देशात सव्वादोन लाख हेक्टरवर हळद लागवड

यंदा देशात हळदीची लागवड अंतिम टप्प्यात आली आहे. आतापर्यंत २ लाख ३५ हजार हेक्टरवर हळदीची लागवड झाली आहे. सोयाबीनला उच्चांकी दर मिळाला आहे.
देशात सव्वादोन लाख हेक्टरवर हळद लागवड
Turmeric is cultivated on 2.5 lakh hectares in the country

सांगली ः यंदा देशात हळदीची लागवड अंतिम टप्प्यात आली आहे. आतापर्यंत २ लाख ३५ हजार हेक्टरवर हळदीची लागवड झाली आहे. सोयाबीनला उच्चांकी दर मिळाला आहे. त्यामुळे हळद उत्पादक शेतकरी सोयाबीन लागवडीकडे वळाला आहे. त्यामुळे देशातील हळदीच्या लागवडीच्या क्षेत्रात ५ ते १० टक्क्यांनी घट होण्याचा अंदाज हळद उद्योगातील जाणकारांनी व्यक्त केला आहे.

देशात दरवर्षी सरासरी २.६० लाख हेक्टरवर हळदीची लागवड होते. दोन वर्षापूर्वी पावसाने दडी मारल्याने त्याचा परिणाम हळद लागवडीवर झाला होता. त्यामुळे २.३० लाख हेक्टरवर लागवड झाली होती. यंदा सर्वत्र उन्हाळी पाऊस वेळेत सुरू झाला. त्यामुळे शेतकऱ्यांना हळद लागवडीचे नियोजन करून लागवड देखील केली आहे. 

गेल्यावर्षी देशात सुमारे २.६० लाख हेक्टरवर हळदीची लागवड झाली होती. दरम्यान, अति पाऊस यामुळे उत्पादनात घट झाली होती. त्यातच कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे हळद आरोग्यास उपयुक्त असल्याने हळदीच्या मागणीत वाढ झाली होती. त्यामुळे हळदीचे दर सुरुवातीपासूनच अपेक्षित मिळाले. वास्तविक पाहता, गतवर्षीच्या तुलनेत यंदा हळदीला प्रति क्विंटल १००० ते १५०० रुपयांनी अधिक दर मिळाले. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला. परंतु यंदाही कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे बाजारपेठा बंद असल्याने शेतकऱ्यांना हळद विक्रीस अडचणी निर्माण झाल्या. मात्र, दोन महिन्याच्या कालावधीनंतर बाजार सुरू झाले तरी, दराला झळाळी होती. मात्र, सोयाबीनला मिळालेल्या उच्चांकी दरामुळे हळद लागवड करणारे शेतकरी सोयाबीन पिकाकडे वळले असल्याने हळदीच्या क्षेत्रात घट होईल. 

याबाबत सांगली येथील हळद व्यापारी मनोहर सारडा म्हणाले की, गेल्यावर्षीपेक्षा यंदा हळदीच्या दरात तेजी होती. परंतु सोयाबीनला उचांकी दर मिळाल्याने हळद करणारे शेतकरी सोयाबीनकडे वळाले आहेत. लागवडीत ५ ते १० टक्के घट होईल, असा अंदाज आहे. 

सोयाबीन पिकाकडे कल सोयाबीनला ७ हजार ते ८ हजार ५ पाचशे प्रतिक्विंटल असा दर मिळाला. आत्तापर्यंत सोयाबीनला असा दर मिळाला नव्हता. हा उच्चांकी दर असल्याने याचा फायदा शेतकऱ्यांना झाला आहे. त्यामुळे हळद उत्पादन घेणारे शेतकरी सोयाबीन पिकाकडे वळाले आहेत.

गेल्यावर्षी हळदीला चांगली मागणी होती. त्यामुळे दर ही चांगले मिळाले. परिणामी शेतकरी हळद लागवडीकडे वळाले आहेत. यंदा देशात हळदीच्या क्षेत्रात वाढ होईल, असा अंदाज आहे. - डॉ. मनोज माळी,  प्रभारी अधिकारी,  हळद संशोधन केंद्र, कसबेडिग्रज

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.