सोयापेंड आयात थांबवा : राज्य सरकारचे केंद्राला पत्र 

जीएमसोयापेंडच्या आयातीलामान्यता दिल्याने सोयाबीनचे बाजारभाव पडले आहेत. त्यामुळे सोयापेंड आयातीवर बंदी घालावी, अशी मागणी राज्य सरकारने केंद्रीय वाणिज्य मंत्रालयाकडे केली आहे.
Soya cake_1.jpg
Soya cake_1.jpg

पुणे : जनुकीय परावर्तित (जीएम) सोयाबीनपेंडच्या आयातीला दिलेली मान्यता शेतकऱ्यांसाठी नुकसानकारक ठरेल. अशी मान्यता दिल्याने सोयाबीनचे बाजारभाव पडले आहेत. त्यामुळे सोयापेंड आयातीवर बंदी घालावी, अशी मागणी राज्य सरकारने केंद्रीय वाणिज्य मंत्रालयाकडे केली आहे.  कृषिमंत्री दादा भुसे यांनी केंद्रीय वाणिज्यमंत्री पीयूष गोयल यांना खास पत्र लिहून राज्य सरकारच्या भावना कळविल्या आहेत. वाणिज्य मंत्रालयाने २४ ऑगस्टला जारी केलेल्या एका अधिसूचनेनुसार देशात १२ लाख टन कुटलेली व जीएम गटातील सोयापेंड आयात करण्यास मान्यता दिली आहे. “केंद्राने सोयापेंड आयातीच्या घेतलेल्या या निर्णयाचे परिणामी देशातील सोयाबीनच्या बाजारांवर होतील. असा निर्णय घेतल्याची बातमी पसरताच बाजारातील घटकांनी लाभ उठविण्यास सुरुवात केली आहे. त्यातून सोयाबीनचे बाजारभाव प्रतिक्विंटल २००० ते २५०० रुपयांनी गडगडले आहेत,” असे ना. भुसे यांनी पत्रात नमूद केले आहे.  देशातील प्रमुख तेलबिया पीक असलेल्या सोयाबीनची खरिपातील लागवड १२० लाख हेक्टर क्षेत्रावर होते. देशातील एक कोटी शेतकरी या पिकावर अवलंबून आहेत, अशी आठवणदेखील या पत्रात करून देण्यात आली आहे.  “देशात आता सोयाबीनचे उभे पीक काढणीच्या अवस्थेला आहे. त्यामुळे केंद्र सरकारने जीएम सोयापेंड आयातीला दिलेल्या मान्यतेचा निर्णय पुढील बाजारभावांवर प्रतिकूल परिणाम करेल. या निर्णयामुळे शेतकऱ्यांमध्ये संतापाचे वातावरण आहे. त्यामुळे आयातीला मान्यता देणाऱ्या निर्णयाचा तुम्ही फेरविचार करावा आणि सोयापेंड आयातीवर तत्काळ बंदी आणावी,” अशी मागणी या पत्रात करण्यात आली आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com