शेंगासोबतच शेवग्याची पावडर ठरतेय फायदेशीर 

शेंगासोबतच शेवग्याची पावडर ठरतेय फायदेशीर 
शेंगासोबतच शेवग्याची पावडर ठरतेय फायदेशीर 

संपूर्ण २० एकर क्षेत्रांमध्ये शेवगा लागवडीचा निर्णय घेत शंतनू चंद्रशेखर महल्ले यांने धाडसी पाऊल उचलले आहे. केवळ शेंगा विक्रीवरच न थांबता शेवगा पानापासून पावडरनिर्मितीचा ध्यास घेतला आहे. त्यासाठी कंपनी स्थापन केली असून, आकर्षक पॅकिंगसह निर्यातीसाठी प्रयत्न सुरू केले आहेत.  मूळचे रामगाव येथील रहिवासी असलेल्या महल्ले कुटुंबीयांची लोही (जि. यवतमाळ) शिवारात २० एकर शेती आहे. गेल्या १० वर्षांपासून महल्ले कुटुंबीय पारंपरिक पद्धतीने सोयाबीन, तूर आदी पिके घेत. मात्र, त्यातून समाधानकारक उत्पादन मिळत नव्हते. पॉलीटेक्निक पदविका पूर्ण केल्यानंतर शंतनू चंद्रशेखर महल्ले याने शेतीमध्ये लक्ष घातले. यावर मार्ग काढण्यासाठी शंतनूने इंटरनेटवर विविध पिकांचा तुलनात्मक अभ्यास सुरू केला. त्यातून शेवगा पिकाविषयी माहिती मिळाली. कमी पाण्यामध्ये वाढीसह औषधी गुणधर्मांसाठी उपयुक्त असलेल्या शेवग्याची संपूर्ण वीस एकर क्षेत्रामध्ये लागवड करण्याचा धाडसी निर्णय घेतला. सप्टेंबर २०१८ मध्ये १२ फूट बाय ५ फूट अंतरावर १०,५०० रोपांची लागवड केली. प्रतिरोप १३ रुपये खर्च आला. 

  • ठिबक सिंचन यंत्रणेसाठी ४ लाख रुपये खर्च आला. 
  • शेतपरिसरामध्ये रानडुकरांमुळे मोठे नुकसान होत होते. हाती आलेले पीक वाया जाई. ते टाळण्यासाठी संपूर्ण २० एकर क्षेत्राला पाच तारांचे कुंपण केले. यासाठी सहा लाख रुपये खर्च आला. 
  • सेंद्रिय पद्धतीने उत्पादन घेण्यासाठी गांडूळखतांची निर्मिती सुरू केली. त्यासाठी सुमारे ५० हजार रुपये खर्च झाला. 
  • लागवड व अन्य मजुरी साधारणपणे एक लाख रुपये लागले. 
  • सहा महिन्यांमध्ये शेंगाचे उत्पादन सुरू झाले. पहिल्या टप्प्यात १० क्विंटल उत्पादन मिळाले असून, त्याची विक्री २५ रुपये प्रतिकिलो याप्रमाणे झाली आहे. 
  • हा खर्च असा वसूल होईल 

  • पूर्ण क्षमतेने उत्पादन सुरू झाल्यानंतर प्रतिझाडापासून सहा किलोपर्यंत शेंगा उत्पादन मिळू शकते. 
  • १०५०० गुणिले ६ या प्रमाणे त्याला ६३ हजार किलो उत्पादन मिळेल. त्याला २० रुपये प्रतिकिलो दराप्रमाणे १२.६ लाख रुपये उत्पन्न प्रतिवर्ष अपेक्षित आहे. 
  • एकरी ७ ते १० हजाराप्रमाणे २० एकरासाठी १.४ ते २.० लाख रुपये खर्च येईल. 
  • शेवगा पानांची पावडरनिर्मिती  शेवगा शेंगाइतकीच त्याची पानेही पोषक घटकांनी परिपूर्ण असल्याने जागतिकस्तरावर चांगली मागणी असल्याचे शंतनूला समजले. शेवगा पानांची पावडरनिर्मिती आणि विक्री या व्यवसायात उतरण्याचा निर्णय शंतनू याने घेतला. त्याने आई रोहिणी यांच्यासह ओनली मी सुपर फुडस या नावाने प्रोप्रायटरी फर्म स्थापन केली. त्याची कंपनी ॲक्टअंतर्गत नोंदणी केली असून, रोहिणी महल्ले या व्यवस्थापकीय संचालक आहेत.  पावडरनिर्मिती व विक्री ः 

  • शेवग्याची पाने तोडून ती सध्या नैसर्गिकरीत्या वाळवली जातात. उन्हाळ्यामध्ये सरासरी दोन दिवसांमध्ये, तर पावसाळा, हिवाळ्यात तीन ते पाच दिवसांपर्यंत पाने वाळतात. त्याची घरातील मिक्सरमध्येच भुकटी तयार केली जाते. 
  • १०० ग्रॅम आकाराच्या बाटल्यामध्ये पॅकिंग व विक्री कली जाते. त्याचा ओन्ली मी सुपर फूड्स असा ब्रॅण्ड तयार करण्याचा मानस आहे. 
  • शेवगा पानातील प्रथिने आणि अन्य पोषक घटकांविषयी भारतीय ग्राहकांमध्ये फारशी जागृती नाही. त्यामुळे विक्री वाढवण्यासाठी सध्या परिसरातील विविध डॉक्टरांची भेट घेऊन, त्यांना या पोषक पूरक घटकांविषयी माहिती देत आहे. त्यांच्या शिफारशीतून मेडीकल दुकानातून उत्पादनांची उपलब्धता करत आहेत. हळूहळू ग्राहकांची प्रतिसाद वाढत आहे. 
  • मे महिन्यामध्ये शंतनूने महाराष्ट्र राज्य कृषी व पणन मंडळाच्या वतीने फलोत्पादन निर्यात प्रशिक्षण घेतले. त्यातून निर्यातीसाठी प्रयत्न सुरू केले आहेत. 
  • शंतनु महल्ले, ९१७५३२२०१० 

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com