उडीद दरात सुधारणेची चिन्हे

देशांतर्गत काही बाजार समित्यांमध्ये नविन उडदाची आवक होत असून त्यास ४८०० ते ६८०० रुपयांपर्यंत दर मिळत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
उडीद दरात सुधारणेची चिन्हे
उडीद दरात सुधारणेची चिन्हे

पुणे ः गेल्या हंगामात देशात उडदाचे उत्पादन कमी झाले होते. केंद्र सरकारने कडधान्य आयातीला परवानगी दिल्यानंतर म्यानमारमधून आयात होईल, असा अंदाज बांधला जात होता. परंतु, म्यानमारमध्ये उडदाचा साठा कमी असल्याने आणि नविन आवक जानेवारीत येणार असल्याने सध्या आयात शक्य होणार नाही, अशी माहिती जाणकारांनी दिली. त्यामुळे देशांतर्गत काही बाजार समित्यांमध्ये नविन उडदाची आवक होत असून त्यास ४८०० ते ६८०० रुपयांपर्यंत दर मिळत असल्याची माहिती सूत्रांनी दिली. केंद्र सरकारने यंदा उडदासाठी ६३०० रुपये हमीभाव जाहीर केला आहे. यंदा उडदाची लागवड गेल्यावर्षीएवढीच झाल्याचे स्पष्ट झाले आहे. परंतु मॉन्सूनने चांगली सुरवात केल्यानंतरही महाराष्ट्र, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेशात पावसाने अधिक काळ मारलेली दडी आणि गुजरातसह राजस्थानमध्ये अनेक भागांत असलेल्या दुष्काळी स्थितीमुळे यंदा देशात किती उडीद उत्पादन होईल, याबाबत स्पष्टता येत नाही. तसेच उडदाच्या उत्पादकतेवरही परिणाम झाल्याचे वृत्त अनेक ठिकाणांहून आले होते. त्यामुळे देशात उत्पादन वाढीची आशा केव्हाच मावळली आहे. परिणामी दर जास्त प्रमाणात कमी होण्याची शक्यता जाणकारांनी फेटाळून लावली आहे. गेल्या आठवड्यात देशांतर्गत बाजारात उडदाची आवक कमी असल्याने दरात सुधारणा पहायला मिळाली. दरात १५० ते २५० रुपयांपर्यंत सुधारणा झाली. देशातील महाराष्ट्र, कर्नाटक आणि राजस्थानमध्ये काही बाजार समित्यांमध्ये नविन उडदाची आवक होत आहे. महाराष्ट्रातील लातूर, अकोला, जळगावसह अनेक ठिकाणी आवक नोंदली गेली. तर कर्नाटकातील बीदर, गुलबर्गा तर राजस्थानातील जयपूर आणि केकणी बाजार समित्यांत गेल्या आठवड्यात उडदाचे व्यवहार झाले. अशी आहे दराची स्थिती गेल्या आठवड्यात उदाची आवक बाजार समित्यांमध्ये कमीच होती. महाराष्ट्रात गेल्या आठवड्यात १०० ते १५० रुपयांची सुधारणा झाली. लातूर बाजार समितीत ५६०० ते ७६०० रुपये दर मिळाले. तर अकोल्यात ५२०० ते ७३०० रुपये आणि दुधनी बाजार समितीत ५१०० ते ७००० रुपये आणि जळगावात ४९५० ते ७२०० रुपये दर उडदाला मिळाला. कर्नाटकातही १५० ते २५० रुपयांपर्यंत दर सुधारले. बिदर बाजार समितीत ५९०० ते ७००० रुपये आणि गुलबर्गा बाजार समितीत ५३०० ते ७१५० रुपयांपर्यंत दर मिळाले. तर राजस्थानात ६१०० ते ७३२० रुपयांपर्यंत उडदाला दर मिळाले.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com