्तविला आहे.  सोयाबीन प्रक्रिया उद्योगाशी संबंधित जाणकारांच्या मतानुसार, यावर्षी जागतिक स्तरावर सोयाबीन उत्पादक देशांमध्ये विविध कारणांमुळे उत्पादन घटले. परिणामी खाद्य तेलाच्या दरात वाढ झाली. आंतरराष्ट्रीयस्तरावरील दरातील तेजी भारतातही अनुभवण्यात आली. भारतात ३८८० रुपये सोयाबीनचा हमीभाव होता. हंगामा अखेरीस सोयाबीनला हमीभावापेक्षा दुप्पट दर मिळाला. ६००० ते ७००० रुपयांपर्यंत बाजार होता. आंतरराष्ट्रीयस्तरावर देखील सोयाबीन दरात तेजी आहे. त्यासोबतच चालू व्यापारी वर्षात जगातील प्रक्रिया उद्योजकांकडे असलेला कच्‍या मालाचा साठा देखील कमी होणार आहे. त्यामुळेच दरातील तेजी कायम राहण्याची शक्यता वर्तविली जात आहे.  दुसरीकडे सोयाबीन खरेदी विक्री करणाऱ्या व्यापाऱ्यांनी मात्र यावर्षी लागवड क्षेत्र घटण्याची शक्यता वर्तवली आहे. देशात बियाण्यांचा तुटवडा असला आणि लागवड वाढणार असेल तर मग बियाण्यांसाठी ओरड होणे अपेक्षित होते. मात्र सोयाबीन उत्पादक राज्यांतून अशा प्रकारची बियाण्यांबातची ओरड झाली नाही. त्यामुळेच शेतकरी लागवड क्षेत्र कमी करतील, असे संकेत आहेत. ‘महाबीज’देखील मध्य प्रदेशातून बियाणे घेते. त्यांच्याकडून देखील अतिरिक्त बियाणे मागणी झाली नाही. परिणामी याला दुजोरा मिळतो, असे मध्य प्रदेशातील एका व्यापाऱ्याने सांगितले. दुसरीकडे राजस्थानमध्ये सोयाबीन खालील क्षेत्रात एक लाख हेक्‍टर वाढीचा निर्णय घेतला आहे.  दर तेजीतच  वायदे बाजारात १८ एप्रिल २०२१ रोजी सोयाबीनचे दर ८१०० रुपये प्रतिक्विंटलवर पोचले होते. आता हे दर ७१४० रुपये प्रतिक्विंटलवर स्थिर आहेत. गेल्या वर्षीच्या दरासोबत याची तुलना केल्यास दरातील वाढ ८० टक्के आहे. त्यामुळे यंदाच्या हंगामात देखील सोयाबीनचे दर खाली येण्याची शक्यता कमीच आहे. कारण जून ते ऑगस्ट या दरम्यान सोयाबीनची लागवड होते. त्याकरिता बियाणे उपलब्ध होण्याचे आव्हान देखील शेतक‍ऱ्यांसमोर आहे. शेतकरी आपल्याकडील बियाण्यांचा वापर करतात मात्र गेल्या हंगामात पावसामुळे सोयाबीनची पत खालावली. परिणामी अशा बियाण्यांची उगवणक्षमता कमी राहणार आहे.  बियाण्याची टंचाई  २०२१-२२ या वर्षात २,८९,८६६ टन बियाण्याची गरज आहे. त्यापैकी २,८१,१०१ टन बियाणेच देशात उपलब्ध आहे. अशी स्थिती असली तरी देशात हमीभावापेक्षा सोयाबीनला दुप्पट दर मिळाला आहे. त्यामुळे सोयाबीन लागवड क्षेत्र वाढ होणार आहे. २०२०-२१ मध्ये १२१ लाख हेक्टर असलेले हे क्षेत्र ९.९ टक्क्यांनी वाढून १३३ लाख हेक्‍टरवर पोहोचेल, असे जाणकार सांगतात.   

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com