‘अमूल’ची उलाढाल ६१ हजार कोटींवर

कोविड (Covid-19) नंतरच्या काळात घरगुती वापरासोबतच हॉटेल्स, केटरिंग, पर्यटन आणि संलग्न व्यवसायांमधून दूध (Milk) आणि दुग्धजन्य पदार्थांची मागणी वाढल्याने अमूलच्या उलाढालीने जोर पकडला, असे सांगण्यात आले.
Amul
AmulAgrowon

महाराष्ट्रातील सहकारी दूध चळवळ धापा टाकत असताना गुजरातमधील अमूल दूध संघाने मात्र कामगिरीत सातत्य राखले आहे. अमूल (Amul) या ब्रॅँडनेमने दुधाची विक्री करणाऱ्या गुजरात सहकारी दूध विपणन महासंघाने २०२१-२२ मध्ये तब्बल ६१ हजार कोटी रुपयांची उलाढाल केली आहे. महासंघाची ४८ वी वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच पार पडली. त्या वेळी ही माहिती देण्यात आली.

गुजरातमधील १८ सहकारी जिल्हा दूध संघ ‘अमूल’चे सभासद आहेत. अमूल हा जगातील आठव्या क्रमांकाचा दूध संघ आहे. अमूल यंदा ७५वे स्थापना वर्ष साजरे करत आहे. २०२१-२२ या आर्थिक वर्षात अमूलच्या उलाढालीत आठ हजार कोटी रुपयांची वाढ झाली. ही वाढ १८.४६ टक्के आहे. गेल्या मागील बारा वर्षांत सरासरी वाढ १६ टक्के होती. त्या तुलनेत यंदा अधिक वाढ झाली आहे.

कोविड (Covid-19) नंतरच्या काळात घरगुती वापरासोबतच हॉटेल्स, केटरिंग, पर्यटन आणि संलग्न व्यवसायांमधून दूध (Milk) आणि दुग्धजन्य पदार्थांची मागणी वाढल्याने अमूलच्या उलाढालीने जोर पकडला, असे सांगण्यात आले. मागील बारा वर्षांत फेडरेशनच्या दूध संकलनात १९० टक्क्यांनी वाढ झाली आहे. या कालावधीत शेतकऱ्यांना मिळालेल्या दरात जवळपास १४३ टक्क्यांची वाढ झालेली आहे.

शेतकऱ्यांना विक्रमी दर दिल्यामुळे दुधाचे संकलन वाढल्याचे ‘अमूल'चे अध्यक्ष श्‍यामलभाई पटेल म्हणाले. ‘‘शेतकऱ्यांना चांगला दर मिळाल्यामुळे त्यांनी या व्यवसायात गुंतवणूक वाढवत नेली. त्यामुळे दूध उत्पादन वाढले. शेतकऱ्यांना त्याचा चांगला परतावा मिळाला,’’ पटेल म्हणाले.

क्षमतावाढीसाठी गुंतवणूक

अमूल आपली दूध प्रक्रिया (Milk Processing) क्षमता वाढवण्यासाठी ८०० ते १००० कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. दूध, दही आणि ताक यासारख्या ताज्या पदार्थांच्या निर्मितीची क्षमता वाढवली जाणार आहे. राजकोट येथे तब्बल ५०० कोटी रुपये गुंतवणुकीचा नवीन डेअरी प्रकल्प उभा राहत आहे. लवकरच दिल्लीजवळील बागपत, वाराणसी, रोहतक आणि कोलकाता येथेही मोठे प्रकल्प उभारले जाणार आहेत, असे श्‍यामलभाई पटेल यांनी सांगितले.

दुधापासून तयार केलेल्या मिठाया आणि गोड पदार्थ किमान दीड महिना टिकावेत यासाठी एका नवीन तंत्रज्ञानावर सध्या अमूल काम करत आहे. ‘‘ऐन उन्हाळ्यात आलेल्या कोविडच्या दुसऱ्या लाटेत सापडूनसुद्धा अमूलच्या दुग्ध पेय उलाढालीमध्ये ३६ टक्के वाढ झाली. आईस्क्रीम व्यवसायाने जोरदार मुसंडी मारत ५० टक्के वाढ दाखवली. अमूल बटरमध्ये १७ टक्के, तर तुपाच्या व्यवसायात १९ टक्के वाढ झाली. सर्वाधिक खपाच्या अमूल दुधाच्या विक्रीत १२ टक्के वाढ झाली,’’ असे फेडरेशनचे व्यवस्थापकीय संचालक आर. एस. सोढी म्हणाले.

Amul
ग्रामीण अर्थकारणास डेअरी क्षेत्रामुळे चालना : नरेंद्र मोदी

सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन

शेतकऱ्यांनी सेंद्रिय (Organic Farming) व नैसर्गिक शेती (Natural Farming) करावी यासाठीही ‘अमूल'ने पुढाकार घेतला आहे. सेंद्रिय शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना आपल्या उत्पादनांची तपासणी करून घेता यावी, यासाठी अमूल देशभरात प्रयोगशाळांची उभारणी करत आहे. या प्रयोगशाळांमध्ये शेतकऱ्यांना किफायतशीर दरात आणि खात्रीशीर तपासणी करता येईल, असे ‘अमूल'च्या वतीने सांगण्यात आले.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com